ऋचिका सुदामे पालोदकर
Tokyo olympics: भारतीय महिला हॉकी संघात खेळणारी हरिद्वारची वंदना कटारिया (Vandana Kataria) आज इतिहास घडविणारी ठरली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू होता. करो अथवा मरो अशीच वेळ येऊन ठेपली होती. अशात वंदना संघासाठी ढाल बनून तळपली. जिद्द आणि एकाग्रतेच्या झंझावातात तिने एकामागून एक तीन गोल करत संघाला विजयरथाकडे स्वार तर केलेच पण स्वत:देखील इतिहास घडविला.
वंदनाच्या रूपाने तब्बल ३७ वर्षांनंतर एखाद्या भारतीयाने ऑलिम्पिकमध्ये गोल्सची हॅटट्रिक केली आहे. एवढेच नव्हे तर ऑलिम्पिकमध्ये गोल्सची हॅटट्रिक करणारी वंदना पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. वंदनाच्या बहारदार खेळामुळेच भारतीय संघ अ गटातील शेवटचा सामना जिंकू शकला आणि उपांत्यपूर्व फेरीच्या आशा जिवंत राहिल्या.देशाला विजयी करण्यात आपण योगदान दिले म्हणून वंदना प्रचंड आनंदी तर आहेच. पण तिच्या या विजयाला दु:खाची झालर आहे. कारण ज्या वडिलांनी आयुष्यभर वंदनाने ऑलिम्पिकमध्ये खेळावे, देशासाठी सुवर्ण पदक मिळविणाऱ्या ऑलिम्पिक संघात सहभागी व्हावे, असे स्वप्न पाहिले होते, तेच वंदनाचे वडील नहर सिंह आज लेकीने रचलेला इतिहास पहायला या जगात नव्हते.
वंदना हरिद्वारमधील रोशनाबादसारख्या लहान गावातली. या गावात जेव्हा ती खेळायला जायची, तेव्हा आजूबाजूचे लोकही तिला नावे ठेवायचे. खेळून काय होणार, असं सुचवायचे. पण वडील नहर सिंह आणि आई साेरन देवी यांनी मात्र वंदनाला लहानपणापासूनच भक्कम साथ दिली. दोन महिन्यांपुर्वी दि. ३० मे रोजी वंदनाच्या वडीलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वडिलांचे निधन झाले तेव्हा वंदना बँगलोर येथे टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी असणाऱ्या शिबिरात गेलेली होती. वडिलांनी आपल्यासाठी बघितलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिथे ती प्रचंड मेहनत घेत होती. पण ऑलिम्पिकची तयारी सुरू झाली आणि अवघ्या काही दिवसांतच वडिलांच्या मृत्यूची बातमी आली.
वडिलांचे अंतिमदर्शन घेण्यासाठी हरिद्वार गाठावे की त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शिबीरातच थांबावे अशी गोंधळलेली परिस्थिती निर्माण झाली. पण आईने आणि भावाने पुन्हा एकदा पाठिंबा दिला. जिथे आहे, तिथेच रहा आणि वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न कर, असे सांगितले. वडिलांचे आशिर्वाद तुझ्या पाठिशी आहेतच, तु फक्त मेहनत कर, असे स्वत:च्या दु:खातही वंदनाला खंबीरपणे सांगणारी ती माऊली धन्यच आहे. म्हणूनच वंदनासारखे खेळाडू घडतात आणि त्यांच्या रूपाने इतिहास घडतो. वडिलांचे अंतिमदर्शन होऊ शकले नाही, ही खंत तर मनात आहेच. पण हा इतिहास म्हणजेच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली, अशा भावनाही वंदना व्यक्त करतेय.