पहिलेच ऑलिम्पिक आणि थेट सुवर्ण पदकाला गवसणी.. अशी काही स्वप्नवत बाब ३० वर्षीय ॲनाने सत्यात उतरवून दाखविली आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली, म्हणजे नक्कीच ती चांगली सायकलिस्ट आहे, असा एक कयास तिच्याबद्दल बांधला गेला होता. पण म्हणून ती काय लगेच ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल वगैरे जिंकेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण बघता बघता चमत्कार व्हावा, असं काहीतरी स्फुरण ॲनाला चढलं आणि अनेक नामवंत, ख्यातीवंत स्पर्धकांना हरवत ॲनाने सुवर्णपदकावर तिचे नाव कोरले. मग मात्र सारेच अचंबित झाले आणि ही Anna Kiesenhofer नेमकी आहे तरी कोण, हे शोधण्यासाठी जगभरातून गुगलवर उड्या पडू लागल्या.
टोकियो ऑलिम्पिकदरम्यान नुकत्याच झालेल्या महिलांच्या ऑन रोड सायकलिंग स्पर्धेत गतविजेत्या अॅना व्हॅन डेर ब्रॅगेन, माजी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती एलिसा लांगो बोर्गीनी, ब्रिटनची लिझी डिगॅनन, जर्मनीची लिसा ब्रेनॉयर आणि माजी विश्वविजेत्या अॅनेमिक व्हॅन व्ल्युटेन यांच्याशी सामना करत ॲनाने हा विजय मिळविला आहे. या स्पर्धेदरम्यान ॲनाने १३७ किमी या अंतरावरच तिच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे सोडले होते आणि पुढचा ४० किमीचा प्रवास एकटीने करत विजयश्री मिळवली.
सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे सोडले आहे, हे लक्षात येताच ॲना वायूवेगाने पुढे झेपावत होती. कारण तिला माहिती होते, की हा वेग आता आपल्याला थेट सुवर्ण पदकापर्यंत घेऊन जाणार होते. या ४० किमीच्या प्रवासात मला माझे कुटूंबिय दिसत होते. ते मला लाईव्ह बघत आहेत, असे मला जाणवत होते आणि मी त्यांना बघूनच अधिक वेगाने पुढे झेपावत होते, असे ॲनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.
विजयानंतर बोलताना ॲना म्हणाली की, मी जिंकू शकते, असे कोणालाही वाटले नसले, तरी ही भावना स्पर्धेच्या वेळी मात्र कायम माझ्या मनात होती. कारण जर मी या स्टार्टिंग पॉईंटपर्यंत आले आहे, तर स्पर्धा जिंकण्याची कुवत निश्चितच माझ्यात आहे, यावर माझा विश्वास होता. जेव्हा मी सुवर्ण पदकासाठी असणारी रेषा ओलांडली तेव्हा मात्र माझा विश्वासच बसला नाही, सारे काही अचंबित आणि चक्रावून टाकणारे झाले होते, डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू ओघळत होते, असे ॲनाने अत्यानंदाने सांगितले. ॲना आणि तिच्यानंतर आलेली दुसरी स्पर्धक यांच्यामध्ये तब्बल ७२ सेकंदाचे अंतर होते.
कुटूंब माझे मोटीव्हेशन
माझी आई आणि माझे कुटूंबिय तसेच काही मित्रमैत्रिणी यांना सायकलिंग आणि एकूणच खेळाबद्दल फार काही कळत नाही आणि त्यांना यामध्ये खूप काही इंटरेस्ट पण नाही. पण तरीही माझ्या आनंदासाठी त्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिले. स्पर्धा चालू असताना ते मला लाईव्ह बघत आहेत, हेच माझ्यासाठी खूप मोठे मोटीव्हेशन होते, असेही ॲनाने सांगितले. मी जेव्हा आता घरी जाईल तेव्हा त्यांना माझ्या गळ्यात लटकणाऱ्या ऑलिम्पिक गोल्ड मेडलशी काहीही देणेघेणे नसेल. कारण माझा आनंदच त्यांच्यासाठी खूप मोठा आहे, असे ॲना म्हणाली.
मीच माझी स्ट्रॅटेजी ठरवली
ॲना म्हणाली की, सायकलिंगच्या काही टिप्स मी निश्चितच माझ्या काही प्रशिक्षकांकडून शिकून घेतल्या. पण त्यावरच मी अवलंबून होते, असे काही नाही. मी थोडी वेगळी आहे आणि मला इंडीपेंडंट रहायला आवडते. त्यामुळे सायकलिंग कसे करायचे, स्पर्धेसाठीचे प्लॅन्स कसे तयार करायचे, त्यासाठी काय तयारी केली पाहिजे, काय डाएट असला पाहिजे, हे सगळे माझे मीच ठरवले होते. "I have just this lonely fighter approach" असेही ॲनाने एका मुलाखतीत सांगितले आहे. ती म्हणते की गणिताची अभ्यासक म्हणून आलेला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, हे मला चांगले माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देखील कोणाची मदत न घेता माझी मलाच शोधायला आवडतात.
अशी आहे ॲना
ॲनाने केंब्रिज विद्यापीठातून गणित विषयात मास्टर डिग्री मिळविली असून तिने बर्सीलोनाच्या पॉलीटेक्निक युनिर्व्हसिटी ऑफ कॅटालोनिया येथून अप्लाईड मॅथेमॅटिक्स या विषयात डॉक्टरेट केली आहे. आपण थोडे वेगळे आणि युनिक आहोत, हे तिला बरोबर माहिती आहे. त्यामुळे आपण आहोत तसे मान्य करून जगापुढे येणे तिला भारीच आवडते. मला आता ऑलिम्पिक गोल्ड मेडल विनर म्हणून मिरवायचे नाही. विजयामुळे अचानक माझ्यावर आलेला हा स्पॉटलाईट बाजूला करून मला माझे आधीसारखे आयुष्य जगायचे आहे, असे ॲना म्हणते.