माधुरी पेठकर
माझं लग्न झालं तेव्हा मी फक्त ग्रॅज्युएट होते. पण लग्नानंतर मी खऱ्या अर्थाने घडत गेले. महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे जशी सावित्री घडत गेली तशी मी माझ्या नवऱ्यामुळे घडत गेले. लग्नानंतर पुढे शिकण्याला त्यांनी प्रोत्साहन दिलं. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, कार्यक्रमांमध्ये मला भाग घ्यायला लावला. माझ्यातलं कौशल्य ओळखून त्याला प्रोत्साहन दिलं. मी तीन विषयात एम.ए केलं, बीएड केलं. गाणं शिकले. विशारद झाले. नंतर मला आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. पण तेव्हा ती नाकारुन मी शिक्षक होण्याचं ठरवलं! - भंडारा शहरातल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयात शिकवणाऱ्या स्मिता गालफाडे सांगत असतात. शिक्षक म्हणून त्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम सराबवतात.
स्मिता सांगतात, शिक्षक होताना मनात देशसेवा करण्याची अतोनात इच्छा होती. त्यामुळे जे काम आपण करणार ते देशासाठी करणार आहोत, देश घडवण्याच्या कामी आपल्या कामाचा उपयोग व्हावा ही तीव्र इच्छा होती. हे सर्व मनात ठेवून मी एक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करायला सुरुवात केली. माझ्यासमोर विद्यार्थ्याला एक सुजाण नागरिक घडवण्याचं ध्येय होतं, मला फक्त परीक्षांना सामोरे जाणारे परीक्षार्थी घडवायचे नव्हते. मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या समाजाचं, जगाचं भान यायला हवं, चांगल्या वाईटाची समज यायला हवी. हे झालं तर मुलं चांगले नागरिक होवू शकतील. त्यातूनच देश घडेल असं मला वाटत होतं. आणि म्हणूनच एक शिक्षक म्हणून माझा भर मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर जास्त आहे.माझ्या समोर असलेल्या मुलांना कोणत्या विषयात किती गुण आहे याचा मी कधीच विचार करत नाही, तर या मुलांमध्ये कोणतं कौशलय आहे, याकडे माझं लक्ष असतं. आणि ते ओळखून मुलांसाठी तसे उपक्रम मी घेते, आयोजित करते. मुलांना ही गोष्ट खूप भावते.
यातूनच माझ्या शाळेतली मुलं घडत गेली. मुलांना शिकवताना, त्यांच्यासोबत वावरताना मला एक गोष्ट लक्षात आली की तळागाळातून येणारी अनेक मुलं निराश होती. अशा वेळेस त्यांच्यात असलेलं कौशल्य ओळखून त्याला बाहेर काढलं, वाव दिला तरच या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, ही मुलं घडतील, पुढे जातील. कौशल्य विकासांच्या उपक्रमांमुळे मुलं स्वत:ला ओळखायला शिकली. समाजात आत्मविश्वासाने वावरायला शिकली. २७ वर्षांपूर्वीच्या बॅचची मुलं आजही माझ्या संपर्कात आहे. आज ती विविध क्षेत्रात काम करत आहे. कोणी देशात आहे तर कोणी परदेशात. एका शिक्षकाला यापेक्षा वेगळं आणखी काय हवं असतं?
मराठवाडा-खान्देश आणि विदर्भ
मी मूळची मराठवाड्याची नांदेडमधली. लग्न होवून विदर्भात आले. आणि सासर खान्देशातलं. या तिन्ही भागांचे संस्कार माझ्यावर झाले. लग्नानंतर विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आल्यावर मी येथील झाडीबोली शिकले. त्याचा फायदा मला येथील मुलांना समजून घ्यायला झाला. मुलांना बोली भाषा आणि प्रमाण भाषा दोन्ही यायला हव्यात असं मला वाटत होतं. प्रमाण भाषेच्या मागे लागून आपली बोली बाजूला ठेवली तर त्यातून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार नाही. उलट न्यूनगंडच तयार होईल. त्यासाठी मी शाळेत २०१२ मध्ये ‘जागर बोलीचा आदर मराठीचा' हा उपक्रम सुरु केला. बोलीचा सन्मान करुन मुलांना प्रमाण भाषेकडे वळवण्यासाठीचा हा उपक्रम आहे. यात मी दर महिन्याला एक अशी वर्षाला बारा हस्तलिखितं मुलांकडून तयार करुन घेते. मुलं विविध विषयांवर लिहितात, व्यक्त होतात.
हे हस्तलिखित मग व्यासपिठावर येवून मुलांनी सादर करायचं. त्यासाठी आधी बोली भाषेतून ते सांगायचं. व्यासपिठावर येवून आधी आपल्या बोली भाषेतून बोलायचं आहे, हे समजलं की मुलं आत्मविश्वासाने बोलायची. त्यातूनच त्यांचा प्रमाण भाषा शिकण्याचा आत्मविश्वास वाढला. असंही स्मिता गालफाडे सांगतात.
शाळेत का नको फ्लॅशमॉब?
ग्रामीण भागातील मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी आणखी एक उपक्रम घेतला त्तो म्हणजे फ्लॅशमाॅब. फ्लॅशमाॅबचा प्रयोग त्यांनी मुंबईत स्टेशनवर पाहिला होता, स्वित्झर्लण्डमध्ये पाहिला होता. आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांसोबत हा उपक्रम घ्यावा असं त्यांनी ठरवलं आणि त्यातून हा उपक्रम शाळेत सुरु केला. फ्लॅश माॅबचा उपक्रम शाळेतल्या मुलांकडून करुन घेणारी त्यांची शाळा महाराष्ट्रातील पहिली शाळा ठरली. फ्लॅशमाॅब ही संकल्पनाच अशी आहे की आजूबाजूच्या लोकांना काहीच कल्पना नसते आणि अचानक एक नाटक सुरु होतं. लोकांना आश्चर्य वाटतं, ते थांबतात, प्रयोग पाहतात. या फ्लॅश माॅबद्वारे कमी वयातली लग्न, मुलींचे शिक्षण, मुलींची सुरक्षा, व्यसनमुक्ती, देशभक्ती यासारखे विविध संदेश त्यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांनी दिले. एक काहीतरी भारी केल्याची भावना यामुळे मुलांमध्ये निर्माण झाली.
आसगाव शाळेतला उपक्रम
स्मिता सांगतात, मी सात आठ वर्षं भंडाऱ्यापासून ७० कि.मी अंतरावर असलेल्या पवनी येथील आसगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत काम केलं. तिथे माझी प्रमोशनवर बदली झाली होती. शाळा खूप मोठी होती. ६००-७०० विद्यार्थी होते. येथील भाग नक्षलग्रस्त असल्याने माझ्यासमोर दोन तीन पर्र्याय ठेवले गेले होते. पण शाळा मोठी, मुलं जास्त, आदिवासी भाग्, आव्हानात्मक परिस्थिती म्हणजे काम करायला भरपूर् वाव म्हणून मी कशाचाही विचार न करता त्या शाळेतली बदली स्वीकारली.
या शाळांमध्ये मी उन्हाळी शिबिरांची संकल्पना रुजवली. ज्या मुलांवर वाया गेलेला, गुंडपुंड म्हणून शिक्के बसले होते, ती मुलं योग्य मार्गांवर आणण्याचं कामही मी केलं. माझ्या मते कोणतंच मूल गुन्हेगार नसतं. त्याची आजूबाजूची परिस्थिती त्याच्या अनुकुल नसते. त्याच्यातल्या गुणांना समजून घेणारं कोणी नसतं, मनातल्या भावना जाणून घेणारं कोणी नसतं, व्यक्त होण्यासाठी काही व्यासपीठच नसतं, म्हणून ही मुलं भरकटतात. पण या मुलांना योग्य भान दिलं, स्व जाणीव करुन दिली, त्यांना समजून घेतलं, त्यांच्यावर प्रेम केलं तर ही मुलं पुन्हा योग्य मार्गावरही येतात. हा माझा अनुभव आहे.
चुकीचा मार्ग सोडून भानावर आलेल्या मुलांपैकी कोणी कपडे विणण्याच्या कारखान्यांमध्ये राबत आहेत, कोणी वेगवेगळ्या मशिनी चालवतात, कोणी फोटोग्राफी करत आहेत आणि आज ही मुलं आप आपल्या क्षेत्रात समाधानी आहेत. एक शिक्षक म्हणून हेच माझं यश आहे असं मला वाटतं.
आज एक शिक्षक म्हणून केवळ पुस्तकी शिक्षण न देता मुलांना आजूबाजूच्या जगाचं भान आणलं, स्व जाणीव निर्माण केली, त्यांना स्वत:चं आयुष्य उभारता यावं यासाठी त्यांचा पाया त्यांच्यातल्या कौशल्यांना प्रोत्साहन देवून पक्का केला याचं खूप समाधान वाटतं. या सर्व गोष्टी आनंद, समाधान देणाऱ्या आहेत. त्यामुळेच निवृत्तीनंतरही मी शिक्षक म्हणूनच काम करणार आहे.