भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा अंतराळात जाणार अशा बातम्या होत्या. तूर्त ती मोहीम रहीत करण्यात आली आहे. तब्बल तिसऱ्यांदा ती आता अंतराळात जाणार होती. बूच विल्मोर हे आणखी एक अंतराळ संशोधक तिच्याबरोबर जाणार होतो. खरं तर जुलै २०२२ मध्येच ही अंतराळयात्रा जाणार होती, नासानं तसं जाहीरही केलं होतं, पण कोरोनाकाळामुळे ही मोहीम किमान एक वर्षभर पुढे ढकलण्यात आली होती.
आताची अंतराळयात्रा आतापर्यंतची सर्वांत अत्याधुनिक असेल, या यात्रेत अनेक नवे प्रयोगही करण्यात येणार आहेत आणि कदाचित ही यात्रा भविष्यातील अनेक घटनांसाठी नवी नांदीही ठरण्याची शक्यता आहे. बोइंगचं स्टारलायनर कॅलिप्सो मिशन अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मानवाला अंतराळात घेऊन जाणारं हे आतापर्यंतचं पहिलं स्पेस कॅप्सूल असेल. या मोहिमेचं नेतृत्व बूच विल्मोर करणार आहेत. सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर या दोघांचही या मोहिमेसाठी जोरात ट्रेनिंग सुरू आहे.
(Image : google)
अंतरिक्षयान आणि बोइंग स्टारलायनर यांच्यात बराच फरक आहे. दोघंही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांच्यात काही जमेच्या बाजू आहेत, तर काही कमतरताही आहेत; पण दोघांचं उद्दिष्टही वेगवेगळं आहे. अंतराळ यान आपल्या कक्षेत दीर्घ काळ राहू शकतं, त्या तुलनेत बोइंग स्टारलायनर आपल्या कक्षेत फारच कमी काळ राहू शकतं, पण अंतराळयान आपल्यासोबत फारच कमी सामान वाहून नेऊ शकतं, त्या तुलनेत बोइंग स्टारलायनर आपल्या सोबत विविध उपकरणं, दुसऱ्या ग्रहांसाठी आवश्यक असणारं बरंच सामानही घेऊन जाऊ शकतं; पण तसं म्हटलं तर हे दुय्यम हेतू, हे मिशन जर यशस्वी झालं तर स्पेस टुरिझमचे नवे दरवाजे जगाला उपलब्ध होतील. आपल्याकडे विविध शहरांसाठी जशी टॅक्सी सर्व्हिस उपलब्ध असते, तशी स्पेस ‘टॅक्सी सर्व्हिस’ यामुळे अंतराळातही सुरू होईल. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांचं या मोहिमेकडे बारीक लक्ष आहे. स्पेस टुरिझमकडे लोकांचा असलेला ओढा पाहता, या टॅक्सी सर्व्हिससाठी लोकांच्या रांगा लागतील आणि मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स बुकिंग होईल, अशी शक्यता आताच जाणकार व्यक्त करीत आहेत. ही मोहीम यशस्वी झाली, तर अंतराळात जाण्याच्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल होईल आणि त्याचा खर्चही किती तरी पटीनं कमी होईल. पर्यटन कंपन्यांसाठी हा मोठाच फायद्याचा सौदा ठरेल.
(Image : google)
नासाचं म्हणणं आहे, या मोहिमेकडे आम्ही अतिशय आशेनं पाहत आहोत. अंतराळ प्रवासाची रूपरेषाच त्यामुळे बदलून जाईल. अंतराळ प्रवासाची ही ‘टॅक्सी सर्व्हिस’ सर्वसामान्यांसाठी एक क्रांती घडवू शकेल. आम्ही आशावादी आहोत; पण त्यासाठी आम्ही मुद्दाम घाई करणार नाही, असंही नासानं म्हटलं आहे.अंतराळात जाण्यासाठी आजच अनेक प्रवासी उत्सुक आहेत. त्यासाठी इलॉन मस्क यांच्या कंपनीसह जगभरातील अनेक कंपन्याही पुढे येत आहेत, पण त्यांनीही आता थोडं ‘थांबून’ घेतलं आहे. या प्रयोगाच्या यशापयशावर ते आपलं पुढचं धोरण ठरवणार आहेत.या पहिल्या ‘टॅक्सी सर्व्हिस’साठी सुनीता विल्यम्सही अतिशय आतुर आहे. अंतराळ प्रवासासाठी नासानं १९९८ मध्ये पहिल्यांदा तिची निवड केली होती. मात्र, अंतराळ प्रवासाची पहिली संधी तिला ९ डिसेंबर २००६ रोजी मिळाली होती. त्यानंतर २०१२ मध्ये ती दुसऱ्यांदा अंतराळात गेली होती आणि आता तिसऱ्यांदा ती अंतराळात आपलं पाऊल ठेवणार आहे. ५० तास ४० मिनिटे स्पेसवॉक करणारी ती जगातली पहिली महिला अंतराळवीर आहे. वेगवेगळ्या मिशनअंतर्गत एकूण ३२१ दिवस, १७ तास, १५ मिनिटे ती अंतराळात राहिलेली आहे!