एक कणखर आणि डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून नेहमीच औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. 'लेडी सिंघम' या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मोक्षदा गुन्हेगारांचा अक्षरश: थरकाप उडवतात. लोकमत आयोजित वुमन अचिव्हर पुरस्कार सोहळ्यात मोक्षदा यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. महिला आणि मुलींसाठी मोक्षदा यांचा आजवरचा प्रवास आणि त्यांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी ठरते.
नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात बोलताना मोक्षदा म्हणाल्या की, 'मॅडम तुम्ही मुलींना काय संदेश द्याल...' असा प्रश्न मला नेहमीच विचारला जातो. पण नेहमी मुलींनाच का संदेश द्यायचा. माझा मुलींसाठी काहीही संदेश नाही. मुलींना मी एवढेच सांगेल की तुम्ही तुमचे आयुष्य फुल ऑन एन्जॉय करा. अभ्यास करा, खेळा, कराटे शिका, अगदी तुम्हाला जे पाहिजे आहे, त्या क्षेत्रात स्वत:चे उत्तम करिअर घडवा. आता खरा संदेश कुणाला द्यायची गरज असेल तर तो मुलांना आणि त्यांच्या आईला. मुलगा- मुलगी यांना वाढवताना बऱ्याचदा आईकडून, कुटूंबाकडून भेदभाव केला जाते.
आईची कुठेतरी चुक होते. मुलाला वाढवताना ती त्याला नकळत जास्त पॅम्पर करते. त्याचे जास्त कोडकौतूक करते. यामुळे त्याला वास्तव कळत नाही. मुलांच्या या वागण्याचे परिणाम नकळतपणे मग इतर महिलांना, मुलींना सहन करावे लागतात. त्यामुळे मुलींपेक्षा आता मुलांना कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही, हे सांगा. काय करावे आणि काय करू नये, हे त्यांना शिकवा, असा संदेश मोक्षदा यांनी प्रत्येक आईला दिला आहे.
त्या म्हणाल्या की, स्त्री- पुरूष समानतेचा उल्लेख आपण वारंवार करतो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुढे गेल्या आहेत, असे समजतो. पण हा समज चुकीचा आहे. अजूनही अशी अनेक क्षेत्र आहेत, जिथे महिलांचे असणे केवळ बोटावर मोजण्याइतकेच आहे. पुरूष बहुसंख्य आणि महिला केवळ महिलांच्या प्रतिनिधी असल्याप्रमाणे तिथे उपस्थित असतात, ही आजची वास्तविकता आहे. म्हणूनच आज आपल्याकडे 'महिला पोलीस', 'महिला अधिकारी', 'महिला पत्रकार' अशी विशेषणे महिलांसाठी लावली जातात. महिलांचे प्रत्येक क्षेत्रातले प्रमाण ५० टक्के झाले, त्यांचा प्रत्येक क्षेत्रातला वावर वाढला तर नक्कीच महिलांच्या बाबतीत अशी विशेषणे लागणार नाहीत. प्रत्येक क्षेत्रात महिलांचे असणे अगदी नॉर्मल आणि सहज वाटावे, अशी परिस्थिती निर्माण होण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.