वीणा कुलकर्णी
चंदनाचा सहवास अन् त्या सुगंधात न्हाऊन निघण्याचे सौभाग्य या जन्मी मिळावे, यापेक्षा जिवनाची सार्थकता ती काय..! पण आजही मनाला हुरहुर लागून राहते, असंख्य आठवणींच्या झुल्यावर मन हिंदोळते, चंदनाच्या परिस्पर्शाकरिता पुन्हा पुन्हा मन ओढ घेते अन् वाटते माझ्या हातातून मिठीतून नव्हे श्वासातून अचानक काही निसटून तर गेले नाही? क्षणभर असा भास होतो. पण पुन्हा मन भुतकाळात धाव घेते मग सारा सारीपाट नव्याने समोर उभा राहतो. लक्षात येते अरे, आपल्याला काहितरी गमावले असे जे काही वाटते आहे. ते तसे नाहीच आहे मुळी! (Inspiration) माझ्या अवतीभवती, हृदयात, श्वासात, चोहीकडे, कणाकणात तो नाद. तेच स्वर गुंजन करित आहेत. तेच माधुर्य, तोच परिमळ साऱ्या आसमंतात पसरलेला आहे ही जाणीव सातत्याने होणे देखील किती आनंददायक आहे, नाही?(Singer prabha atre, source of great inspiration, her love for music and passion gives hope for life.).
खरंतर मी मूळची हुबळीची. माझ्या सोळाव्या वर्षी मला आदरणीय प्रभाताई म्हणजेच महान गायिका प्रभा अत्रेंचा सहवास लाभला. आमच्या घरात संगीतचे वातावरण होते. माझे स्वर्गीय वडील श्री. रामचंद्र गुंडो देसाई हे कर्नाटकातील प्रसिद्ध संगीतकार आणि हार्मोनियम वादक होते. प्रभाताई जेंव्हा जेंव्हा हुबळीला येत असत, तेंव्हा ते आमच्या घरी राहात. ‘मारु बिहाग’ आणि ‘कलावती’ या जगप्रसिद्ध रागांचे कितीतरी वेळ मी रेकॉर्डिंग ऐकले होते. पण मला ताईंना प्रत्यक्ष ऐकायचे होते. कुंदगोड ला त्यांची गानसभा होती ही माझ्याठी सुवर्ण संधीच होती. मी कार्यक्रमाला गेले अन् त्यांना ऐकून मंत्रमुग्ध झाले. त्यांचे गाणे मला चुंबकाप्रमाणे त्यांच्याकडे आकर्षित करित होते. मनाला थांबवू शकत नव्हते. त्याचवेळी निश्चय केला, ‘मला प्रभा ताईंचे शिष्य व्हायचे आहे.’ ....आणि तसे मी स्वप्न ही पाहू लागले. त्यांचे शिष्य होण्याचे स्वप्न म्हणजे अर्थातच मुंबई गाठणे आले आणि म्हणून मग माझ्यासाठी केवळ मुंबईतलेच स्थळ किंवा वर शोधायचा हा निर्णय पक्का ठरला.
लडाखचे पारंपरिक सिल्क वापरुन सोनम कपूरने बनवला खास ड्रेस! घातले आई आणि सासूचे दागिने
सुदैवाने डाॅ. रघुवीर कुलकर्णी यांची माझी ओळख झाली व २ डिसेंबर १९८८ मध्ये विवाह करुन मी मुंबईत आले. लग्नानंतर बरोबर दहा दिवसांनी म्हणजे १२ डिसेंबर रोजी माहिमला, प्रभा ताईंच्या राहत्या घरी मी भेटायला गेले. नंतर त्यांच्याकडे सतत जाणं येणं वाढत गेलं. आता आमच नातं केवळ एक गुरु-शिष्य एवढेच मर्यादित उरलेल नव्हतं तर त्यांच्या कुटूंबातील एक सदस्य म्हणून, मला त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवले.
तेंव्हापासून प्रभा ताई आणि माझे जवळपास छत्तीस वर्षांपासून घनिष्ठ संबंध-स्नेह आहे. मधल्या काळात त्यांच्याकडून मला केवळ संगीतातील धडे मिळाले नाही तर उत्तम जिवन जगण्याचे सुत्र त्यांच्या जीवनशैलीतून माझ्या मनावर परिणाम करत होते. कोणताही प्रसंग समोर उभा ठाकलेला असो त्याला त्या अगदी संयमाने, शांतपणे हाताळत असत. ‘संयम ढळू न देणे’ हे तत्व त्यांनी स्वतः अंगीकारले तर होतेच पण सोबतीला असणारी माणसेही त्यांना अशीच हवी असत. त्यांचे गुण, संगीताचे ज्ञान, त्यांची संगीतावरील निष्ठा, विद्यार्थ्यांना संगीत शिकवण्याची पद्धत याबद्दल मी बोलत राहिले तर शब्द अपूरे पडतील. त्याताई म्हणजे ज्ञानाचे भांडार होत्या.त्यांची प्रतिभा सर्वच बाबतीत अतुलनीय होती.
एक उत्तम शिक्षक, रचनाकार, चिंतनकार आणि विचारवंत म्हणून त्या ज्ञात होत्या खरंतर हे मी सांगायला नको. ‘सरगम’ विषयावरील संशोधन आणि एकूणच त्यांनी संगीत क्षेत्रातील कामगिरी मोठी होती. एकाच व्यासपीठावर ११ पुस्तकांचे लेखन आणि प्रकाशन करण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. असा विक्रम आजवर कोणीही केलेला नाही. स्वरंगी, स्वरंजनी, स्वरमयी ही स्वरचीत बंदीशांची पुस्तके तर ‘अंतस्वर’ या पुस्तकामधे त्यांनी स्वतःचा संगीत किंवा जीवन प्रवास म्हणूया केवळ चारोळीच्या माध्यमातून आपल्यासमोर फार सुंदर पद्धतीने आणून ठेवलेला आहे. संगीत क्षेत्रातच्या वाटेवरील अनेकांना मार्गदर्शन करणारी ही पुस्तके नक्कीच महत्वपूर्ण ठरतात. ‘स्वरयात्री’ सारखी इतर अनेक पुस्तके लिहिली आणि प्रकाशित झाली.अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मुक्तपणे आपले ज्ञान दिले आहे.
कोणताही विषय नीट शिकण्याची ताकद त्यांच्यात होती. वयाच्या ९२ व्या वर्षीही त्यांची ही आवड कमी झाली नाही. मला अजून खूप शिकायचे आहे, मी अजूनही विद्यार्थी आहे, असे त्या नेहमी म्हणत असत. “जीवन ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे”. हा त्यांचा महान गुण खरोखरंच अंगीकार करण्यासारखा आहे.
ताईंचे एक वैशिष्ट्य मला इथे प्रकर्षाने नमुद करावेसे वाटते. ताई हव्या त्या रागात अर्थपुर्ण बंदीशीची रचना करून ऑन द स्पॉट एखाद्या मैफलीत सादर करत असत. असाच एक किस्सा मी आपल्या सोबत शेअर करु इच्छिते, एकदा आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो. विमानाचा प्रवास करुन पहाटे तीन वाजता तिरुपतीला पोहंचलो. दुपारी लाईव्ह कार्यक्रम होता. व्यंकटेशाच्या दरबारी मी जूने सादर करावे? स्वतःच्याच मनाला त्यांनी प्रश्न विचारला अन् क्षणाचाही विलंब न लावता झरझर चार ओळी लिहून काढल्या...
हे गोवींदा, व्यंकटरमणा, जिवन मेरा मंगल करना, हे जग माया दुखः का मेला,कोई न अपना झुठा नाता, आयी शरण में हे श्रीनिवासा, जिवन मेरा मंगल करना*
भगवान विष्णू प्रती निस्सीम भक्तीचे हे आर्त भाव भजन मनातून अपसूक कागदावर उतरले अन् रसिकांच्या साक्षीने राग भैरवीतून परमेश्वराच्या चरणी लीन झाले.
एखाद्या मनुष्यात किती लिनता असावी आपल्या नावाची कीर्ती, जगभर प्रसिद्धी होते आहे याच वार ही कधी अंगाला लागू दिले नाही. कार्यक्रमासाठी कुठेही बोलवणे असो, भौगोलिक स्थान, स्थिती,तिथले वातावरण किंवा जिथे बसून आपण गाणार आहोत तो मंच देखील केवढा, कसा उभारण्यात आला आहे याकडे चिकित्सक दृष्टीकोनातून कधीच पाहिले नाही. एखाद्या रागाचा रियाज तुम्ही तासंतास करा पण कार्यक्रमाच्या ठिकाणी दिलेल्या वेळेत आपली तयारी काय असावी, मांडणी कशी करावी अन् राग पेश करत असतानाची पद्धती, चेहर्यावरील हावभाव, हातवारे, बसणे उठणे कसे असावे, हे सार ज्ञान ते आम्हाला, सर्व विद्यार्थ्यांना देत असत.
आलिया ते रकुल नवरीला हवी पेस्टल शेड! भडक रंग टाळून फिकट रंगाचा का आला ट्रेण्ड?
प्रभा ताईंना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, कालिदास सन्मान, टागोर रत्न यांसारखे भारत सरकारचे सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाले. ‘भारतरत्न भीमसेन जोशी सन्मानपत्र’ मिळाले याबद्दल त्यांना नितांत आदर तर होताच, हे त्यांनी प्रेमाने स्वीकारले तरी ‘श्रोते’ हाच माझा खरा सन्मान, हीच माझी उपाधी असा त्यांचा मनापासून विश्वास होता.
१९९६ मध्ये नवीन पनवेल येथे मी श्री शांताराम शास्त्रीय संगीत महाविद्यालय चालवत होते, त्यावेळी प्रभा ताईंचे माझ्या शाळेतील मुलांचे कलागुण व प्रत्येक घडामोडीवर जाणीवपूर्वक लक्ष होते. सारं काही शिस्तबद्ध तसेच संगीत हा विषय रितसर पद्धतीतून तळमळीने, तन्मयतेने खरोखरंच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचते आहे असे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुण्याचे मुळ “स्वरमयी गुरुकुल” या विद्यालयाची एक शाखा म्हणून जोडून घेतले. हा माझ्या प्रतिचा मोठा विश्वास होता. त्याच विश्वासाचा मान ठेवून आजतागायत मी हे महाविद्यालय चालवत आहे. हे सर्व प्रभाताईंच्या आशीर्वाद, प्रोत्साहन आणि प्रेम यामुळे तर आहेच पण आवर्जून उल्लेख करावासा वाटतो माझे पती रघुवीर आणि मुलगी पुर्णा यांच्या संपुर्ण पाठिंब्यामुळे शक्य आहे. जवळपास ३६ वर्षे मी त्यांना त्यांचा शिष्य म्हणून पाहिले आहे, मी त्यांना कधीही कोणावरही दोषारोप करताना, हलके बोलताना पाहिलेले नाही.
वयाच्या ९२ व्या वर्षीही त्यांचा दिनक्रम अतिशय शिस्तबद्ध होता. रियाझ योगासन, प्राणायाम, ध्यान, देवाची आराधना नित्यक्रम कधीही चुकला नाही.
गायिका असण्यासोबतच जिवनातील अन्य कर्तव्य अन् जबाबदारी याकडे पुरेपुर लक्ष होते. ‘नाही’ हा शब्द बहुदा त्यांच्या शब्दकोशात नसावा. सकारात्मकता ही त्यांच्या रोमरोमात मुरली होती. प्रभा ताई म्हणजे साक्षात सरस्वतीचे रुप ! त्यांच्याबद्दल लेखणी घेऊन लिहायला बसणे म्हणजे तळहातावर आकाश दाखवण्यासारखेच! असे पूज्य गुरू मिळाल्याने मी खरोखरच धन्य आहे.