ऑलिम्पिकची अजून तशी सुरुवात, पण ती सध्या चर्चेत आहे. जपानची १३ वर्षांची चिमुरडी मोमिजी निशिया. (momiji nishiya) ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच सामील केल्या गेलेल्या स्ट्रीट स्केटबोर्ड या खेळाचं पहिलं गोल्ड मेडल तिनं मिळवलं आहे. यंदा स्ट्रीट स्केटबोर्ड या खेळात पदकं जिंकणाऱ्या तिन्ही खेळाडू पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सामील झाल्या होत्या. तिघीही लहान वयाच्या आहेत. सुवर्णपदक पटकावणारी मोमिजी १३ वर्षे ३३० दिवसांची, रौप्य पदक घेणारी ब्राझीलची रेयसा लील ही मोमिजीपेक्षाही छोटी म्हणजे १३ वर्षे २०३ दिवसांची, तर कांस्य पदक पटकावणारी जपानची फुना नाकायामा १६ वर्षांची आहे. एकाच खेळात पहिली तिन्ही पदकं जिंकणारं ऑलिम्पिकमधलं हे सर्वात कमी वयाचं त्रिकूट आहे, असं मानलं जात आहे.
सगळ्यात कमी वयात ऑलिम्पिकचं सुवर्ण पदक मिळविण्याचा मान अमेरिकेच्या मार्जरी गेस्ट्रिंग हिच्या नावे जातो. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये १३ वर्षे २६८ दिवसांची असताना तिनं स्प्रिंगबोर्डमध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं.
अशा वेळी पुन्हा मुद्दा येतो, वय महत्त्वाचं कि अनुभव? क्रीडांगणावर खरंतर या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी दिशेने जाणाऱ्या ! वय अधिक म्हणजे शरीराची साथ कमी, तर कमी वयात अनुभव असा कितीसा असणार?... पण पराकोटीचं कौशल्य आणि मनोबल दाखवताना मोमिजी निशियाने अवघ्या जगाला थक्क केलं आहे !
- अर्थात ऑलिम्पिकचं मैदान सगळ्या मर्यादा पार करुन जाऊ शकतात, त्यांच्यासाठीच तर असतं ! ज्यांच्याकडे पराकोटीची क्षमता, जिद्द असते, ते त्यावर आपलं नाव कोरत असतात; मग त्यांचं वय कितीही असो आणि अनुभव असो, ...वा नसो !
मोमिजीची स्टोरी या जिद्दीसह कौशल्याची तर गोष्ट सांगतेय..