स्त्री- पुरूष समानता जोपासणारे जगातले पहिले ऑलिम्पिक म्हणून टोकियो ऑलिम्पिक ओळखले जात आहे. स्त्री पुरूष समानता आणि वांशिक न्याय या दोन सामाजिक विषयांना पाठिंबा दर्शवत ऑलिम्पिकची ही वारी मार्गस्थ झाली आहे. त्यामुळे ऑलिम्पिकच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रत्येक देशाकडून एक पुरूष आणि एक महिला असे दोन ध्वजवाहक नेमण्यात आले होते. स्त्री- पुरूष समानता आणि वांशिक न्याय या संकल्पनांचा परमोच्च बिंदू ठरला तो नाओमी ओसाका हिच्या हस्ते ऑलिम्पिक क्रिडाज्योत प्रज्ज्वलित होण्याचा सोहळा.
ज्या संकल्पनेवर Tokyo Olympics 2021 ची सुरूवात झाली आहे, त्याची योग्य प्रतिनिधी म्हणजे नाओमी ओसाका. त्यामुळे ऑलिम्पिक क्रिडाज्योत प्रज्वलित करण्याचा बहुमान मिळणे ही जशी नाओमीसाठी आनंदाची बाब होती, तशीच ती संपूर्ण जपानसाठीही होती. या निर्णयाचे जगभरातून पुरेपुर स्वागत झाले. कारण जपानमध्ये जन्मलेली आणि जपानसाठी खेळणारी नाओमी वयाच्या तिसऱ्या वर्षी अमेरिकेत गेली आणि तिथे तिला टेनिस शिकण्यापासून ते खेळण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत वांशिक अन्यायाविरूद्ध झगडावे लागले होते.
खरंतर ऑलिम्पिक क्रिडाज्योती प्रज्ज्वलित करण्याचा मान कुणाला मिळेल, हे एक शेवटपर्यंत दडवून ठेवलेेले रहस्य असते. क्रिडाप्रेमींच्या मनात या सोहळ्याविषयी उत्सूकता तर होतीच आणि क्रिडाज्योत कोण प्रज्वलित करणार, याचे अंदाजही मनोमन बांधले जात होते. पण ज्या देशात बेसबॉलवर प्रचंड प्रेम केले जाते, त्यादेशात ऑलिम्पिक क्रिडाज्योत एका टेनिसपटूने प्रज्वलित करावी, असा विचारही कुणाच्या मनात आला नव्हता.
पण सारेच अचंबित आणि सर्वांनाच सुखावह वाटावे, असे काही पुढच्या काही क्षणांमध्ये घडले. नाओमी स्टेजच्या मध्यभागी उभी राहिली. क्रिडाज्योत हळूहळू उमलत गेली आणि मग नाओमीने ती पेटवली. क्रिडाज्योत प्रज्वलित होताच जपानी झेंडे चहूबाजूंनी झळकले जाऊ लागले आणि फटाक्यांची जोरदार आतिषबाजी होत खेळाच्या महाकुंभाला सुरूवात झाली.
'ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मिळकत असून हा माझ्यासाठी सर्वोच्च बहुमान आहे. सध्या अधिक काय बोलावे हे मला समजत नाहीये. पण हा क्षण माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा असून मी मला हा बहुमान देऊ केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.', अशा शब्दांत नाओमीने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत तिचा आनंद व्यक्त केला.
मध्यंतरीचा काळ नाओमीसाठी खूप खडतर होता. प्रचंड डिप्रेशनने ती घेरलेली होती. पण जिद्दीला पेटलेली आणि खेळावर अतोनात प्रेम करणारी नाओमी त्यातूनही बाहेर पडण्याचा कसोशीने प्रयत्न करतीये. हा बहुमान म्हणजे Naomi is back with full of her strength असंच तर सांगत नाहीये ना...