Tokyo 2020 Paralympic : ‘जोपर्यंत यशस्वी होणार नाही तोपर्यंत मी प्रयत्न करतच राहीन’, हे ध्येय आहे गुजरातमधल्या भाविना पटेलच. ही 34 वर्षाची भाविना पटेल कोण हे एव्हाना लक्षात आलंच असेल. टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतली ही जिद्दी टेबल टेनिस खेळाडू. टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची टेबलटेनिसपटू भाविना पटेल हिला Class 4 च्या अंतिम फेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा सामना चीनच्याच यिंग झोयूशी झाला आहे. आज झालेल्या Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा यिंग झोयूने पराभव केला. यावेळी चीनच्या यिंग झोयूने भाविनावर 3-0 (11-7, 11-5, 11-6 ) असा शानदार विजय मिळवला. दरम्यान, पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस खेळात अंतिम फेरी गाठणारी भाविना पहिलीच भारतीय खेळाडू आहे.
छायाचित्र:- गुगल
पण भाविनात सुरुवातीला एवढी जिद्द आणि चिकाटी नव्हती. पण व्हीलचेअरवर खिळलेल्या स्थितीत तिला एक स्वप्न पाहाण्याची संधी मिळाली. ती यशस्वी करण्यासाठी मग भाविनानं आपल्यातली सर्व ताकद पणाला लावली. तिच्या व्हीलचेअरवरील आयुष्यात 2004 मधे टेबल टेनिस हा खेळ आला. अर्थात तिला आधी याची आवड होती, काही पार्श्वभूमी होती असं नाही. पण फिटनेससाठी तिने हा खेळ खेळायला सुरुवात केली आणि नंतर टेबल टेनिसनं तिचं आयुष्य भारावून टाकलं.
6 नोव्हेंबर 1986 साली गुजरात राज्यात मेहसना जिल्ह्यातील वडनगर तालुक्यातील सुंधिया या छोट्याशा गावात भाविनाचा जन्म झाला. जन्मली तेव्हा भाविना सर्वसामान्य मुलांसारखीच होती. पण ती एक वर्षाची झाली आणि तिला पोलिओ झाला. अतिसामान्य कुटुंब. घरात पाचजणं. कमावते फक्त एकटे वडील. पैशांअभावी वडिलांना तिला नीट उपचार देता आले नाहीत. पण काही वर्षांनी आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणम येथील एका रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली पण या शस्त्रक्रियेने अपेक्षित परिणाम दिले नाहीत. शिवाय तिची नीट काळजी घेण्यात आली नाही आणि शस्त्रक्रियेनंतर ठीक होण्यासाठी आवश्यक असलेले उपचार तिला मिळाले नाहीत. तरुण वयातच भाविनाला व्हीलचेअरवर खिळून बसावं लागलं.
छायाचित्र:- गुगल
पायातली ताकद गमावलेल्या भाविनाची मनाची ताकद मात्र कायम होती. ती सुंधिया गावातल्या शाळेत इतर सर्वसामान्य मुलींसोबत शिकली. 2004 मधे तिच्या वडिलांनी तिला अहमदाबादमधील ‘ब्लाइण्ड पीपल्स असोसिएशन या संस्थेत दाखल केलं. इथे भाविनानं कम्प्युटर कोर्स केला. शिवाय पत्रव्यवहार अभ्यासक्रमाद्वारे पदवी मिळवली. या ब्लाइण्ड पीपल्स असोसिएशननं भाविनाच्या आयुष्याला कलाटणी दिली. तिची भेट टेबल टेनिस प्रशिक्षक असलेले लाला दोशींशी झाली. त्यांनी तिला तिच्या फिटनेससाठी टेबल टेनिस खेळण्याचा सल्ला दिला. आणि व्हीलचेअरवरील भाविनाची ओळख एक टेबल टेनिस खेळाडूमधे रुपांतरित झाली. टेबल टेनिस हेच तिचं ध्येय आणि वेड बनलं. 2004 पासून सुरु झालेला टेबल टेनिसच्या जगातला तिचा प्रवास तिला 2021 मधे टोकियोमधील पॅरालिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत घेऊन आला. जेव्हापासून भाविनानं टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली तेव्हापासून एकदाही तिच्या मनात आपल्याला हे जमणार नाही, आपण कमी पडू असा विचार आला नाही.
छायाचित्र:- गुगल
2004 पासून टेबल टेनिस खेळायला सुरुवात केलेल्या भाविनानं 2009 मधे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण केलं आणि 2011 मधे पॅरा टेबल टेनिस थायलंड ओपन स्पर्धेत चीनच्या स्पर्धकाला हरवत रजत पदक मिळवलं. हे तिचं पहिलं आतंरराष्ट्रीय पदक. नंतर 2013 मधे भाविनाच्या रुपानं भारतानं एशियन रिजनल चॅम्पियनशीप स्पर्धेत ऐतिहासिक रजत पदक मिळवलं. भाविनानं तेव्हापासून जॉर्डन, तैवान, चीन, दक्षिण कोरिया, जर्मनी, इंडोनेशिया, स्लोव्हेनिया, थायलंड, स्पेन, नेदरलॅण्डस, इजिप्त येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्यानं भाग घेतला, पदकं मिळवली. पण सुवर्ण पदक मात्र कायम तिला हुलकावणी देत राहिलं.
छायाचित्र:- गुगल
पण भाविना निराश न होता प्रयत्न करतच राहिली. प्रत्येक स्पर्धेनंतर त्याच्या पुढच्या स्पर्धेसाठी ती अधिकाधिक कठोर परिश्रम घ्यायची. 2019 मधे तिच्या या कठोर परिश्रमांना यश आलं. 2019 मधील थायलंडमधील बॅंकॉक येथे झालेल्या पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमधे एकेरी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं. पण म्हणून भाविनाचं करिअर खूप सहजरित्या पुढे सरकत गेलं असं नाही. तिला अनेक धक्के सोसावे लागले. अहमदाबादमधील 'इएसआयसी"मधे नोकरी करणारी भाविना 2016 मधे पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरली पण तांत्रिक अडचणींमुळे तिला त्या स्पर्धेत खेळातच आलं नाही.त्यापूर्वी 2010 मधेही कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला भाविनाकडून पदकाच्या खूप आशा होत्या. पण तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. पण भाविनानं तिचा तोल, तिच्यातली शांतता जराही ढळू दिली नाही. ती स्वत:च्या खेळावर सतत कठोर परिश्रम घेत राहिली.
छायाचित्र:- गुगल
टोकियो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भाविना तीन खेळाडूंच्या गटातून उपउपांत्य फेरीत पोहोचली. तिनं या फेरीत सर्बियाच्या बलाढ्य खेळाडूला केवळ 18 मिनिटात हरवलं. त्याआधीच्या फेरीत भाविनानं ब्राझीलच्या खेळाडूला सरळ सेटमधे पराभूत केलं. भारतातील गुजरात राज्यातल्या छोट्यशा खेड्यातून आलेल्या या मुलीशी जिंकणं ही सोपी गोष्ट नाही याची जाणीव अंतिम फेरीतील तिच्या प्रतिस्पर्धीला नक्कीच झाली असेल!