विशेष मुलांचं पालकत्व, त्यातही आईपण ही सोपी गोष्ट नसते. आपल्या पोटच्या बाळावर खूप प्रेम असलं तरी त्याला आयुष्यभर सांभाळणं, स्वावलंबी करत स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करणं ते त्याची सुरक्षितता, शारीरिक मानसिक गरज आणि आर्थिक पाठबळ हे सारं पालकांचीही परीक्षा पाहतं. त्यातही खेडोपाडी असलेले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालक आणि मानसिकदृष्ट्या अपंग, विशेष, दिव्यांग मुलगी जर पदरात असेल तर त्या आईबाबांना काळजी सतावतेच, मुख्य काळजी असते आपल्या पश्चात, वाढत्या वयात या मुलीचं कसं होणार? तिला कोण सांभाळणार? या प्रश्नांचं उत्तर शोधायचं म्हणून नाशिकच्या विद्या फडके यांनी पुढाकार घेत नाशकात घरकुल परिवार ही संस्था सुरु केली. मानसिक-शारीरिकदृष्ट्या दिव्यांग, विशेष मुलींसाठी महाराष्ट्रात असलेली ही पहिली संस्था. वय वर्षे १८ ते ६२ या वयातील ५८ मुलींसाठी आज घरकुल ही संस्था त्यांचं हक्काचं घर बनली आहे. आणि विद्या फडके, त्यांच्या आई. घरकुलमध्ये राहणाऱ्या सर्व विशेष मुली त्यांना ‘आई’च म्हणतात आणि ५८ मुलींची आई होत विद्या फडके आणि घरकुल त्या मुलींचा दिवसरात्र विचार करत त्यांना मायेचं, उबदार घर देण्यासाठी कष्ट करतात.
मदर्स डे निमित्त घरकुलची आणि त्या घरकुलाची आई झालेल्या विद्या फडकेंची ही गोष्ट.
विद्याताई विशेष मुलामुलींच्या एका शाळेत ३२ वर्षे मुख्याध्यापक होत्या. विशेष, गतीमंद, दिव्यांग मुलांचे पालक त्यांना भेटत, तेव्हा अनेकदा बोलून दाखवत की या मुलांचं आमच्या पश्चात कसं होणार? आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या पालकांनाही आपल्या वाढत्या वयाच्या मुलींची काळजी असे. विद्याताई सांगतात, ‘ हे पालक माझ्याशी बोलत, तेव्हा त्यांची काळजी समजत असे. या मुलींचा सांभाळ करणारीच नव्हे, केवळ निवासाची सोय नव्हे तर त्यांना हक्काचं घर मिळावं, त्या घरात प्रेम-नाती-जिव्हाळा-आपुलकी आणि सुरक्षितता मिळावी अशी जागा हवी असं वाटत होतं. पण विशेष मुलींना सांभाळणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना जमेल अशी कौशल्यं शिकवणं आणि त्या आनंदात राहतील अशी तजबीज करणं हे सारं सोपं नव्हतं. पण सुरुवात झाली चार मुलींपासून. चारच मुलींचं महिनाभराचं एक शिबिर आम्ही घेतलं. वाटलं, महिनाभर सांभाळणं तरी जमतंय का ते आधी पाहू. ते शिबिर उत्तम झालं, मुली इतक्या आनंदानं राहिल्या की त्यांना परत घरी जायचं नव्हतं. त्यांची नाती, त्यांचं जग तयार व्हायला लागलेलं आम्हाला दिसलं. आणि त्यातून मग २०१६ साली मदतीच्या हातांच्या सहकार्यानं आम्ही घरकुल परिवार यासंस्थेची स्थापना केली. आता नाशिकजवळ पिंपळगाव बहूला इथं राज्यभरातून लांबलांबून मुली आमच्या संस्थेत येतात. आमच्या सरकारला सरकारी मान्यता असली तरी अनुदान नाही, त्यामुळे पूर्णत: देणग्यांवर आम्ही अवलंबून आहोत. आणि मुख्य म्हणजे फक्त मुली-महिलांसाठी काम करणारी ही संस्था, आमच्यासाठी मुलींची सुरक्षितता महत्त्वाची, त्यामुळे इथं आमचा स्टाफही सगळ्या महिलाच आहेत. आणि अत्यंत मायेनं, प्रेमाचं त्या मुलींचं सगळं करतात आणि या मुलीही इतक्या निरागस, प्रेमळ की क्षणात चिडतातही पण क्षणात हसतात, चुकलं तर कान पकडून चटकन सॉरी म्हणून खूप भरभरुन निरपेक्ष प्रेम करतात.’
५८ मुलींची जबाबदारीच नाही तर त्यांचं आईपणही आनंदानं निभावणाऱ्या, संस्थेत स्वत: राहत मुलींना वेळ देत ‘मुलींना काय आवडेल’ असा त्यांनाच केंद्रस्थानी कायम ठेवून त्याप्रमाणे नियोजन करत मुलींना वेगवेगळी कौशल्य शिकवणाऱ्या विद्याताई. अत्यंत हसतमुख. सकारात्मक ऊर्जेनं भारलेल्या. त्या ऊर्जेचं श्रेयही त्या आपल्या मुलींनाच देतात. म्हणतात, ‘ या मुलीच आमच्यावर इतकं प्रेम करतात, त्या मायेपोटी त्यांच्यासाठी काही करणं हेच आमचं बळ आहे.’आणि खरंच शारीरिक-मानसिक बळ आणि ऊर्जेवर हे जग चालताना दिसतं. मुलींचं औषधपाणी, त्यांच्या आंघोळी, ते नाश्ता, त्यांना वेगवेगळी कौशल्य शिकवणं, गायन-योगाभ्यास-नृत्य शिकवण्यासाठी विविध थेरपी शिकवणं हे सारं या घरकुलात रोज नियमित शिस्तीत चालतं. अगदी घड्याळाच्या काट्यावर. रोज एकामागून एक घडणाऱ्या गोष्टी आणि सोबत यातून अनेकजणी इथं नवीन गोष्टी हळूहळू शिकतात. आपला आत्मविश्वास परत मिळवतात. काहीजणी स्वयंपाकासाठीची मदत, भाज्या चिरणं-कणीक भिजवणं हे शिकतात तर कुणी बॉलपेन असेंबल करणं, शोभेच्या वस्तू बनवणं, मसाले-पापड करणं, शिवणकाम, मेणबत्त्या बनवणं ही सारी कामं सुरु असतात. त्यातून मुलींना आत्मसन्मान आणि आपण महत्त्वाचे, हवेसे आहोत, आपल्याला आपलं कुटुंब आहे असं वाटणं हे सारं इथं अखंड सुरु असतं. दिवसाला ८ हजार बॉलपेन इथं असेंबल होतात. विशेष मुलींच्या वर्तनसमस्या टाळण्यासाठी त्यांना एकाच रिपिटेटिव्ह पद्धतीचं काम देणं, व्यग्र ठेवणंही गरजेचं असतं. ते यातून साधतंच, आणि आपण काहीतरी स्वत: घडवलं याचा आनंदही असतो.
अर्थात तरीही अडचणी येतात, कधी मुली चिडतात, कधी तब्येत बिघडते, भावनिक चढउतार असतात मात्र इथल्या मुलींच्या सोबत असलेल्या संस्थेतल्या प्रशिक्षक आणि काळजी घेणाऱ्या ताई यासाऱ्यांना सांभाळून घेतात. कोरोनाकाळातले दोन वर्षे अवघड होते. त्याकाळात पहिल्या लाटेत ज्यांना पालक आहेत त्या मुलींना घरी पाठवावे लागले होते. तर मुलींमध्ये वर्तनसमस्या वाढल्या, ऑनलाइनही त्यांच्याशी संपर्क करत संस्थेनं त्यांना सांभाळलं. दुसऱ्या लाटेत मात्र घरकुलातच राहिलेल्या मुलींना त्याहीकाळात संस्थेनं उत्तम सांभाळलं.घरकुलातली एक आदिती इथं भेटते. इथं आली तेव्हा ती नीट बोलू शकत नव्हती, पण आता ती उत्तम गाते, उत्तम नृत्य करते, मोठमोठ्या कविता तोंडपाठ म्हणते. सिंगापूरला झालेल्या एक स्पर्धेत तिला सहभागी होता यावं म्हणून संस्थेनं खूप प्रयत्न केले आणि सिंगापूरला झालेल्या त्या स्पर्धेत आदितीला सुवर्णपदक मिळाले. अजिबात आत्मविश्वास नसलेली हीच मुलगी आता इतर मुलींना गाणं आणि नृत्यही शिकवते. मायेनं उभं केलेलं जिव्हाळ्याचं जग किती देखणं आणि सकारात्मक असू शकतं याचा अनुभव घरकुलमध्ये गेल्यावर घेता येतो. विद्याआईच्या या लेकी अतिशय मायेनं या घरकुलात राहतात.
संपर्क
gharkulparivar@gmail.com
https://www.facebook.com/GharkulParivar/