भारतीय लग्नसोहळे म्हणजे संपत्ती दाखवण्याचा एक सोहळाच असतो. कोणाकडे जास्त संपत्ती आहे याचे प्रदर्शन करण्याचा पुरेपूर प्रयत्न या सोहळ्यांमध्ये होतो. त्यामुळे पाण्यासारखा पैसा खर्च करुन हे सोहळे पार पडतात. लग्न झाल्यानंतर कार्यालयात वस्तूंचा, अन्नाचा आणि कचऱ्याचा अक्षरश: खच पडलेला दिसतो. यामध्ये सर्वात जास्त प्रमाण असते ते प्लास्टीकचे. मात्र हीच गोष्ट लक्षात घेऊन बंगळुरू येथील अनुपमा हरीश आणि चारुलता आर यांनी आषुतोष आणि निधी या आपल्या मुलांचा विवाह सोहळा प्लास्टीक विरहीत केला. इतकेच नाही तर या लग्नसोहळ्यामध्ये मागे राहिलेल्या गोष्टींचे त्यांनी जवळपास १ हजार किलो कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार केले जे साधारण ३०० किलो झाले (The Bride’s & Groom’s Moms Organized No Plastic Wedding).
ही गोष्ट वाचायला सोपी वाटत असली तरी लग्नघरात तयारी करत असताना काटेकोरपडे प्लास्टीक वापरले जाणार नाही याकडे लक्ष देणे आणि त्याला पर्याय शोधून त्याचा वापर करणे हे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. मात्र पर्यावरणाची जाण असलेल्या या मातांनी आपल्या मुलांच्या लग्नाच्या निमित्ताने एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला. साधारणपणे ३ महिने आधी लग्नाची तयारी सुरू झालेली असताना सुरुवातीलाच त्यांना प्लास्टीक मुक्त लग्न करायचे ठरवले आणि त्यानुसार ते पारही पाडले.
याबाबत ‘द बेटर इंडिया’शी बोलताना वधूची आई चारुलता म्हणाल्या, आम्ही घरी नेहमी कंपोस्ट खत तयार करतो आणि टेरेस गार्डनमधील रोपांसाठी ते वापरतोही. मुलाची आई अनुपमा यांनी लग्न प्लास्टीकमुक्त होण्यासाठी आणि कचऱ्याचे योग्य पद्धतीन व्यवस्थापन होण्यासाठी अतिशय नेमके नियोजन केले होते. कमीत कमी निमंत्रण पत्रिका छापणे, पाहुण्यांना पुष्पगुच्छ न आणण्याचे आवाहन करणे, कचरा कमी होण्यासाठी योग्य अशा मेन्यूची निवड करणे अशा गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले. स्टीलची भांडी भाडे तत्त्वावर घेणे, केळीच्या पानांवर जेवण वाढणे अशा गोष्टींमुळे लग्नाला १ हजार लोक असूनही प्लास्टीकचा अजिबात वापर झाला नाही. लग्नातील कोणताच कचरा जमिनीत जाणार नाही यासाठी त्यांनी घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेचीही मदत घेतली. अशाप्रकारे प्लास्टीकविरही लग्न करणे फारसे अवघड नाही. योग्य नियोजन असेल तर प्रत्येक जण अशाप्रकारचा प्रदूषण विरहीत सोहळा आयोजित करु शकतो असे मत या दोघींनी व्यक्त केले.