Join us  

पोरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच! सोलापूरच्या तरुणीची हार्वर्ड विद्यापीठात निवड; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश...

By appasaheb.patil | Published: October 27, 2022 4:12 PM

Solapur Student Pooja Gunjal Selected in Harvard University for Aspire Leader Program : विशेष म्हणजे अत्यंत कठीण अशा पाच वेगवेगळ्या टप्पे पूर्ण करत तिने हे यश संपादन केले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना भविष्यात काही स्टार्टअप किंवा करिअरच्या संदर्भात लीडरशिप करायचे असेल तर आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी विद्यापीठाकडून मदत केली जाते.इतक्या लहान गावात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक संधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.

अप्पासाहेब पाटील

जगातील नामांकित विद्यापीठामध्ये आपण शिक्षण घ्यावे अशी अनेकांची इच्छा असते. पण कधी त्याबाबतची योग्य माहिती नसल्याने किंवा कधी आर्थिक परिस्थिती नसल्याने आपण तिथपर्यंत मजल मारु शकत नाही. मात्र अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेल्या सोलापूरच्या कन्येने ही मजल मारुन दाखवली आहे. अमेरिकेतील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित हार्वड विद्यापीठाच्या अस्पायर लीडर प्रोग्रॅम (Aspire Leaders Program) मध्ये करमाळा तालुक्यातील भगतवाडीतील कृषी कन्या पूजा शंकर गुंजाळ हिची जगभरातून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अत्यंत कठीण अशा पाच वेगवेगळ्या टप्पे पूर्ण करत तिने हे यश संपादन केले आहे (Solapur Student Pooja Gunjal Selected in Harvard University for Aspire Leader Program).  

जगभरातून आलेल्या ३६४ प्रतिनिधींमध्ये पूजाची निवड करण्यात आली. यामध्ये अमेरिका ,रशिया, चिली, नायजेरिया इत्यादी देशांच्या प्रतिनिधींसोबत पूजा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. विशेष म्हणजे पूजा ही महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी आहे. या यशामागे माझ्या  आई-वडील आणि भावांचा सर्वात मोठा वाटा आहे असे पूजा सांगते. त्यांनी खंबीरपणे प्रोत्साहन दिल्याने आपण हे यश संपादन करु शकलो असे पूजाचे म्हणणे आहे. त्यामुळे छोट्याशा गावातील मुलगी अमेरिकेतील विद्यापीठात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत आहे ही मराठी म्हणून आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर सर्व काही शक्य आहे असे पूजा म्हणाली.

(Image : Google)
   पूजाचे प्राथमिक शिक्षण- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा भगतवाडी माध्यमिक शिक्षण शहाजीराजे उमाजी राजेभोसले हायस्कूल जिंती येथे झाले असून पदवी शिक्षण- डॉ.बुधाजीराव मुळीक कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजीनियरिंग मांडकी- पालवण, दापोली विद्यापीठ येथे झाले आहे. महिलांसाठी मासिक पाळी या विषयावर पूजा काही वर्षांपासून संशोधन करत आहे. पाळीसंबंधी समस्या आणि आरोग्याबाबत उद्भवणाऱ्या समस्यांवर ती अभ्यास करत आहे. पुण्यातील समाज बंद या संस्थेच्या माध्यमातून ती सध्या सांगली जिल्ह्यातील महिलांसाठी काम करत आहे. इतक्या लहान गावात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक संधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. मात्र त्यांना योग्य ती माहिती मिळाल्यास ते संधीचे सोने करुन दाखवतात हेच खरे. 

काय आहे अस्पायर लीडर प्रोग्राम ?

हार्वर्ड विद्यापीठात दरवर्षी जगभरातील विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल प्रोग्राम आयोजित केला जातो. त्यामध्ये ज्या परिवारातील विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न फारच कमी आहे अशा १८ ते २६ वर्ष वयोगटातील विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. हा एक प्रतिष्ठित प्रोग्राम असून यामध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात काही स्टार्टअप किंवा करिअरच्या संदर्भात लीडरशिप करायचे असेल तर आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी विद्यापीठाकडून मदत केली जाते.

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीविद्यार्थीशिक्षणविद्यापीठ