प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या या सहज शक्य करता येतात. दोन बहिणींनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. दोघींनी लिलावात एक घर विकत घेतलं आणि ChatGPT वापरुन स्वतः त्या घराचं नूतनीकरण म्हणजेच रिनोव्हेशन केलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी तब्बल १०२१० डॉलर वाचवले आहेत.
२५ वर्षीय हीथर रॉबर्ट्स आणि २१ वर्षीय अन्या ह्यूजेस या दोघींनी मे २०२४ मध्ये १७८,६८६ डॉलर्सना त्यांचं पहिलं अपार्टमेंट खरेदी केल्यावर हे मोठं काम हाती घेतलं. त्यांचं घर पूर्णपणे रिनोव्हेशन करण्याची आवश्यकता होती आणि पैसे वाचवण्यासाठी बहिणींनी YouTube, TikTok व्हिडीओ आणि अगदी ChatGPT वापरून स्वत: विविध स्किल्स शिकून घेतली.
न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या बहिणींनी घेतलेल्य धाडसी निर्णयापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे. हीथर म्हणाली की, "आवश्यकतेनुसार आम्ही हे काम स्वतः करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघीही स्त्रीवादी आहोत. त्यामुळे आम्हीच हे काम करायला सुरुवात केली. आम्हाला फक्त हे दाखवायचं होतं की जर आम्ही हे करू शकतो तर कोणीही हे करू शकतं."
“आम्ही फक्त आधी विचार केला की आम्ही भिंतींवर थोडासा रंग लावू आणि नवीन कार्पेट घेऊ. आम्ही त्यावर काम करायला सुरुवात केली आणि सर्व काही बिघडू लागलं. हा खूप मोठा प्रोजेक्ट होता. प्लंबिंग, री-वायरिंग आणि स्वयंपाकघर आणि इतर फिटिंगसाठी इतरांची मदत घेण्याऐवजी उर्वरित काम आम्ही केलं. माझ्या मित्राचा भाऊ मदत करणार होता पण त्याला त्याचच खूप जास्त काम होतं, त्यामुळे आम्हीच केलं."
"आम्हीच बिम लावले आणि फ्रेम्स तयार केल्या. बिल्डरकडून मिळालेल्या एका छोट्या ट्युटोरियलनंतर मी स्वतः सर्व खिडक्या तयार केल्या. बाथरूमला टाइल्स लावले. आम्हाला ऑनलाईन खूप चांगला प्रतिसाद मिळाला. दर आठवड्याला ३० तास काम केलं. बहीणही अभ्यास करून मदत करायची. घराला रंग देण्यासाठी तीन आठवडे लागले."
"पेंटर ठेवला असता आणि सुताराची गरज पडली असती तर किती खर्च आला असता मला माहीत नाही. स्वत: रिनोव्हेशन करून अंदाजे १०२१० डॉलर्स वाचवले आहेत. गोष्टी कशा दुरुस्त करायच्या याच्या अनेक टीप्स ऑनलाईन मिळाल्या. सोशल मीडियाचा खूप वापर झाला. आम्हाला टिकटॉकवर बरंच काही सापडलं. आम्ही अधूनमधून YouTube व्हिडीओ पाहायचो. ChatGPT चा वापर करायचो" असं देखील हीथरने म्हटलं आहे.