Join us  

आदिवासी मुलांसह राहत त्यांच्या स्वप्नांना पंख देणारी चंद्रपूर जिल्ह्यातल्या गाेंडगुंडा गावातली जगावेगळी शिक्षिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2023 7:22 PM

शिक्षक दिन विशेष : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडगुडा गावातील प्रयोगशील शिक्षिका वैशाली गेडाम, आदिवासी मुलांसह जगत, शिकत-शिकवत एक वेडं स्वप्न बघणारी आणि ते प्रत्यक्षात जगणारी एक जगावेगळी शिक्षिका. Teachers' Day

ठळक मुद्देवैशाली मुलांना शाश्वत जीवन मूल्यांपर्यंत घेऊन जाते

रंजना बाजीवैशाली गेडाम. शिक्षिका आहे. गोंडगुडा (धोंडा अर्जुन हे या गावाचं दुसरं नाव) या गोंड लोकांच्या गावात राहते. तिचं कुटुंब चंद्रपूरला राहतं. चंद्रपूरहून काही शिक्षिका रोज चंद्रपूर ते गाव असा येऊन जाऊन चार  तासांचा प्रवास करून त्या भागातल्या वेगवेगळ्या शाळांत येतात. वैशालीनं ते करून बघितलं. पण त्यामुळं जास्त दमायला होतं आणि मुलांसोबत काम करायला त्राण रहात नाही हे लक्षात आल्यावर तिनं गावातच एक घर भाड्यानं घेऊन तिथं राहायचं ठरवलं. वैशाली गेडाम शाळेत कोणकोणते प्रयोग करत असते याबद्दल मलाही कुतूहल होतंच, अजूनही आहे. मुलांबरोबर ती बरंच काही शिकत, शिकवत असते हे तिच्या वॉलवर वाचलं होतं. वैशालीने तिचे अनुभव समाज माध्यमावर अनेकदा लिहिले आहेत. मला तिच्या कामाविषयी जाणून घ्यायचं होतं. म्हणून पुण्याहून उठून चार दिवस तिच्या गावात, तिच्या घरी, तिच्यासोबत चोवीस तास राहिले, गप्पा मारल्या, तिचं मुलांबरोबर वागणं, इंटरॅक्शन्स बघितल्या, गावकऱ्यांबरोबर तिचं वागणं बघितलं.

वैशाली काय करते की तिचं शिकवणं इतकं वेगळं वाटतं ?

वैशाली मुलांना शाश्वत जीवन मूल्यांपर्यंत घेऊन जाते हे माझं निरीक्षण. मुलं आणि आपण सगळेच जगण्यासाठी आवश्यक मूल्यं जन्मत: घेऊन आलेलो असतो. ती निसर्गानं आपल्या सुदृढ जगण्यासाठी दिलेली गोष्ट आहे. या मूल्यांना खतपाणी देणं गरजेचं असतं. मुलं व्हलनरेबल असतात. परिसरातल्या कोणत्याही चांगल्या वाईट गोष्टी ती नकळत आत्मसात करत असतात. त्यामुळं त्यांच्याशी वैशाली जीवनमूल्यांविषयी संवाद साधते. मुळात हा संवाद प्रत्यक्ष बघणं ही खूप इंटेरेस्टिंग आणि सुंदर गोष्ट होती. पहिली ते पाचवीची २९ मुलं एकत्र समोर आहेत. कोणी सतरंजीवर बसलं आहे, कोणी भिंतीशी मांडून ठेवलेल्या बेंचेसवर. कोणी आतबाहेर करत आहे, कोणी वर्गातल्या आरशासमोर स्वत:ला निरखत उभं आहे. कोणी सतरंजीवर आडवं पसरलं आहे. अंगणवाडीची एक मुलगीपण या वर्गात लुडबूड करत आहे. एक ऑटिस्टिक मूल खाली मान घालून पुस्तकाची पानं उलटत आहे. मग वैशाली एक शब्द फळ्यावर तिच्या ठसठशीत अक्षरात लिहिते. रचना मोठी २-३ मुलं मुली लगेच सचेत होतात. रचना म्हणजे काय ? असा वैशालीचा प्रश्न. मग उत्तरं यायला लागतात, आपला डोळा एक रचना आहे, आपलं शरीर एक रचना आहे. मग वैशाली मोठ्या मुलांना भूगोलाचं पुस्तक काढायला सुचवते. त्यात सूर्यमाला आहे. ती एक रचना. अशा अनेक गोष्टी मुलं सुचवत राहतात. वैशाली ते फळ्यावर लिहीत राहते. लहान मुलं दुसरं काहीतरी करण्यात मग्न असतात. पण आपण मुलांसोबत काम करणाऱ्यांना माहीत असतं की या मुलांचे कान या चर्चेकडं आहेत.मग वैशाली अजून एक शब्द लिहिते, संतुलन त्याचं प्रात्यक्षिक होतं. ती काही वस्तू एकमेकांवर रचून त्या कशा उभ्या राहतात याकडं मुलांचं लक्ष वेधते. मुलं म्हणतात, बॅलन्स. संतुलन म्हणजे बॅलन्स. मग वैशाली त्या रचनेला एक फटका देऊन ती रचना पडते. मग हे असंतुलन. मी हे शब्दात पटकन लिहिलं आहे. पण तिथं हा बराच वेळ चाललेला संवाद असतो. मग इथं वैशाली थांबते. 

मुलं उधळतात. त्यांचं काहीतरी सुरू होतं. या संवादाचा उद्देश काय असं मी तिला विचारलं. ती म्हणाली, आता जो जगात गोंधळ, हलकल्लोळ चालू आहे तो जगाची, समाजाची रचना विस्कटण्यामुळं झाला आहे. तिथपर्यंत मला मुलांना न्यायचं आहे. आता हे दोन शब्द मुलांच्या मनात पेरलेत. ते आम्ही बाहेर दगड रचलेत त्यावर लिहू. म्हणजे मुलं येताजाता वाचतील आणि त्यांना ही चर्चा आठवत राहील आणि विचार चालू राहतील.ही वैशालीनं मुलांमध्ये सुरू केलेली निरंतर प्रक्रिया असणार आहे. हे मला कसं समजलं?एके दिवशी मुलांनी फार पसारा मांडला होता. कापलेले कागद, पुस्तकं, त्यांची दप्तरं सगळं इकडं तिकडं पडलेलं होतं. यावर वैशाली म्हणाली, आज काहीतरी वेगळं दिसत आहे मला. सांगा काय झालं आहे ?चाणाक्ष मुलगा म्हणाला, नीटनेटकेपणा नाही. दुसरी मुलगी म्हणाली, त्यामुळं सौन्दर्य नाही. गोंडगुडा गावात गोंड भाषेत व्यवहार चालत असताना ही भाषा मुलं वापरत होती कारण यापूर्वी नीटनेटकेपणा आणि त्यामुळं गोष्टी सुंदर दिसतात यावर अशीच मोठी घनघोर चर्चा होऊन ते दोन शब्द बाहेरच्या मुद्दाम बनवून घेतलेल्या दोन पत्र्याच्या बोर्डवर जाऊन बसले होते. मुलं येता जाता ते शब्द वाचत होती आणि ते शब्द त्यांच्या मनात आणि वागण्यात मुरून गेले होते. वैशालीच्या लहानश्या घरात एक कॉट होती. अजून एक नवारीची कॉट अंगणात होती. रात्री ती कॉट उचलून आत आणायची आणि त्यावर अंथरूण घालून आम्ही दोघी गप्पा मारत झोपी जात असू. 

मी गेल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मुलं दार वाजवत हजर. ताई, उठला का? ताईनं दार उघडलं. काही मुलं तोंड धुवून, तर काही अंथरुणातून डोळे चोळत डायरेक्ट हिच्या दारात. मग ही म्हणाली, दात घासून, तोंड धुवून या बरं. मुलं तसं करून आली.पिवळा पळस दाखवायला मुलं आम्हाला घेऊन जाणार होती. मी कुरूंजी गावात अशीच मुलांच्या बरोबर कुठं कुठं जात असे. त्याची आठवण आली. मुलं जवळच्या टेकडीवरच्या जंगलाकडं निघाली. आम्ही दोघी सोबत. मुलांनी रस्ता सोडून पायवाट पकडली. ती पुढं चालली होती. एकाएकी ज्या मुलांनी चपला घातल्या होत्या त्यांनी चपला काढल्या. तिथं एक लहान दगडांचा रचलेला आडवा पट्टा होता. त्याला मुलांनी नमस्कार केला. सांगितलं की अमुक अमुक आजोबाला इथं पुरलं आहे. या गावात मृत्यू झाल्यावर शेतात, रानात असं पुरतात आणि त्यावर दगड रचतात. काही ठिकाणी थोडं बांधकाम ही दिसलं. मुलांना कुणाला कुठं पुरलं याची पूर्ण माहिती होती. त्यांनी अशा बऱ्याच जागा दाखवल्या. मग मुलं जंगलात गेली. खूप आत नाही तर काठावरच. त्यांना पिवळा पळस कुठं आहे हे माहीत होतं. त्याची पडलेली फुलं वेचून आणली आणि काही शेंदरी पळसाचीसुद्धा. यांच्या पद्धतीप्रमाणे होळीच्या आधी या फुलांना हात लावायचा नाही. होळीच्या वेळेला पूजा करून ही फुलं गावात आणायची. त्याचा रंग बनवायचा आणि होळी खेळायची. म्हणून मुलांनी फुलं तिथंच टाकली.वैशालीची मुलं मुक्त आहेत. त्यांना तिची भीती वाटत नाही. तिच्याशी काहीही बोलत असतात. त्यामुळं मी गेले तरी ती मुलं सहजपणे माझ्याजवळ आली. वैशालीनं आधी सांगून ठेवलं होतं. त्यामुळं ती ‘रंजनाबाजे’ ची वाटच बघत होती. माझं खरं तर जानेवारीच्या शेवटी जायचं ठरलं होतं. पण ते कॅन्सल करावं लागलं. वैशालीला नेट प्रॉब्लेममुळे तो माझा निरोप उशीरा मिळाला. ती म्हणाली, अगं, मुलं वाट बघत आहेत तुझी. रोज रंजनाबाजेला यायला पंधरा दिवस राहिले, चौदा दिवस राहिले असं मोजत आहेत.’ मग तर जाणं अपरिहार्यच !मला गोंडगुडाला पोचायला दुपारी चार वाजले. वैशालीनं धाडलेल्या रिक्षेतून उतरले. सामान तिच्या घरात ठेवलं आणि शाळेत आले. मुलांनी स्वागताचा फलक तयार ठेवला होता. मी वर्गात गेले तर मुलांना आनंदच. सगळी पळत बाहेर आली. काय करू काय नको असं झालं त्यांना बहुतेक. मग मुलींनी नाच करून दाखवले, मुलामुलींनी उड्या मारून दाखवल्या, कबड्डी खेळून दाखवली. एकमेकांना उचलून दाखवलं, हातावरून उड्या मारल्या, असा कल्ला बराच वेळ चालू होता. मलाही या आनंदाची लागण झाली. मग श्रेया जवळ आली. ताई, तुझ्यावर मला फार लाड आलाय, असं म्हणत तिनं माझी पप्पी घेतली. मग मुलामुलींची रांगच लागली. एक एक जण येऊन माझी पप्पी घेत होतं. काही मुलींनी माझ्या चेहऱ्यावरून हात ओवाळत स्वत:च्या कानशीलावर बोटं मोडून लाड व्यक्त केलं. इतकं भरभरून निर्मळ, निर्व्याज प्रेम मिळालं की मलाच दाटून यायला लागलं. मुलांना असं मोकळेपणाने प्रेम व्यक्त करायला मिळणं हेही महत्त्वाचं!मुलांच्या कोणत्याही मुक्त अविष्काराच्यामध्ये वैशालीची शाळा येत नाही. वैशालीच्या शाळेत मुलांना तिनं अक्षर ओळख करून दिली आहे. मुलं आपल्या आपण वाचायला शिकत आहेत असं तिनं सांगितलं. तिनं घेतलेल्या वेगवेगळ्या विषयावरच्या संवादातले कळीचे शब्द बाहेर लिहिले आहेत. घेतलेल्या अनुभवामुळं मुलं ते शब्द समजून वाचत राहतात. असे अनेक शब्द शाळेच्या आवारात वेगवेगळ्या ठिकाणी लिहिले आहेत. मुलांना गणितही आवडतं असं ती म्हणाली. वर लिहिलेला कल्ला सुरू असताना एक मुलगी तिकडं अजिबात लक्ष न देता बेरजेची गणितं करण्यात मग्न होती. वैशालीनं तिची त्या वेळची ती ऊर्मी समजून घेतली आणि तिच्या शेजारी बसून तिला गणितं करायला ती देत राहिली. वैशालीच्या घरी मी राहिले. ती खायला करायची ते भरपूरच. कारण आम्ही घरी असलो की मुलं हमखास घरी येणार. काहीतरी सांगत राहणार. त्यांचा वाटा यात असे. त्यातून वैशाली गोंडी भाषेतले नवीन शब्द शिकायची. मराठी- गोंडी- मराठी असे शब्द येत रहात. ती इथं आल्यावर गोंडी भाषा शिकली त्यामुळं तिला मुलांच्या बरोबर जोडून घेणं सोपं झालं. सकाळी सात ते शाळेची वेळ वगळता रात्री आठपर्यंत मुलं तिच्या घरात असायची. मग बळं बळं त्यांना घरी जा असं सांगायला लागायचं.  एके दिवशी सकाळी वैशालीनं ठरवलं की मुलांना शिरा खाऊ घालायचा. तिथले लोक घरात नुसता रवा भाजून त्यात साखर मिसळून ते गोड म्हणून खातात. त्यामुळं शिरा हा पदार्थ करायचा होता. मग त्यासोबत पोहे करायचे असं ठरलं. मुलं आली होतीच. पोहे आणावे लागत होते. मग एका मुलीला पैसे देऊन दुकानात पाठवलं. तिच्यासोबत साहजिकच आणखी २-३ मुली गेल्या. मिरच्या पुरेशा नव्हत्या. मग काही मुलं घरून मिरच्या घेऊन आली. कांदे चिरणे, मिरच्यांची देठं काढणे पोहे धुऊन आणणे सगळं एकत्र चालू, सोबत सगळ्यांचे तोंडांचे पट्टे सुद्धा. एक आनंदी माहोल. पदार्थ तयार झाल्यावर मुलं आपापल्या घरून एक प्लेट, वाटी, आणि ज्यांना पाहिजे ती, चमचे घेऊन आली. अंगणात छान पंगत बसली. मोठ्या मुलींनी वाढलं. सगळ्यांनी आनंदानं खाल्लं. बहुतेक मुलांनी शिरा पहिल्यांदाच खाल्ला होता. तो मुलांना आवडला. मग अंगण झाडून स्वच्छ करून मुलं घरी गेली. आमचं काहीच आवरलं नव्हतं. मुलं घरी जाऊन आवरून आली. शाळेची किल्ली घेतली. अगदी पलीकडंच असलेली शाळा उघडून त्यांनी काहीबाही करायला सुरुवात केली. रोजच मुलांचं आवरलं की ती येऊन किल्ली घेऊन शाळा उघडत. शिक्षक शाळेत असलेच पाहिजेत हा आग्रह त्यांचाही नव्हता आणि वैशालीचाही.शिकणं फक्त शाळेतच घडतं असं नाही तर ती सतत घडणारी प्रक्रिया आहे. याबद्दल आपण मोठ्यांनी सजग असणं गरजेचं !      लिहिणं वाचणं या स्किल्स आहेत. थोडी ओळख करून दिली तर मुलं स्वत: त्यावर काम करू शकतात. पण वैशालीला मुलांना वैश्विक शांततेपर्यंत न्यायचं आहे. हा शब्द मोठ्यांना अवघड वाटतो. कारण आपण आपलं आत्मिक सामर्थ्य अजमावून बघायला कदाचित शाळेत शिकलो नसू. वैशालीला मुलांना तितकं समर्थ करायचं आहे. बाकी शिकणं तर असेलच. जगाच्या रचनेत जे असंतुलन झालं आहे तिकडं मुलांचं लक्ष वेधून त्या असंतुलनावर काम करायला उद्युक्त करायचं आहे. काही जणांना हे एक वेडं स्वप्न वाटेल. पण अशी वेडी स्वप्नं बघणारीच काही तरी वेगळं करून जातात. वैशाली याबद्दल विश्वासानं का बोलत आहे कारण तिची दोन्ही मुलं तिनं या पद्धतीनं वाढवली आहेत असं तिनं सांगितलं. गावात फिरताना काही थोडी मोठी मुलं उगीचच सायकली वरून फिरताना दिसली. वैशाली थांबून त्यांच्याशी बोलायची. ही कुठली मुलं, असं विचारल्यावर तिनं सांगितलं. चौथी नंतर तिच्या शाळेतल्या मुलांना पुढच्या शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवलं जातं. पण ही इथं मुक्त वाढलेली मुलं तिथल्या बंधनांशी जुळवून घेऊ शकत नाहीत. थोड्या दिवसात ती परत गावाला निघून येतात. मग अशी काही न करता गावात फिरत राहतात. कधी कधी एखादा शाळेत येऊन बसतो. पण हळूहळू त्यांचा शिकण्यातला रस संपतो. हीच गत मुलींची असते.यासाठी गावातली आहे ती शाळा दहावीपर्यंत असावी असं वैशालीला वाटतं. ती स्वतः ते काम करू शकेल. काही लोकांना सहकार्य करायची विनंती करू शकेल. आपल्या अलवचिक शासन व्यवस्थेत हे शक्य आहे का असं मला वाटलं.खरं तर आपल्या समाजात अत्यंत वेगवेगळ्या सामाजिक रचना आहेत. प्रत्येक स्थानिक गरजेनुसार शिक्षण पद्धतीत बदल करता आला पाहिजे. वैशालीेसारखा एखादा शिक्षक स्वतः हून असं काही करू बघत असेल तर त्याला मदत करायला लोक आनंदाने पुढं येतील. याबद्दल गंभीरपणे विचार झाला पाहिजे असं वाटलं.वैशालीसारखे निव्वळ मुलांच्या हिताचा विचार करणारे शिक्षक अल्पसंख्येत आहेत. आदिवासी भागात राहून तिनं तिथले प्रश्न समजून घेतले आहेत. तिच्या विचारांची, सूचनांची शासनाकडून गंभीरपणे दखल घेतली गेली पाहिजे असं वाटतं.वैशालीची ही सगळी स्वप्नं पुरी होवोत.

(लेखिका सहज शिक्षण अभ्यासक आहेत.)

टॅग्स :शिक्षक दिनशिक्षकप्रेरणादायक गोष्टी