के पॉपचे दिवाने जगभरच आहेत. भारतातही तरुण मुलांना के पॉपची प्रचंड क्रेझ आहे. बीटीएसच काय अन्य बॅण्डच्याही आर्मी आहेत आणि तासंतास कोरिअन पाॅप गाणी, सिरीअल, सिरीज, सिनेमे आणि ब्यूटीसह फूडही एक्सप्लोअर करणारे अनेक आहेत. के पॉपशी असलेला कनेक्ट असा की त्यांच्यासाठी वाट्टेल ते करायला अनेकजण तयार असतात. मात्र तरीही इतके दिवस आपण त्या बॅण्डचा भाग असावं हे स्वप्न लांब होतं. आता ते स्वप्नही टप्प्यात येऊ लागलं आहे. ओडिशातली श्रीया लेंका ही १८ वर्षांची मुलगी पहिली भारतीय के पॉप स्टार आता होणार आहे. ब्लॅक स्वॅन नावाच्या ग्रुपची ती सदस्य झाली आहे आणि त्यांच्या पुढच्या अल्बममध्ये ती काम करणार आहे. २०२०मध्ये हा ब्लॅक स्वॅन ग्रुप सुरु झाला आणि त्यांचा एक सिनिअर सदस्य सोडून गेल्यानं त्यांनी जगभर शोध सुरु केला आपल्या बॅण्डमध्ये सामील होऊ शकेल अशा तरुण-तरुणींचा. ४ हजार अर्ज आले त्यातून भारतीय श्रीया आणि ब्राझीलच्या गॅब्रिलाची निवड झाली.
(Image : Google)
एखाद्या के सिरीअलसारखी वाटावी ही कहाणी. श्रीयाच्या वाट्याला ही के पॉप कहाणी आली तेव्हा सगळं जग कोरोना लॉकडाऊनमध्ये बंद होतं. त्याकाळात तिला या ग्रुपच्या ऑडिशनविषयी नेटवरच कळलं. तिनं एक नाही अनेक ऑडिशन्स दिल्या. आणि त्यातून मग तिचं सिलेक्शन झालं. तिला ट्रेनिंगसाठी ५ महिने कोरियाची राजधाीन सेऊलला बोलावण्यात आलं. आणि आता जाहीर करण्यात आलं की ती के -पॉप बॅण्डची सदस्य असणार आहे.
(Image : Google)
ओडिशातला रुरकेला जिल्ह्यातली ही तरुणी. के पॉप दिवानी. वडील खासगी नोकरी करतात. त्यांना मुलीचं हे वेड माहिती होतं. त्यात तिला लहानपणापासून गाण्याची आवड. वयाच्या १२ व्या वर्षापासून ती ओडिशी नृत्य शिकते आहे. याशिवाय हिपहॉप, फ्री स्टाइल, कंटेपरररी पण शिकते आहे. के पॉपचे गाजलेले ग्रो एमव्ही तिनं पाहिलं तेव्हापासून तिला के पॉपचा नाद लागला. त्यानंतर ती ऑनलाइन कोर्सेस करुन कोरिअनही शिकली.
आणि आपण केवळ आर्मी न राहता या बॅण्डचा एकदिवस भाग होऊ असं तिनं स्वप्न पाहिलं..
जे आता खरं होऊ घातलं आहे..
के पॉपच्या दिवानगीत ही आणखी एक भर आहे..