ती काय करू शकते? हा मुळी आता प्रश्नच उरलेला नाही.. मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सहनशील वृत्ती हे सगळं तर तिच्याकडे आधीपासूनच आहे.. तिला फक्त गरज होती, ती एक संधी मिळण्याची.. एकदा फक्त एकदा तिच्या पंखांना बळ देण्याची... संधी आणि थोडंसं प्रोत्साहन या दोन गोष्टी मिळाल्या आणि सुरू झाला तिचा प्रवास.. प्रवास खडतर होताच, यात वाद नाही. पण तिच्या अंगी असणारे गुण तिची वाट सुखकर करत गेले.. म्हणूनच तर आज (International Women's Day 2022) पाळण्याची दोरी ते अवकाश झेप अशी भरारी घेणाऱ्या तिचा सन्मान गुगलनेही (Google Doodle) केला आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त (International Women's Day 2022) गुगलने एक छानसं गुगलडूडल केलं असून यामध्ये महिलांच्या कर्तृत्वाची विविध रूपे दाखविली आहेत. Doodle Art Director ठोका माईर (Thoka Maer) यांनी ते डिझाईन केलं आहे. ७ ते ८ स्लाईड्स असणारे हे डूडल खरोखरीच महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत, हे दाखविणारे आहे. सगळ्यात पहिल्या स्लाईडमध्ये तर अगदी एका चिमुकल्या मुलीपासून ते वयस्कर आजीपर्यंत वेगवेगळी स्त्री रुपे दाखवली आहेत.
यानंतर दुसऱ्या चित्रात तर जे दाखवलं आहे, ते आजच्या बहुसंख्य वर्किंग वुमन करत आहेत. अतिशय बोलकं असणारं हे चित्र आजच्या अनेक महिलांचं वास्तव आहे. यामध्ये असं दाखवलंय की एक वर्किंग वुमन वर्क फ्रॉम होम करत आहे. घरात लॅपटॉपवर काम करते आहे. तिच्या बाजूला तिचं मोठं अपत्य काही तरी स्क्रिन बघत आहे. तिला त्याच्याकडेही वारंवार लक्ष द्यावं लागत आहे, ऑफीसचं काम तर ती सांभाळतेच आहे, शिवाय तिच्या कुशीत तिचं तान्हं बाळ असून ती त्यालाही फिडिंग करत आहे. एकाच वेळी एवढ्या आघाड्या यशस्वीपणे सांभाळणारी व्यक्ती स्त्री च असणार यात आता शंका नाही...
यानंतरच्या काही स्लाईड्समध्ये स्त्रिया आज वेगवेगळ्या क्षेत्रात मग ते अगदी एखादी कला असो की तांत्रिक गोष्टी असो, यामध्ये कशा यशस्वीपणे काम करत आहेत, हे दाखविण्यात आलं आहे. बागकाम, शिवणकाम यासोबत मेडिकल, इंजिनियरिंग या क्षेत्रात असणारी स्त्रियांची यशस्वी झेप म्हणजे आजचे गुगल डूडल आहे. प्रत्येक स्त्रीने बघावे अगदी असेच.. ते पाहिल्यावर आपण स्वत:ला नक्कीच त्यापैकी एखादीशी मॅच करू शकतो, एवढं ते वास्तविक झालं आहे.