- कॅन्सर पूर्ण बरा झालेली एक मैत्रीण
धावपळीच्या काळात कॅन्सर कधी खो देऊन गेला ते कळलच नाही. सर्व काही खूप छान. कामाची तसेच व्यायामाची खूप आवड. शांत न बसणे, काही तरी करत राहणे, आणि कोणत्याही गोष्टींचा खूप विचार न करणे असा माझा स्वभाव. सप्टेंबर २०२० मध्ये थोडे बरं वाटत नव्हते. दवाखाना केला पण बरेच वाटेना. एक दिवस रात्री खुप अंग दुखत होते. देवाशी बोलले अरे असे काय झाले मला की आठ-दहा दिवस झालेत अजुन बरं वाटत नाही, काही तरी मार्ग दाखव. तितक्यात आईचा फोन आला, म्हणाली उदया कोरोनाची टेस्ट करून घे, आणि ती तर पॉजिटिव आली. पण देवाची कृपा त्यातनं बाहेर आले.
एक दिवस कामावरून आले, फ्रेश झाले, देवाची पूजा केली, डोळे बंद केले तर मला काही तरी झाले आहे असे वाटले, तर मला कॅन्सर झाला आहे असे भासले. मी स्वतःशी बोलले असे असू शकते का, काहीतरीच. मग पुन्हा नेहमी प्रमाणे विचार न करणे, आणि सोडून देणे. त्यातच एप्रिल २०२१ मध्ये खुप गरम होत होते. एक दिवस रात्री झोपेत हाताला काही तरी जाणवले. दुसऱ्या दिवशी नवऱ्याला दाखवले आणि मुलीला सांगितले. “ठीक आहे आपण डॉक्टर ना दाखून देऊ,” असं ते म्हणाले. मग शनिवारी डॉक्टर कडे गेले, पण खूप गर्दी होती म्हणून निघून आले. पण हाताला जाणवत होते की ती गाठ कमी जास्त होत होती. पुन्हा १५ दिवसांनी शनिवारी डॉ. निवेदिता पवार यांच्याकडे गेलो. त्या म्हणाल्या, “तुला मॅमोग्राफी करावी लागेल.” त्यांनी जो पत्ता दिला, तिथे लगेच जाऊन ती केली. दोन दिवसांनी रिपोर्ट आले. डॉक्टर म्हणाल्या की काही तरी वेगळे वाटते आहे, तू स्पेशलिस्टकडे जाऊन दाखव. मी कोणाकडे जाऊ असे विचारल्यावर त्यांनी दोन-तीन नावे सुचवली, त्यात त्यांनी डॉ. राज नगरकर यांचे नाव सुचवले. मी म्हणाले, “लगेच जाते, तुम्ही त्यांना कॉल करता का?” त्यांनी माझ्या समोर कॉल केला आणि उद्या जा असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळीं लवकर गेले. तिथे डॉक्टर योगेश भेटले, रीपोर्ट बघून म्हणाले की बायप्सी करावी लागेल. दोन दिवसांनी रिपोर्ट आले, त्यात कॅन्सर आहे असे कळले. घरी आले, आई आली. विचारले, “काय रिपोर्ट आहेत?’ काय बोलावे, तिला काय सांगावे कळेना, रडू आवरेना. ढसाढसा रडले. मुलगी बोलली, “झाले रडून? आत्ता बस झाले. पुढे काय करायचे?" कॅन्सर कोठे कोठे पसरला आहे हे बघण्यासाठी पेटस्कॅन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. त्याप्रमाणे टेस्ट केली, त्याचे रेपोर्टस घेतले आणि डॉक्टरना दाखवले. डॉ. मकरंद भेटले. किमो, ऑपरेशन आणि रेडिएशन ठरले. आठ दिवसात पहिली किमो होऊन ट्रिटमेंटला सुरुवात झाली.
बराच त्रास झाला. किमो घेत असताना झालेला त्रास तर असह्य होता. त्यात केस गळणे हा प्रकार. मी सलग तीन दिवस उशीवर तोंड ठेऊन झोपले. डोक्यावरील केस जणू प्लास्टिक जसे जळते तसे आक्रसतांना जाणवत होते. जळल्यानंतर जशी आग होते तसे मी तीन दिवस सहन केले. किमो झाली की दुसऱ्या दिवशी पोटात इंजेक्शन घेणे खुप त्रासदायक होते. ही ट्रीटमेट पूर्ण होते तितक्यात ऑपरेशन आणि पुढे पंधरा दिवसात रेडिएशन. साईड इफेक्ट होतेच. मळमळ होणे, जेवण नं जाणे. एक दिवस तर मला खूप त्रास झाला सकाळी खुप उलट्या आणि त्यातून रक्त पडत होते. आणि त्याचा वास! आजही आठवले तर अंगावर काटा येतो.
तसेच डॉक्टर नगरकरांकडे गेले आणि सांगितले की मला पुढे ट्रिटमेंट घ्यायची नाही. त्यांनी पंडित सरांना कॉल केला, तेव्हा त्यांनी सांगितले की, “आता पुढचे रेडिएशन कमी पॉवरचे आणि खूप माइल्ड असतील. त्या नेहेमी खुप पॉजिटिव्ह असतात पण आत्ता पुढील ट्रीटमेंट घेणार नाही असे म्हणत आहेत.” तेव्हा डॉक्टर नगरकरांनी मला समजावले की आत्ता हे नाही केले तर पुढे जाऊन पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागेल.
पुन्हा तसेच रेडिएशनसाठी गेले. तेथील सुमन मावशींनी धीर दिला. शेवटी ट्रिटमेंट पूर्ण केली. शेवटच्या दिवशी मुलगी बरोबर आली आणि सर्वांना, डॉक्टरना, सिस्टरना चॉकलेट, फुले दिली.
मनात अजून एक इच्छा होती की पाहिल्या दिवशी माझी बायप्सी केली त्या डॉक्टर योगेश यांचे ण मला आभार मानायचे होते. असे निघताना मनात येत असतांनाच, ते मला लिफ्टमध्ये अचानक भेटले. त्यांनी मास्क लावला होता, पण त्यांचा आवाज मी ओळखला आणि त्यांचे मनापासून आभार मानले. रेडिएशन झाल्यानंतर माझ्याकडून जवळ जवळ तीन महिने फक्त काकडी आणि गाजर खाल्ले जात होते.
असा हा प्रवास! आई, वडील, भाऊ, बहिण आणि माझी मुलगी ह्यांनी माझी जिवापाड काळजी घेतली. मुलीने तर मी तिची आई होऊन जशी काळजी घेतली असती तशी माझ्या आजारपणात तिने माझी घेतली. आणि माझ्या नवऱ्याचे तर काय सांगायचे. त्यांनी तर एका लहान मुलाला सांभाळावे तसे मला संभाळून माझी ट्रीटमेंट पूर्ण करून घेतली. कधीच मला त्रास होईल असे काही बोलले नाहीत. या आजारात खुप मनोधैर्य लागते आणि सहनशक्तीपण. कॅन्सर म्हणजे कमीत कमी सात-आठ महिने सर्व जण त्यात गुरफटलेले असतात, पूर्ण घर विस्कळीत झालेलं असतं.
पण बरं होण्याची इच्छा इतकी होती की त्यानंच सहन करण्याची हिंमत दिली आणि आज मी पूर्ण बरी होऊन पुन्हा पूर्वीसारखे आयुष्य मजेत जगते आहे.
अधिक माहिती आणि संपर्क
HCG मानवता कॅन्सर सेंटर् उमेद पेशंट सपोर्ट ग्रुप
umed.warriors@gmail.com
फोन- 9145500381