Join us  

लठ्ठ आणि बारकुड्या तरुणींसाठी त्यांनी बनवले ‘ब्रालेस’ कपडे; ‘साइज’ नाही, कम्फर्टचं बोला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 3:08 PM

ब्रा घालायची की नाही घालायची हा मुद्दाच नाही. ती घालून येणारा अस्वस्थपणा, अवघडलेपण, रॅश हा मुद्दा आहे. फार जाड किंवा फार बारीक बायकांसाठी म्हणून त्यांनी तयार केला ब्रालेस क्लोदिंगचा नवा प्रकार.

ठळक मुद्देहिदर इटोन आणि जेन डॉंग या दोघींनी ऑगस्ट २०२१ मधे फ्रॅंकलीन अँप्रेल ही ब्रालेस क्लोथिंग कंपनी सुरु केली.‘किकस्टार्ट’ या क्राऊड फंडिगच्या आधारावर आपली ब्रालेस क्लोथिंगची कंपनी सुरु केली.काही महिन्यातच आतापर्यंत अमेरिकेत ५० पैकी ४२ राज्यात त्यांनी तयार केलेला माल पोहोचवायला सुरुवात केली आहे.

स्तन आणि ब्रा हे शब्द चारचौघात उच्चारायला अवघडल्यासारखं होतं. पण ब्रा ही महिलांच्या कपड्यांच्या प्राथमिक गरजांमधली एक मुख्य गरज आहे. पण आपली आवड आणि आपली गरज याच्याशी मेळ खाणारी ब्रा क्वचितच मिळते असा अनुभव हा केवळ स्थानिक नसून तो जागतिकही आहे. काही ब्रा अतिशय सुंदर असतात पण त्या ज्यांच्या स्तनांचा आकार लहान आहे त्यांना सूट होतात तर मोठ्या आकाराच्या स्तनांसाठी मात्र उपलब्ध असणार्‍या ब्रा या दिसायला अजागळ आणि महागही असतात. खरंतर ब्रा हा प्रामुख्यानं महिलांच्या स्तनांना सुरक्षा मिळण्यासाठी आणि आरामदायक जाणीवेसाठी तयार केलेल्या असून महिलाही ब्रा घेताना आणि वापरताना हाच विचार करतात.

पण प्रत्यक्षात ब्रा घातल्यानंतर मात्र आपण आपल्याच शरीराची घुसमट करुन घेतो की काय असा प्रश्न निर्माण व्हावा इतका अस्वथपणा ब्रा घातल्यानंतर होतो. स्तनांचा आकार हा मोठा असल्यास त्यासाठी उपलब्ध साइजेसमधील ब्रा वापरणं हाच पर्याय ठरतो तेव्हा ब्रा चा जाच व्हायला लागतो. हा जाच आपण स्वत:हून का करुन घ्यावा? नाहीच घातली ब्रा तर काय होईल? ब्रा शिवाय वावरणं आपल्याला आरामदायक वाट त असेल तर इतरांच्या नजरांचा त्रास का करुन घ्यावा या उद्देशानं ‘ब्रालेस मुव्हमेण्ट’ आकाराला आली. त्याला अनेक महिलांनी सपोर्टही केला. पण अशा आंदोलनाने मोठ्या स्तनांना हवी असलेली सुरक्षितता, सुबकता, आरामदायीपणा, आधार हा ब्राशिवाय कसा मिळेल हा प्रश्न होताच. त्यामुळे ज्यांच्या स्तनांचा आकार मोठा आहे त्या ब्रालेस मुव्हमेण्टच्या परीघाबाहेरच राहिल्या.

Image: franklyapparel.com

ब्रा घालायची न घालायची हा मुद्दाच नाही. ती घालून येणारा अस्वस्थपणा, होणारा त्रागा हा मुद्दा आहे. आणि तो काही फक्त ब्रा घेतानाच आडवा येतो असं नाही. फॅशनेबल कपडे घेतानांही हा मुद्दा असतोच. आणि त्यामुळे जितकं अस्वस्थ अयोग्य आकाराच्या ब्रा घातल्यानं होतं तितकीच घुसमट फॅशनेबल आणि महागाचे कपडे घातल्यानेही होते. याचं कारण एकच हे ड्रेस छातीत नीट बसत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याप्रमाणे ज्यांचे स्तन लहान असतात त्यांची कंबरही बारीक असते असं नाही आणि ज्यांच्या स्तनांचा आकार मोठा असतो त्यांची कंबर लहान असते. अशा परिस्थितीत केवळ स्तनांच्या आकाराला डोळ्यापुढे ठेवून तयार केलेले कपडे घातल्यावर अनेकींना संकोच वाटतो, अस्वस्थ वाटतं, घुसमट वाटते. मग अशा परिस्थितीत अशी जाणीव होणार्‍या महिलांनी त्यांना आवडलेले फॅशनेबल कपडे घालायचेच नाही का? त्यांनी उपलब्ध साइजेसच्य ड्रेसमधे स्वत:ला कसंबसं अँडजेस्ट करुन घ्यायचं की असे कपडे आपल्यासाठी नाहीच असं म्हणायचं? यावर ‘फ्रॅंकलीअँप्रेल’ या कंपनीनं पर्याय शोधला आहे. अमेरिकेतली ही कंपनी पहिली ब्रालेस क्लोथिंग कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी दोन महिलांनी सुरु केली असून त्यांना जाणवणारा प्रश्न सोडवताना त्यांनी इतरांचा प्रश्नही सोडवला आहे. फॅशनेबल कपडे घालताना आपल्या स्तनांच्या आकाराची अडचणच कोणाला यायला नको अशा सर्व साइजेसच्या स्तन आणि बॉडीशेप विचारात घेऊन या दोघींना कपडे तयार करायचे आहे.

Image: franklyapparel.com

कोण त्या दोघी?

हिदर इटोन आणि जेन डॉंग या दोघींनी  २०२१ मधे 'फ्रॅंकली अँप्रेल' ही ब्रालेस क्लोथिंग कंपनी सुरु केली. या दोघींनी स्टॅनफोर्ड विद्यापिठात एकत्र एमबीए केलं होतं. ही कंपनी सुरु करताना त्यांनी एमबीए ला घेतलेला प्रोजेक्ट आणि त्यासाठी सर्वेक्षण करताना महिलांशी बोलताना आलेला अनुभव ही कंपनी सुरु करण्यासाठी कारणीभूत ठरला. एखादी गोष्ट व्हावी असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ती आपण स्वत:च केली पाहिजे हा एमबीए मधे शिकवलेला धडा त्यांना ही कंपनी काढण्यास प्रेरणादायक ठरला.

Image: franklyapparel.com

हिदर इटोन हिच्या स्तनांचा आकार मोठा तर जेन ही उंच आणि तिच्या स्तनांचा आकार लहान. दोघीही आपआपल्यास्तरावर या वैशिष्ट्यांसह संघर्ष करत होत्या. दोघींनाही उचित मापाचे कपडे घालण्याचं समाधान मिळत नव्हतं. हिदरला कपडे घालताना ते छातीकडील भागात घट्ट व्हायचे तर जेनला मात्र कमरेच्या ठिकाणी कपडे ढगळे व्हायचे. त्या दोघी एकमेकींशी बोलायच्या तेव्हा दोघीही एकमेकींकडे असे कपडे घालायला मिळायला हवे जे घालताना स्तनांच्या आकाराची अडचण न येता ते कपडे आपल्याला फिट बसावे आणि फॅशन करण्याचा आनंद मिळावा, अशी इच्छा बोलून दाखवायच्या. त्यांनी एमबीएला म्हणूनच असा प्रकल्प निवडला. त्यात त्यांनी महिलांच्या मुलाखती घेऊन स्तनांचा आकार, बॉडी शेप आणि कपडे यांचं रिलेशन समजावून घेतलं. या मुलाखतींमधे त्यांना एक बाब प्रामुख्यानं आढळली की महिलांना ब्रा लेस हा पर्याय नको आहे. त्यांना ब्रामुळे स्तनांना मिळणारे फायदे हवेत आहेत. पण त्यांना ड्रेस घालताना स्तनांच्या आकाराची अडचणही नको होती. आता या दोन गरजांचा मेळ कसा घालायचा यावर दोघींनी विचार केला, अभ्यास केला, डिझाइन तयार करुन् ‘ब्रालेस क्लोथिंग’चा पर्याय तो शोधला.

कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती यथातथा असण्याच्या काळात दोघींनी ‘किकस्टार्ट’ या क्राऊड फंडिगच्या आधारावर आपली ब्रालेस क्लोथिंगची कंपनी सुरु केली. त्यांना क्राउड फंडिगद्वारे 25,000 डॉलर जमा करायचे होते. पण त्यांची कल्पना इतकी हिट झाली की पहिल्या पाच तासातच 25,000 डॉलर जमा झाले. आणि एकूण क्राउड फंडिगद्वारे त्यांनी अपेक्षेपेक्षा दुप्पट म्हणजे 50,000 डॉलर जमा केले.

Image: franklyapparel.com

हिदर टोनला डिझायनिंगचा अनुभव होता तर जेनला अकाउण्टिंग आणि मॅनेजमेंटचा. या दोघींनी फ्रॅंकली ही कंपनी सुरु केली. या कंपनीचं विशेष म्हणजे स्प्लीट साइजेसमधील कपडे. ही कंपनी आधी कपडे तयार करत नाही. तर फॅशन लॉंच करते आणि मग त्या फॅशनचे कपडे अपेक्षित आकारात बनवून देण्याचं काम करते. त्यामुळे त्यांच्याकडील फॅशनेबल कपडे विशिष्टच आकारात उपलब्ध नसतात तर उलट साइजेसच्या मागणीनुसार फॅशनेबल कपडे या फ्रॅंकली ब्रालेस क्लोथिंग कंपनीकडे उपलब्ध  आहे. आता त्यांच्याकडे स्तनांचा आकार आणि बॉडी शेप यांच्या साइजेसची मोठी लिस्ट असून त्यांना फॅशनेबल कपडे तयार करताना त्याची मदत होत असून आपल्या या लिस्टमधे त्यांना जास्तीत जास्त आणि सर्व प्रकारचे  स्तनांचे आकार आणि बॉडी शेप यांचा समावेश करायचा आहे.

Image: franklyapparel.com

फ्रॅंकली या कंपनीने सुरुवात केल्यानंतर काही महिन्यातच आतापर्यंत अमेरिकेत 50 पैकी 42 राज्यात त्यांनी तयार केलेला माल पोहोचवायला सुरुवात केली आहे. कंपनीने तयार केलेल्या कपड्यांचा व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल झाला होता ज्याला कोट्यावधी व्ह्यूज मिळाले होते. ब्रालेस कपडे यामुळे महिलांना ब्रामुळे स्तनांना आधार तर मिळालाच सोबत ब्रा न घालताही अजिबात अवघडलेपणा न येता फॅशनेबल कपडे घालण्याची त्यांची हौस पूर्ण होते आहे.

Image: franklyapparel.com

महिलांच्या फॅशनेबल कपडे घालतानाच्या बेसिक इच्छा पूर्ण करणारे, विविध फॅशनचे ड्रेस जास्तीत जास्त आकारात उपलब्ध करुन देणे हेच हिदर इटोन आणि जेन डॉंग यांचं स्वप्न आहे. त्या म्हणतात, 'सध्याची फॅशन इंडस्ट्री मूठभर महिला आणि विशिष्ट साइजेसच्या महिलांचा विचार करते तोही अल्पकाळासाठी पण आपल्याला फॅशनेबल कपडे तयार करताना सर्व साइजेसच्या महिलांचा विचार करुन त्यांच्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करणारे चांगल्या प्रतीचे, दीर्घकाळ टिकणारे, उत्तम डिझाइनचे कपडे फ्रॅंकली ब्रालेस क्लोथिंग कंपनीनं करावे हा आमचा कंपनी सुरु करतानाच उद्देश होता, तेच ध्येय असून आमचं स्वप्नंही तेच आहे!'

टॅग्स :31 डिसेंबर पार्टीफॅशन