Join us  

सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात रेस्क्यू ऑपरेशनसाठी धावणारी फक्त १८ वर्षांची सह्याद्री कन्या, तनया कोळीची अनोखी कणखर जिद्द

By सायली जोशी-पटवर्धन | Published: October 16, 2023 3:36 PM

Navratri Special tanaya Koli Story of Rescue operation Specialist from Nashik : नवरात्र स्पेशल : १८ वर्षांची तरुणी, पण डोंगरदऱ्यातून मदतीची हाक आली तर ती रेस्क्यू ऑपरेशनसाठी आपल्या टीमसह मदतीला धावते.

सायली जोशी- पटवर्धन 

वयाच्या पाचव्या वर्षापासून ती वडिलांसोबत ट्रेकींग करते, इतकेच नाही तर त्यांना येणारे रेस्क्यूचे कॉल ऐकते. म्हणजे डोंगरदऱ्यात कुणी अडकलं असेल, अडचणीत असेल तर त्यांना सोडवण्यासाठी मदत करायला जाते. त्यासाठी ते करत असलेली मेहनत पाहते आणि अनुभवतेही. वडिलांनी घेतलेला हा ध्यास आपण पुढे न्यावा यासाठी अवघे १८ वर्ष वय असलेल्या या तरुणीची धडपड आपल्याला थक्क करणारी आहे. तिचं नाव आहे तनया कोळी. ती नाशिकची. या वयात खरंतर ट्रेकींग ही अनेकांसाठी मज्जा-मस्ती करण्याची गोष्ट, पण मजा-मस्ती करत असताना सुरक्षितता खूप जास्त महत्त्वाची आहे. तनयाचे वडील दयानंद कोळी यांची नाशिक क्लायंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशन संस्था आधी नाशिकमध्ये आणि आता संपूर्ण महाराष्ट्रात काम करते.

त्यांचेच काम पुढे तनया मोठ्या जिद्दीने पुढे नेते आहे. केवळ वडीलांसोबत काम करुन ती थांबली नाही तर या विषयातले विशेष प्रशिक्षण घेऊन तनया आता गिर्यारोहकांना प्रशिक्षण देते.  गिर्यारोहण करताना अपघात झाला तर त्यात बचावकार्य कसे करायचे याचे ते ट्रेनिंग. हे ट्रेनिंग घेणाऱ्यांमध्ये सामान्यांबरोबरच महाराष्ट्र पोलिस अकॅडमीमधील पोलिस दलातील प्रशिक्षणार्थांचाही समावेश असतो. यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री, क्लायम्बिंग, संवाद कौशल्य, अडचणीच्या वेळी परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य अशा एक ना अनेक गोष्टी तिने आत्मसात केल्या असून इतरांनाही त्या याव्यात यासाठी तिची धडपड सुरू आहे. 

तनया सांगते...

कोरोना काळात सगळंच ठप्प झालं त्यावेळी आमच्या संस्थेचे कामही थांबले होते. पण बाबांच्या एका मित्राने मला या विषयातले तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी आग्रह केला आणि माझी त्यांच्या ट्रेनिंगसाठी निवडही झाली. याठिकाणहून तिने क्लायम्बिंगसारख्या बऱ्याच गोष्टी शिकल्या. त्यानंतर हिमालयात जाऊनही स्पेशल ट्रेनिंग घेतले. सगळ्यात पहिल्यांदा मी आणि बाबा बाजारातून जात असताना आमच्या समोर एक मोठा अपघात झाला. बाबांकडे आणि आता माझ्याकडेही कायम फर्स्ट एड कीट असतं, त्यामुळे बाबा लगेचच या लोकांच्या मदतीसाठी धावले. त्यावेळी रक्त पाहून मी काहीशी घाबरले आणि बाजूला झाले. पण तेव्हाच बाबांनी मला घाबरु नको आणि पुढे येऊन मदत कर. आता आपल्याला कायम हेच काम करायचं आहे असं बजावून सांगितलं. त्यानंतर असे बरेच प्रसंग आले आणि रेस्क्यू ऑपरेशन किंवा बचाव कार्य करण्याच्या या गोष्टींसाठी मी कशी तयार होत गेले माझं मलाही कळलं नाही. त्यामुळे बाबांकडून हे सगळे माझ्याकडे आले आहे यात काहीच वाद नाही. ट्रेकींग किंवा अडकलेल्या लोकांना वाचवणं हे थ्रिलिंग काम वाटत असलं तरी ते खूप आव्हानात्मक असतं. यामध्ये असंख्य तांत्रिक अडचणी येत असतात पण ते केल्यानंतर मिळणारं समाधान कशातच मोजता येण्याजोगे नाही हेही ती आवर्जून सांगते.  

आव्हानात्मक काम करणारी वाघिण....

बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेली तनया गातेही अतिशय उत्तम. आता संस्थेला बचाव कार्यासाठी फोन आले की तनया तिची टिम घेऊन स्वत: जाते. मुसळधार पावसात अडकलेल्या ग्रुपमधील एका व्यक्तीला पाण्याच्या प्रवाहातून वाचवताना आलेला अनुभव ऐकताना आपल्या अंगावर अक्षरश: काटे येतात. प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ची, आपल्या टिमची काळजी घेत हे आव्हानात्मक काम करणारी ही अवघ्या १८ वर्षाची तरुणी आपल्याला थक्क करते. लहान मुलांना ट्रेकींगला घेऊन जाण्यापासून सुरक्षितता शिकवण्यापर्यंत आणि पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यापासून लष्कराच्या काही गटांना गड-किल्ल्यांविषयी माहिती देण्यापर्यंतच्या असंख्य गोष्टी ही चुणचुणीत मुलगी सातत्याने करत असते.

अशावेळी मध्यरात्री जरी रेस्क्यूचे फोन आले तरी आमची बॅग तयार असते आणि ती घेऊन आम्ही तातडीने याठिकाणी पोहोचतो असे तनया अतिशय उत्साहाने सांगते. त्यामुळे इतक्या लहान वयात असलेली समज, उत्साह आणि समाजाप्रती काम करण्याची तिच्यातील जिद्द अतिशय उमेद देणारी आहे. डोंगरदऱ्यात फिरणारी ही तरुणी गातेही फार छान. निसर्गाचा ताल कळता कळता तिला स्वत:ची लयही सापडते आहे.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023प्रेरणादायक गोष्टी