नादिया नदीम (Nadia nadim) ती मुळची अफगणिस्तानची. तिथे तालिबान्यांच्या छळछावणीतून कशीबशी सुटली. जायचं होतं इंग्लंडला पण पोहोचली डेन्मार्कला. आपला आणि आपल्या मुलींचा जीव वाचवायचा एवढंच माहिती होतं तिच्या आईला आणि तिला. डेन्मार्कला पोहोचल्यावर तिथेच शरणार्थी म्हणून जगणं सुरु झालं. आज तीच मुलगी नामवंत फुटबॉल खेळाडू आहे, फोर्ब्जच्या यादीत झळकते आहे. तिची ही गोष्ट.
नादियाची कहाणी आहेच खूप वेगळी. नादिया म्हणजे अफगणिस्तानच्या एका सुखवस्तू कुटूंबात जन्माला आलेली एक मुलगी. वडील रबानी अफगाणी फौजेत मोठे अधिकारी तर आई हमिदा एका शाळेची मुख्याध्यापिका. नादियाला चार बहिणी. ती आणि तिच्या बहिणी आई- वडिलांच्या छत्रछायेत आनंदात होत्या. पण १९९० च्या दशकात अफगणिस्तानमध्ये तालिबान पर्वाला सुरूवात झाली आणि बघता बघता सर्व काही उध्वस्त होऊ लागलं.
असाच एक आघात नादियाच्या कुटूंबावरही झाला. २००० साली नादियाच्या वडीलांना तालिबान्यांनी जिवानीशी मारलं. यामुळे एक हसरं कुटूंब उध्दवस्त झालं. जे झालं ते झालं पण आता आपल्या मुलींचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे, हे हमिदा यांना समजलं आणि त्यांनी मुलींना सोबत घेऊन अफगणिस्तानातून पळ काढला. त्या थेट पाकिस्तानच्या पेशावरमध्ये पाहोचल्या. पेशावरहून कराची आणि कराचीहून इस्लामाबादलाही आल्या. पण तेथेही काही सोय होईना. आसरा आणि सुरक्षितता मिळेना. त्यामुळे इंग्लंडमध्ये असणाऱ्या त्यांच्या काही नातलगांनी त्यांना सल्ला दिला आणि इंग्लंडला येण्याबाबत सुचविले.
हमिदा यांनी तशी तयारी सुरू केली. त्यांचा आणि मुलींचा बनावट पासपोर्ट काढून घेतला. पासपोर्ट मिळाल्यानंतर काही एजंट लोकांच्या मदतीने त्यांना एका ट्रकमध्ये बसवून देण्यात आले. आई आणि मुली जीव मुठीत घेऊन त्या ट्रकमधून इतर लोकांसोबत प्रवास करत होत्या. मागचा काळोख आपल्यासोबतच असेल का, असे अनेक विचारही डोक्यात घोंगावत होते. ट्रक थांबला तेव्हा त्यांना समजले की, त्या सगळ्याजणी आता इटलीला आल्या आहेत.
इटलीला पोहोचल्यावर त्यांच्यासारखेच काही शरणार्थी तेथे जमलेले होते. या सगळ्या शरणार्थींना पुन्हा एका गाडीत बसविण्यात आले आणि प्रवास करून एका जंगलात साेडण्यात आले. आजूबाजूला चौकशी केल्यावर समजले की ते डेन्मार्क आहे. डेन्मार्क सरकारने या सगळ्या लोकांना शरणार्थींच्या छावणीत भरती करून घेतले. हमिदा यांनी आता लंडनला जाण्याची आस साेडून दिली आणि मुलींसकट तेथेच राहू लागल्या. काही दिवसांनी हमिदा आणि त्यांच्या मुलींना डेन्मार्कच्या आल्बोर्ग छावणीत हलविण्यात आले. यावेळी नादिया केवळ १० वर्षांची होती.
अल्बोर्गला छावणीच्या बाजुच्या मैदानात काही स्थानिक मुली नादियाला नेहमी फुटबॉल खेळताना दिसायच्या. एका सुखवस्तू घरातली मुलगी आता त्या शरणार्थींच्या छावणीत एका आश्रितासारखे जीवन जगत होती. नादीया तासनतास त्या मुलींचा खेळ पाहत बसायची. त्यांच्यात जावे, आपणही खेळावे असे तिला खूप वाटायचे. एक दिवस तिला संधी मिळाली किंवा तिने ती मिळवली आणि त्या मुलींमध्ये जाऊन ती ही फुटबॉल खेळू लागली.
रोज फुटबॉल खेळून तिलाही सराव झाला आणि ती बारा वर्षांची असताना पहिल्यांदाच अल्बोर्गकडून मुलींच्या टीममध्ये स्थानिक मॅच खेळली. तिचा खेळ उत्तरोत्तर बहरत गेला आणि फुटबॉल प्लेअर म्हणून ती ओळखली जाऊ लागली. ती १८ वर्षांची झाली आणि तिला डेन्मार्कचे नागरिकत्व मिळाले. तसेच खेळातील नैपुण्य मिळवत तिने तोपर्यंत थेट डेन्मार्कच्या राष्ट्रीय संघातही स्थान पटकाविले होते.
आज नादिया डेन्मार्कची प्रसिद्ध फुटबॉल प्लेअर आहे. डेन्मार्कच्या टीममध्ये खेळणारी ती पहिलीच विदेशी खेळाडू आहे. इंग्लंड विमेन्स सुपर लीगमध्ये मँचेस्टर सिटीकडून खेळते. फॉरवर्ड स्ट्रायकर म्हणून तिच्या नावावर आज २०० पेक्षाही अधिक आंतरराष्ट्रीय गोल आहेत. अनेक भाषांवर प्रभुत्व असणारी नादिया अभ्यासातही हुशार आहे आणि वैद्यकीय शिक्षण घेत आहे.खेळातील करिअरमध्ये एक उंची मिळविल्यानंतर आता एक चांगला डॉक्टर होणे, हे नादियाचे स्वप्न आहे. भविष्याची कोणतीही शाश्वती नसताना, आपण ज्यात बसलो आहे ती गाडी आपल्याला कुठे घेऊन जात आहे, हे ही माहिती नसताना नादीयाने एक शरणार्थी म्हणून जीवनप्रवास सुरू केला होता. आज हाच प्रवास संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर तिला इथपर्यंत घेऊन आला आहे. तिचा हा प्रवास भुगोल आणि जगाच्या नकाशाच्या सगळ्या खाणाखुना मिटवून नवा इतिहास घडविणारा ठरला आहे.
युनेस्कोने नादियाला champion for girls and women education हा दर्जा देऊन सन्मानित केले आहे. कारण तिने खेळांमध्ये होणाऱ्या स्त्री- पुरूष भेदभावाविरूद्ध तीव्र लढा दिला होता. २०१८ साली फ़ोर्ब्सने प्रकाशित केलेल्या पत्रिकेत नादिया जगभरातील सगळ्यात बलशाली स्त्रियांच्या यादीत विसाव्या स्थानावर होती. मी जे काही काम करेल, ते माझ्याकडून सर्वोत्तमच व्हावे, हा नियम मी कसोशीने पाळते, असेही नादिया म्हणते.