Join us  

स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 6:43 PM

सुनील छेत्री निवृत्त झाला तेव्हा त्याची आई सुशीला छेत्री यांच्या डोळ्यात अभिमानाचं पाणी तरळलं..

ठळक मुद्देदेशासाठी जे करता येईल ते सारं करण्याचा प्रयत्न केला याचा अभिमान तर आहेच..

लोकप्रिय फुटबॉलपटू सुनील छेत्री. भारतीय फुटबॉलचा पोस्टरबॉय. कॅप्टन फॅण्टास्टिक. त्यानं निवृत्ती जाहीर केली आणि त्याच्या चाहत्यांनाच नाही तर देशभरात सगळ्यांनाच धक्का बसला. भारतीय फुटबॉलची उमेद म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले आणि त्यानंही आपल्या खेळाने देशासाठी अभिमानाचे क्षण कमावले. अनेकांना फुटबॉल करिअर करण्याची प्रेरणा दिली. पण त्याची प्रेरणा कोण? त्याला फुटबॉलचं पॅशन कुणामुळे कळलं? तर त्याचं उत्तर आहे त्याची आई. सुशीला छेत्री.

आईकडून त्याला फुटबॉलचा वारसा मिळाला. सुनीलचा जन्म सिकंदराबादचा. मात्र त्याचे वडील सैन्यदलात असल्यानं त्यांच्या देशभर बदल्या झाल्या. सुनील अनेक शहरांतल्या शाळेत गेल्या. अनेक भाषा बोलतो. मात्र यासाऱ्या काळात फुटबॉल त्याच्या सोबत राहिला आणि त्याहून मोठी सोबत केली त्याच्या आईने. सुशीला छेत्री, मूळच्या नेपाळच्या. त्या लहानपणापासून फुटबॉल खेळत. नेपाळच्या महिला फुटबॉल संघात त्या खेळल्याही आहेत. पुढे मुलं झाली आणि खेळ सुटला. 

मात्र मुलगा सुनील आणि मुलगी बंदना. दोन्ही मुलांना त्यांच्यामुळे फुटबॉलची गोडी लागली. फुटबॉल मुलं खेळत मात्र आई कडक शिस्तीची. सगळा अभ्यास आणि खेळ एका शिस्तीत आणि ठरल्यावेळी व्हायलाच हवा असं त्यांचं कडक शिस्तीचं रुटीन होतं. सुनील छेत्री सांगतोही की माझी आई हीच माझी पहिली कोच. माझी आई खेळाडू, वडीलही फूटबॉल खेळत. मी आणि बहिणही खेळायचो. त्यामुळे फुटबॉल किंवा अन्य कुठलाही खेळ हा मुलामुलींनी दोघांनी खेळायचा असतो हेच मला माहिती होतं. मुली अमूक खेळ खेळतच नाही हे मला पटणंच शक्य नव्हतं.’

सुनील छेत्री सांगतो की, माझी पहिली स्पर्धकही माझी आईच होती. टफ कॉम्पिटिटर. तिला हरायला अजिबात आवडायचं नाही. ते हरणं अजिबात न आवडणं माझ्यात तिच्याकडून आलं. मी अनेक खेळ खेळायचो पण तिला हरवणं वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत तर जमलंच नाही. ती पण हरायची नाही.त्यातून मी जिंकणं शिकत गेलो.

आणि तिथून सुरु झालेला हा प्रवास सुनीलने भारतीय महिला फुटबॉल संघ उभं करणं, मुलींना प्रशिक्षण तिथवर जाऊन पोहचला. घरात त्याची आई खेळाडूच्या भूमिकेतूनच त्याच्या खेळाकडे पहायची. आईचं फुटबॉलचं स्वप्न लेकानं अक्षरश: जगून दाखवलं. एक खेळाडू चांगला माणस होवू शकतो, संघाचा विचार स्वत:च्या आधी करतो हे संस्कार त्यांनी मुलांना खेळातून दिले.

 

आज सुनील छेत्री निवृत्त होताना त्याच्या आईच्या डोळ्यात अभिमानाचं पाणी तरळलं होतं..लेकानं देशासाठी जे करता येईल ते सारं करण्याचा प्रयत्न केला याचा अभिमान तर आहेच..

 

टॅग्स :फुटबॉलसुनील छेत्रीप्रेरणादायक गोष्टी