(छायाचित्र - नम्रता फडणीस)
आषाढी वारी म्हणजे अनेकांसाठी विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचा एक मार्ग. एकदा तरी आषाढी वारी (Ashadhi Wari) करत विठूमाऊलीला भेटावे अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते. आषाढी एकादशी जवळ येते तशी विठ्ठलाला भेटण्याची आस लागते आणि पाऊले नकळत पंढरपूरच्या दिशेने जायला लागतात. कित्येक दिवसांचा पायी प्रवास करत लाखोंच्या संख्येने गेली अनेक वर्ष पंढरपूरला जाणारे वारकरी म्हणजे भक्तीचा मळाच जणू (Palkhi). अगदी लहानपणापासून एकदाही वारी न चुकवलेले असंख्य जण या वारीत आपल्याला दिसतात. पण जसे वय वाढत जाते तशी पायी वारी करणे काहीसे कठिण होते. पण विठ्ठलाची ओढ वारकऱ्याला शांत बसू देत नाही, त्यामुळे वारीला जाता आले नाही की मनाला रुखरुख लागते (Pandharpur).
अशाच एका माऊलीला आपले वय झाल्याने आता आपल्याला वारीला जाता येत नाही याची काही वर्षांपासून रुखरुख लागली होती. आपल्या मनातील ही इच्छा या माऊलीने आपल्या मुलाकडे बोलून दाखवली. मुलानेही श्रावणबाळाप्रमाणे आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले आणि तिला वारीत सहभागी केले. या मुलाचे नाव आहे ज्ञानोबा (माऊली) नाईक तर या मातेचे नाव मुक्ताई नाईक असे आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी आपल्या आईला वारीला न्यायचे पण कसे हा प्रश्न माऊली यांच्यापुढे होता.
श्रावणाबाळाने ज्याप्रमाणे आपल्या अंध आई-वडिलांना कावडीमधून तीर्थयात्रेला नेले त्याप्रमाणे माऊली यांनी व्हिलचेअरमध्ये बसून आपल्या आईला वारीला आणण्याचे ठरवले. देहू ते पुणे हा वारीचा पहिला टप्पा चांगल्या पद्धतीने पूर्ण झाल्याचे माऊली म्हणाले. गोदावरी काठी असलेले रामपुरी बुद्रुक हे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या गावातून हे दोघेही वारीला निघालेले. या गावातील अनेक वारकरी शेकडो वर्षापासून पंढरीला जातात. मुक्ताबाईही लहानपणापासून पंढरपूरला वारीला जात होत्या, पतीचे निधन झाल्यानंतरही त्या एकट्या वारीला जात असत. मात्र आता वय झाल्याने त्यांना वारीला जाणे जमत नव्हते. पण मुलाने त्यांची ही इच्छा पूर्ण केल्याने ही माऊली कृतकृत्य झाली असणार हे नक्की. आईची वारीला जाण्याची इच्छा पूर्ण करणाऱ्या माऊली यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.