डॉ. राजेंद्र बर्वे
जीवन म्हणजे काय? - आपण आपल्या यशाचं आणि सुखा-समाधानाचं नियोजन करीत असताना, आपल्याच नकळत जे उलगडत असतं, त्याला जीवन ऐसे नाव! टोकियोकडे झेपावणारी अमेरिकन जिम्नॅस्ट सिमॉन बाइल्सच्या डोळ्यासमोर कदाचित ती चकाकणारी सुवर्णपदकं चमकत असतील. टाळ्यांचा आभासी कडकडाट, साथीदार खेळाडूंचे आणि प्रतिस्पर्ध्यांचे उत्फुल्ल चेहरे दिसत असतील. पण खचितच एखाद्या क्षणी तिचं कोवळं मन बावरलं असेल.
यावर्षी ऑलिम्पिकच्या रिंगणात खेळाडू उतरत होते, तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके फक्त उत्सुकतेनं वाढलेले नव्हते, त्यांच्या मनात चिंतेच्या काळ्या ढगांमधला गडगडाट होता. अशाच एका क्षणी सिमॉननं ( simone biles) ‘तो’ निर्णय घेतला आणि तिच्या मनातलं कभिन्न सावट हटलं असेल. ऑलिम्पिकमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करताना ती म्हणाली, ‘मी पदकं, अत्युच्च मानसन्मान, गौरवाची झगझगीत वलयं, या सर्वांपेक्षा माझ्या मनाच्या स्वास्थ्याला जपण्याचा निर्णय घेते आहे. मी या रिंगणातून निवृत्त होते आहे ’ - सगळं जग सध्या तिची चर्चा करतं आहे.
सिमॉन (simone biles) ही केवळ प्रतिनिधी आहे. खेळ, क्रीडा स्पर्धा, त्यातले संघर्ष, अत्युत्तम कामगिरीची जीवघेणी धडपड या सर्वांचं जे विदारक दर्शन घडतं आहे, त्या जगातल्या ठसठसत्या वेदनेची प्रतिनिधी!
कोणे एकेकाळी, राज्या राज्यातल्या लढाया टाळण्यासाठी हे खेळ सुरू केले. खिलाडू वृत्ती, उत्कृष्टतेचा ध्यास आणि कठोर मेहनतीचे धडे गिरवण्यासाठी ही स्पर्धा घडवून आणली जाते. पण शेकडो वर्षांनी त्या उच्च मूल्यांचा गळा स्पर्धेनं, ईर्षेनं, अतीव महत्त्वाकांक्षेनं, जीवघेण्या राष्ट्रप्रेमानं घोटला.
इतका तणाव का असतो?
तणाव म्हणजे मोटिव्हेशनच्या (ध्येय गाठण्याची सहज प्रवृत्ती) पलीकडली मानसिक अवस्था. जितकी ध्येयासक्ती प्रखर तितकी कामगिरी उत्तम असा आलेख वाढत जातो; पण तो गगनाला भिडत नाही. प्रत्येक ध्येयप्रेरणेबरोबर आपला मेंदू चेतना निर्माण करणारी संप्रेरकं रक्तात सोडतो. स्नायू सळसळतात, नजर तीक्ष्ण होते, एकाग्रता सूक्ष्मतम बिंदूवर स्थिरावते, ही सारी या संप्रेरकांची किमया. (याच संप्रेरकांचा कृत्रिम वापर म्हणजे डोप टेस्ट) परंतु, या संप्रेरकांना मर्यादा आहे आणि असणारच. संप्रेरकांच्या अतीव स्त्रावामुळे शारीरिक थकवा, मनाचा संभ्रम आणि आत्मविश्वासाचा र्हास होतो. आपल्या नकळत आपण होरपळतो, यालाच ‘बर्न आउट’ म्हणतात. तो क्षण अतिघातक कारण यातूनच आत्मघातकी विचार सुरू होतात. मनाचं खच्चीकरण आणि आत्मनाशाची भावना बळावते.
सर्वसामान्य माणसांना विशेषकरून सातत्याने संघर्षमय जीवन जगणार्या, पदोपदी महत्त्वाचे आणि जबाबदारीचे निर्णय घेणार्या लोकांवर बर्न आउटची पाळी येऊ शकते. सीमेवर लढणार्या सैनिकांचा शक्तिनाश, एअर ट्रॅफिक नियंत्रक (एटीसी), ड्यूटीला जुंपलेले पोलीस, सर्जन आणि विशेषकरून मानसोपचारक यांवर हा प्रसंग उद्भवतो. यंदाचं ऑलिम्पिक विशेष तणावपूर्ण आहे. वेळापत्रकातील अनिश्चितता, प्रेक्षकांचा अभाव आणि सर्वांच्या वाढलेल्या अपेक्षा यांचा अतीव ताण हे खेळाडू वर्षभर सहन करीत आहेत. मेंदूतल्या संप्रेरकांचे झरे आटत असतानाच रिंगणात उतरण्याची वेळ आली. उंटाच्या पाठीवरच्या ओझ्यात फक्त एका काडीची भर पडली आणि सिमॉनच्या बरोबरचे अनेक भारतीय खेळाडूही खेळण्यापूर्वीच मनातनं हरले, त्यांनी कदाचित त्या तणावापुढेच हात टेकले.
पण एक खरं, सिमॉनने खर्या अर्थानं सुवर्णपदकाच्या पलीकडचं यशाचं पदक मिळवलं आहे! खेळापेक्षा जीवन मोठं, यशापेक्षा सुखशांती मोलाची मानली आहे!
आता सिमॉनच्या या विशेष निर्णयाचे अनेक अर्थ लावले जातील, त्याची चर्चा आणि चर्वितचर्वण होईल.
क्रीडा क्षेत्राला हा सर्वसामान्य अनुभव होत आहे का? प्रसिद्ध क्षेत्राला लागलेली मानसिक उदासीनतेचा ज्वर पसरतोय? ही वस्तुस्थिती त्या क्षेत्रातल्या काहींनी स्वीकारलेली दिसते आहे, हे मोठं सुलक्षण म्हटलं पाहिजे.
पुन्हा मज्जामानसशास्त्राकडे वळू. सोबत दिलेला आलेख पाहा.
प्रत्येकाने आपला मोटिव्हेशन आणि कामगिरीचा हा आलेख तपासला पाहिजे. उत्तम मोटिव्हेशन आणि सर्वोच्च कामगिरी (ऑप्टीमम) याचा आलेख तुम्हाला आडव्या रेषेत दिसेल. ही आडवी रेघ फार मोलाची. आपलं धैर्य, चिकाटी, कुटुंबीयांनी दिलेलं निरपेक्ष सहृय प्रोत्साहन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर आपण मानसिकरीत्या स्थिर राहतो. उत्तेजित संप्रेरकांना नियंत्रित ठेवतो... मग तो क्षण येतो जेव्हा या साऱ्याचा विरस पडतो आणि संप्रेरकांचं कारंजे थुईथुई नाचत आणि आपल्या नकळत खेळाडू त्याच्या पूर्वीच्या कामगिरीपेक्षा नकळतपणे अचानक अद्वितीय कामगिरी दाखवतो. यालाच ‘पीक परफॉर्मन्स’ म्हणतात.
यशस्वीतेचा उच्चांक गाठण्याकरता एकाग्रता, धीर आणि चिकाटीचं शिखर गाठलं जातं.
मोठं धीराचं काम आहे मनाचं स्वास्थ्य जपणं!
यशस्वी माघार घेणारा माणूस पराभूत नव्हे तर धीट असतो. धोरणी असतो. स्वत:ला जपून ठेवतो. आत्मशक्तीचा आदर करतो.
सिमॉनच्या या निर्णयाने आपल्याला धडा शिकायचा आहे. अखेर क्रीडा हा खेळ आहे. खेळाडू म्हणजे यशाचा प्रोग्रॅम केलेले रोबो नव्हेत. माणसंच आहेत. त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं लादायचं नसतं. अंतर्मुख होऊ आणि सिमाॅनला शुभेच्छा देऊ!
(लेखक ख्यातनाम मानसरोग तज्ज्ञ आहेत.)