सायली जोशी-पटवर्धन
गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटतात, पुण्यातील फाल्गुनी गोखले (Falguni Gokhle) या महिलेने हे सिद्ध करुन दाखवले आहे. कॅनडा सरकारमध्ये उच्च पदावर काम करणाऱ्या त्यांच्या बहिणीला मेंदूशी निगडित आजार झाला. तीन बहिणींमध्ये सर्वात हुशार आणि स्वतंत्र असलेल्या आपल्या बहिणीची अवस्था फाल्गुनी यांना बघवत नव्हती. स्वत:च्या बळावर आयुष्यात अनेक गोष्टी साध्य करणाऱ्या आपल्या बहिणीला स्वत:च्या हाताने जेवता येत नाही ही गोष्ट पचवणे फाल्गुनी यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खचवणारी होती. बहिणीची काळजी घेताना इतर गोष्टी आपण करु पण तिला किमान स्वत:च्या हाताने नीट जेवता यायला हवे असे मनापासून वाटत असल्याने फाल्गुनी यांनी यावर काय करता येईल असा विचार सुरू केला. आपले पती सतीश गोखले यांच्या साथीने त्यांनी विशिष्ट आजार असलेल्या रुग्णांसाठी अतिशय कल्पक वेगळ्या पद्धतीच्या डिनरवेअर सेटची निर्मिती केली. श्रेयसा डिग्निटी डिझाइन असे या डिनरवेअर सेटचे नाव आहे.
अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (ALS) आणि मोटर न्यूरॉन डिसीज (MND) असलेल्या लोकांना या डिनर सेटचा अतिशय फायदा होणार आहे. ALS, MND, पार्किन्सन आणि इतर न्यूरोमोटर विकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांना असलेल्या आजारामुळे त्यांच्या दैनंदिन हालचालींवरही बऱ्याच मर्यादा आलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून पुण्यातील फाल्गुनी गोखले यांनी आपल्या पतीच्या मदतीने उत्तम असा डिनरसेट तयार केला आहे. स्वत:च्या हाताने जेवता आल्यामुळे ALS, MND, पार्किनसन्स आणि यांसारख्या इतर आजाराचे रुग्ण सन्मानाने जगू शकतात. या सेटमुळे रूग्णांच्या जीवनाची गुणवत्ता तर सुधारतेच पण त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटण्यास मदत होते. याबाबत बोलताना फाल्गुनी गोखले सांगतात, “2018 मध्ये माझी धाकटी बहीण माधवी पटेल हिला अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (ALS) झाल्याचे समजले, त्यावेळी तिची काळजी घेणारी मी एकटीच होते. माधवी 2019 पर्यंत तिच्या स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवू शकत होती, परंतु ALS हा आजार वेगाने शरीरावर ताबा मिळवत असल्याने तिने हळूहळू स्नायूंचे नियंत्रण गमावण्यास सुरुवात केली.
काय असतो ALS हा आजार?
ALS ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामध्ये मेंदू आणि पाठीचा कणा यांना जोडणारा आणि शरीराचा विविध संदेश पुरवणाऱ्या मोटर न्यूरॉन्सला हळूहळू नुकसान पोहोचायला सुरुवात होते. कालांतराने हा आजार वाढत जातो तसा मेंदूकडून स्नायूंना संदेश मिळणे कमी कमी होत जाते.
कशी झाली डिनर सेटची निर्मिती
फाल्गुनी म्हणतात, जानेवारी २०२० मध्ये ४६ वर्षांच्या माधवीची प्रकृती जास्त बिघडली. त्यावेळी तिच्या हातात मूलभूत गोष्टीही राहू शकत नव्हत्या. हात आणि तोंड यांचा समन्वय राहत नसल्याने तसेच ताटलीतील पदार्थ उचलून तोंडात घालणे या लोकांसाठी अवघड असते. त्यामुळे त्यांना जेवणही चमच्याने भरवावे लागते. या परिस्थितीचा या रुग्णांच्या मनावर खोलवर परिणाम होतो आणि ते आहेत त्याहून जास्त अस्वस्थ होतात. आयुर्वेदीक उपचारांसाठी माधवी पुण्यात असल्याने तिचा जेवतानाचा झगडा पाहून खूप वाईट वाटायचे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मेंदूच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हा डिनरसेट अतिशय उत्तम उपाय ठरु शकतो. आपली बहिण पुन्हा एकदा स्वतंत्रपण खाऊ शकेल आणि सन्मानाने जगू शकेल या गोष्टीचा ध्यास असल्याने आपण हा डिनरसेट तयार करण्याचे ठरवले.
कसा आहे डिनर सेट
यामध्ये एक वाटी, एक लहान ताटली आणि एक मोठे ताट यांचा समावेश करण्यात आला आहे. या सगळ्या भांड्यांना पुढच्या बाजूला गोलाकार काठ देण्यात आले आहेत. या डिझाईनमुळे चमचा अन्नाला प्लेटच्या वक्र काठावर ढकलतो जिथे रुग्णांना सहजपण अन्न चमच्यावर घेता येते. या भांड्यांची रचना फाल्गुनी यांची असून त्याचे उत्पादन त्यांच्या पतीने केले आहे. सुरुवातीला या भांड्यांचा प्रयोग पितळ धातूवर करण्यात आला आणि त्यानंतर स्टीलची भांडी तयार करण्यात आली. ही उत्पादने आर्थिकदृष्ट्या परवडणारी असून येत्या काळात त्याचा परवाना घेण्याबरोबरच सिरेमिक, पोर्सिलेन आणि काच यांसारख्या मटेरीयलमध्ये ही भांडी तयार करता येऊ शकतात.
ALS आजाराचा सामना करणाऱ्या माधवी म्हणतात...
या भाड्यांमधून जेवण्याच्या अनुभवाबाबत माधवी म्हणतात, मी ताटातून अन्न सहज काढू शकते आणि आरामात तोंडात घालू शकते. आता आपल्याला स्वत:च्या हाताने जेवता येणार नाही असे वाटत असतानाच फाल्गुनी आणि तिच्या पतीने माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या इतर रुग्णांसाठी केलेला हा कल्पक प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे. अशाप्रकारच्या सहाय्यांमुळे या परिस्थीतीतून जाणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाई यांच्यात अतिशय सकारात्मकतेची भावना निर्माण होईल, इतकेच नाही तर त्यांनासन्मानाने जगता येईल.
याबाबत पुण्यातील केईएम हॉस्पिटलच्या जनरल अॅडमिनिस्ट्रेटर शिरीन वाडिया म्हणाल्या, “विशेषत: कमकुवत मोटर फंक्शन असलेल्या लोकांसाठी डिझाइन केलेल्या या प्लेट्सची आजच्या जगात खरी गरज आहे. या रुग्णांचे जगणे सुकर करण्याबरोबरच त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे.’’