अफगणिस्तानमध्ये सुरक्षित वातावरणात त्यांचा खेळ सुरू झाला होता. पण अचानक तालिबानी वादळ आलं आणि अफगाणी लोकांचं मनमुक्त जगणं पुन्हा एकदा संकटात सापडलं. या संकटातून बाहेर पडायचं असेल, मनमुक्त जगायचं असेल, तर देश सोडून पळून गेल्याशिवाय पर्याय नाही, हे जुन्या जाणत्या मागच्या पिढीने बरोबर हेरलं. मुलाबाळांच्या स्वप्नांसाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मग देश सोडून जिकडे वाट फुटेल, तिकडे जाण्याचा प्रयत्न केला. असाच संघर्ष करून अफगणिस्तानचा संघ त्यांच्या पालकांसह पोर्तूगीज येथे गेला आहे.
या संघात आहे सराह. तिची आई देखील तिच्यासोबतच आहे. मायदेश सोडताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन निघालो होतो. तिथे आम्ही खूप भितीमध्ये जगत होतो. आज आपल्या देशाची, आपल्या घराची खूप आठवण येते. पण तरीही आज आम्ही इथे मोकळा श्वास घेतो आहोत, मोकळेपणाने जगत आहोत, याचं विलक्षण समाधान वाटतं असंही साराने सांगितलं. सारा म्हणते की आता इथे पोर्तूगीजमध्ये मला माझी सगळी स्वप्न पुर्ण करता येतील. मनमुक्त जगता येईल.
प्रत्येक मुलीची असतात तशी सराहची देखील अनेक स्वप्ने आहेत. तिला आता तिचा खेळ म्हणजेच फुटबॉल मुक्तपणे खेळायचा आहे. स्टार स्ट्रायकर क्रिस्टिनो रोनाल्डो यांना भेटण्याचं देखील सराहचं स्वप्न आहे. सराह म्हणते मला भविष्यात व्यावसायिक फुटबॉलपटू तर व्हायचंच आहे, पण त्यासोबतच मला एक मोठी बिझनेस वुमन व्हायचं आहे. माझ्या देशात मला पुन्हा जाण्याची इच्छा आहे, पण अर्थातच तिथे जर महिलांसाठी सगळं सुरक्षित असेल तरचं.
अफगणिस्तानात आता नव्या सरकारी नियमानुसार १५ वर्षांवरील मुलींना कोणताही खेळ खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जर मुलींना खेळण्याचे त्यांचे स्वप्न पुर्ण करायचे असेल तर दुसरा देश गाठल्याशिवाय त्यांना पर्याय नाही, असं अफगणिस्तानच्या महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक फरखुंदा मुहताज यांनी सांगितलं. अफगाणी महिला फुटबॉल संघाने देश सोडून पोर्तुगीजमध्ये यावं आणि सुरक्षित रहावं म्हणून मुहताज यांनी खूप मुख्य भूमिका पार पाडली. संघासोबतच मुलींचे पालक, भावंड असे एकूण ८० जणं सध्या पोर्तुगीज येथील लिसबन येथे आहेत. लिसबन येथे सगळा संघ जेव्हा मुहताज यांना पहिल्यांदा भेटला तेव्हा अनेक जणींना अश्रू आवरणे कठीण झाले होते.