Join us  

कोकणातल्या छोट्याशा गावातली श्रध्दा तळेकर, पंचविशी उलटल्यावर ती जागतिक जिमनॅस्टिक स्पर्धेत पोहोचली आणि ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 3:04 PM

वयाच्या नवव्या वर्षापासून श्रध्दा तळेकर घेत असलेल्या मेहनतीला वयाच्या 27 व्या वर्षी यश आलं आणि तिचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं. श्रध्दा तळेकरची निवड पुढील महिन्यात टोकियो येथे होणार्‍या ‘कलात्मक जिमनॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशीप’साठी झाली आहे. तिचा प्रवास सोपा नव्हताच. पण तिने आपल्या ध्येयावरचं लक्ष जराही हटू दिलं नाही.

ठळक मुद्देवयाच्या नवव्या वर्षी म्हणजे जिमनॅस्टिकच्या मानानं जरा उशिराच श्रध्दानं सरावाला सुरुवात केली.सरावासाठी कोणतीही साधनं उपलब्ध नसताना श्रध्दाच्या मामानं तयार केलेल्या घरगुती साधनांद्वारे श्रध्दानं आपला सराव सुरु केला होता.लॉकडाऊनमधे आपले पाय मजबूत करण्यावर श्रध्दानं विशेष भर दिला.त्याच्या बळावरचं तिने जागतिक स्पर्धा गाठली आहे.

 रायगड जिल्ह्यातील पेडाली या छोट्याशा गावातल्या श्रध्दा तळेकरचं नाव गेल्या दोन दिवसांपासून भारतभरात गाजतंय.वयाच्या नवव्या वर्षापासून श्रध्दा घेत असलेल्या मेहनतीला वयाच्या 27 व्या वर्षी यश आलं आणि तिचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं. श्रध्दा तळेकरची निवड पुढील महिन्यात टोकियो येथे होणार्‍या ‘कलात्मक जिमनॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशीप’साठी झाली आहे.

श्रध्दा लहान होती तेव्हा तिच्या गावात जिमनॅस्टिकचा ‘ज’ सुध्दा कोणाला माहित असण्याचं कारण नव्हतं. पण श्रध्दा नऊ वर्षांची असताना उन्हाळ्याच्या सुटीत मामा विश्वास गोफण यांच्या घरी ठाण्याला गेली. मामा कराटे खेळाडू. त्यांनी श्रध्दाच्या अंगातली चपळता बघून तिला जिमनॅस्टिकच्या एका शिबिरात नेलं. तिथे श्रध्दाची ओळख जिमनॅस्टिकशी झाली. वयाच्या नवव्या वर्षापासून र्शध्दानं जिमनॅस्टिकचा सराव करायला सुरुवात केली. खरंतर जिमनॅस्टिक या खेळाच्या गरजेनुसार श्रध्दानं बरीच उशिरा सुरुवात केली. तेव्हा काही तिने करिअर किंवा कोणत्याही मेडलचं स्वप्न बघितलं नव्हतं. कनिष्ठ श्रेणीत तिनं खेळायला सुरुवात केली. तिच्या वयाचे इतर जिमनॅस्टिक खेळाडू खूप पुढे निघून गेले होते.

छायाचित्र:- गुगल

श्रध्दाची पहिली स्पर्धा पश्चिम बंगालमधील हुबळी येथील खुल्या मैदानावर झाली होती. राष्ट्रीय उपकनिष्ठ शालेय स्तरावरच्या या स्पर्धेत श्रध्दाला कोणतंही पदक मिळालं नाही. पण या स्पर्धेत तिला देशभरातल्या जिमनॅस्टचा खेळ जवळून बघता आला. ती पुढच्या स्पर्धांसाठी जिथे तयारी करत होती तेथील सुविधा खूप काही आधुनिक नव्हत्या. पण श्रध्दासाठी त्या सुविधाही खूप होत्या. तिनं उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे सराव करायला सुरुवात केली. तिच्या प्रयत्नांना पहिलं यश 2011 मधे मिळालं 12 व्या राष्ट्रीय स्पर्धात सुवर्ण मिळालेल्या राज्यस्तरीय संघात ती होती.

श्रध्दा स्टेट स्पोर्टस स्कूल येथे सराव करायला लागली. तेथील साधनं इतकी तकलादू होती की एका आठवडयाच्या सरावानंतर ती मोडकळीला आली. पण तिथे केलेल्या सरावाच्या बळावर श्रध्दानं 2018 मधे राष्ट्रीय स्तरावरच्या इनइव्हन बार स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं. तिथपर्यंत पोहोचलेल्या अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या जिमनॅस्ट खेळाडू तिथून आपला खेळ सोडून एकतर लग्न करुन संसाराला लागत होत्या किंवा दुसरी नोकरी शोधण्याच्या प्रवासाला. आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टचा संघ कधी बनणारच नाही अशी भीती मग श्रध्दालाही वाटायला लागली. त्याचा परिणाम तिच्या खेळावर होवू लागला. अनेक स्पर्धांमधील निवडीमधे तिला तिच्या पदरचे पैसे घालावे लागले. यामुळे आता आपणही मागे फिरायला हवं असं तिला वाटू लागलं. तिनं आपली ही इच्छा आपल्या आई वडिलांसमोर व्यक्त केली. पण श्रध्दामधील कौशल्यावर, तिच्या प्रयत्नांवर तिच्या आई बाबांचा आणि तिच्या मामाचा खूप विश्वास होता. त्यांनी श्रध्दाला वर्ल्ड चॅम्पियनशीपमधे सहभागी होण्याचं तुझं स्वप्न पूर्ण कर आम्ही तुझ्या लग्नाच्या मागे लागणार नाही असा विश्वास देवून पुढे जाण्याची प्रेरणा दिली.

छायाचित्र:- गुगल

श्रध्दालाही मग एकदम बंद झालेले दरवाजे उघडल्यासारखे वाटले. तोपर्यत दीपा कर्माकरने आपल्या कामगिरीच्या जोरावर जिमनॅस्ट खेळांडूप्रती लोकांच्या मनात आशा आणि कौतुक निर्माण केलं. पण दीपा कर्माकरसारखी कामगिरी करायची तर तसा शेपही हवा याची जाणीव श्रध्दाला झाली. श्रध्दाला त्या दरम्यान पायाचा घोटा त्रास देत होता. पायाच्या अंगठयात पिंगपॉंग आकाराच्या अंतरामुळे खेळताना तिच्या पायावर ताण येऊन पाय चुकीच्या ठिकाणी पडत होता. कोरोनाच्या लॉकडाऊनचा उपयोग तिने आपले पाय मजबूत करण्यासाठी केला. यासाठी तिला तिच्या मामाची खूप मदत झाली. मामाने घरच्याघरी बनवलेल्या बेबी बार्स वर हातावर संतुलन साधण्याचा सराव करत होती. तिच्या मामानं वापरात नसलेले पडदे, फोम आणि चिंध्या यांच्या सहाय्यानं तयार केलेल्या मॅटवर श्रध्दाचा सराव सुरु होता. यासोबतच ती ध्यान धारणा करत होती . त्याचा उपयोग आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, मनाची ताकद वाढवण्यासाठी झाला. जागतिक स्पर्धेची निवडफेरी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडली. सुरुवातीला चौथ्या स्थानावर असलेल्या श्रध्दानं जराही न डगमगता ध्येयावर लक्ष केंद्रित करत तिसरं स्थान गाठलं. ऑलिम्पिक जिमनॅस्ट दीपा कर्माकर आणि प्रणती नायक यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. आणि श्रध्दानं सर्व फेर्‍यांमधे आपलं तिसरं स्थान टिकवून ठेवल्यामुळे श्रध्दाची निवड जागतिक कलात्मक जिमनॅस्टिक चॅम्पियनशिपसाठी झाली.

छायाचित्र:- गुगल

सतत इतरांकडून शिकत स्वत:मधे सुधारणा करण्याची आवड असलेली श्रध्दा ज्युनियर खेळाडूंच्या खेळाकडेही शिकण्याच्याच नजरेने बघते. जागतिक स्पर्धा गाठण्याचं तिचं एक ध्येय पूर्ण झालं असून आता ती पदकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज होते आहे. एक छोट्याशा गावातली मुलगी प्रयत्नांच्या बळावर कुठे पोहोचू शकते हे 27 वर्षांच्या श्रध्दानं दाखवून दिलं आहे. जिमनॅस्टिकसारख्या खेळात जिथे वय ही बाब खूप महत्त्वाची असते तिथे श्रध्दानं या वयातही जागतिक स्पर्धा गाठत ध्येयाच्या आड वय येत नाही हे सिध्द केलं आहे.