Join us  

टिना डाबीची बहिण रियाही झाली IAS; म्हणाली मोठ्या बहिणीची मदत लाखमोलाची.. कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 6:25 PM

IAS अधिकारी टिना डाबी (Tina Dabi) आठवते ना? आता तिची धाकटी बहिण रिया डाबीही झाली आहे आयएएस अधिकारी. दोघी बहिणींची ही कामगिरी ठरली आहे कौतूकास्पद.

ठळक मुद्देमोठा भाऊ किंवा बहिणी कर्तबगार असली की आपोआपच लहान भावंडांनाही तसा धडा मिळतो आणि मोठ्या भावंडांच्या वागणूकीतून, वर्तनातून लहान भावंड घडत जातात. असंच काहीसं झालं आहे टिना आणि रिया या दोन बहिणींचं.

२०१६ च्या युपीएससी परीक्षेत टॉपर असलेली टिना डाबी (Tina Dabi) म्हणजे एक मोठाच चर्चेचा विषय. ती IAS अधिकारी झाली, तेव्हा तिची जेवढी चर्चा झाली होती, तेवढीच चर्चा तिच्या लव्ह मॅरेजची देखील झाली होती. आता तिची सख्खी लहान बहिण देखील तिच्या पावलावर पाऊल टाकून यशस्वी झाली आहे. नुकत्याच लागलेल्या युपीएससी परीक्षेत रियाने बाजी मारली असून ती देखील आयएएस अधिकारी झाली आहे. दोघी बहिणींनी मिळविलेले हे यश खरोखरच कौतूकास्पद असून त्यांच्या आई- वडिलांसाठी तर ही अत्यंतिक आनंदाची गोष्ट आहे.

 

मोठा भाऊ किंवा बहिणी कर्तबगार असली की आपोआपच लहान भावंडांनाही तसा धडा मिळतो आणि मोठ्या भावंडांच्या वागणूकीतून, वर्तनातून लहान भावंड घडत जातात. असंच काहीसं झालं आहे टिना आणि रिया या दोन बहिणींचं. सर्वसामान्य घरातल्या या दोघी बहिणी. ५- ६ वर्षांपूर्वी मोठी बहिण टिना जेव्हा आयएएस अधिकारी झाली, तेव्हाच रियालाही बहिणीचे यश बघून प्रेरणा मिळाली आणि बहिणीने दाखविलेल्या पाऊल वाटांवर रियाही चालू लागली. बहिणीचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आपल्यासाठी लाखमोलाचे ठरले असून या यशात आई- वडिलांसोबतच मोठी बहिण टिनाच्या मार्गदर्शनाचाही वाटा आहे, असेही रियाने बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करताना सांगितले. बहिणी बहिणींचं नातं असंतच मुळी निराळं. दोघी भांडतात, एकमेकींना नावं ठेवतात, रुसतात- चिडतात आणि पुन्हा एकदा सगळं विसरून एकमेकींच्या गळ्यातही पडतात. एकमेकींना मदतीचा हात देतात आणि कायम पुढे जाण्याची प्रेरणा देतात, हेच पुन्हा एकदा टिना आणि रिया यांच्या यशातून सिद्ध झालं आहे. 

  रियाच्या बाबतीत सगळ्यात कौतूकाची गोष्ट अशी की तिने हे यश पहिल्या प्रयत्नात मिळवले असून सध्या ती फक्त २३ वर्षांची आहे. दोन्ही लेकी आयएएस अधिकारी होणं ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असं टिना आणि रियाने वडील जसवंत तर आई हिमानी यांनी सांगितलं. 

कोण आहे टिना डाबी?टिना डाबी ही २०१६ च्या युपीएससी बॅचची टॉपर. आयएएस अधिकारी झाल्यानंतर टिनाने आयएएस अधिकारी अतहर आमिर खान याच्याशी प्रेमविवाह केला. या विवाहाला बराच विरोध झाला पण तिने विवाह केला. काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोटही झाला. पण या सर्व प्रकरणावरून टिना डाबीची बरीच चर्चा झाली होती. टिनानेच आपली बहिणही आता आयएएस अधिकारी झाल्याचं सोशल मिडियावर पोस्ट टाकून शेअर केलं आणि बहिणीच्या यशामुळे तिला झालेला आनंद व्यक्त केला. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीरिलेशनशिपकेंद्रीय लोकसेवा आयोग