Join us  

सहा वर्षापूर्वी हातात रायफल धरण्याची ताकद नव्हती, तिने पॅरालिम्पिक मेडल जिंकण्याची किमया केली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 3:53 PM

Tokyo Paralympics 2020: ‘आपण जे करतो त्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन आपल्यातले 100 टक्के दिले तर यश मिळतंच’ यावर विश्वास असलेल्या जयपूरच्या अवनी लेखाराच्या टोकियो पॅरालिम्पिकमधल्या सुवर्ण यशामागच्या जीवतोड मेहनतीची गोष्ट 

ठळक मुद्देअवघ्या सहा वर्षापूर्वी अवनीनं हातात रायफल धरली आणि पुढच्या दोन अडीच वर्षात जागतिक स्पर्धेत रजत पदक मिळवलं.अवनीनं ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या अभिनव बिंद्राच्या जीवनकथेचं पुस्तक वाचलं आणि तिनं मनातली निराशा झटकून टाकली.अंतिम फेरीत सर्व राउण्डमधे उत्तम कामगिरी करणार्‍या अवनीनं 249.06 पॉइण्ट्स मिळवत आणि जागतिक विक्रमाशी बरोबरी करत सुवर्ण पदक मिळवलं.छायाचित्रं- गुगल

- माधुरी पेठकर 

Tokyo Paralympics 2020: ‘डब्बू ने तो कमाल कर दिया’ ही प्रतिक्रिया आहे अवनी लेखारा हिच्या आईची. टोकियो पॅरालिम्पिकमधे 10 मीटर एयर रायफल एसएच1 प्रकारात 19 वर्षीय अवनीनं सुवर्णपदक मिळवलं आणि अवनीच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. जिंकल्यानंतर आपल्या विजयाबद्दलच्या भावना कशा व्यक्त करायच्या यासाठी अवनीला पटकन शब्द सापडत नव्हते. पण विजयाच्या आनंदाची लाट स्थिरावल्यावर भारताच्या पराक्रमात आपल्या या सुवर्णपदकानं भर घालता आली याचा अभिनान वाटत असल्याची भावना अवनीनं व्यक्त केली. पण अजून तर खूप पदकं मिळवायची आहे हा इरादाही तिनं जिंकल्यानंतर लगेचच व्यक्त केला.

  ‘आपण जे करतो त्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन आपल्यातले 100 टक्के दिले तर यश मिळतंच’ यावर अवनीचा विश्वास आहे. तर अवनीचे आई बाबा म्हणतात की, ‘मुलांवर विश्वास ठेवला तर ते जगातलं कोणतंही अवघड लक्ष सहज गाठू शकतात.’ टोकियो पॅरालिम्पिकमधे अवनीनं सुवर्णपदक जिंकून स्वत:च्या आत्मविश्वासाच्या बळावर स्वत:ला सिध्द केलं तर अवनीच्या आई बाबांना आपण अवनीवर टाकलेल्या विश्वासाचं सार्थक झाल्याचं वाटलं. अवनीच्या या कामगिरीवर तिचे प्रशिक्षक चंदन सिंह यांनाही अतीव अभिमान वाटतो. अवघ्या सहा वर्षापूर्वी अवनीनं हातात रायफल धरली आणि पुढच्या दोन अडीच वर्षात जागतिक स्पर्धेत रजत पदक मिळवणरी अवनी ही त्यांना सुरुवातीपासूनच कमाल वाटते. ही मुलगी पुढच्या पॅरालिम्पिकसाठी नक्की पात्र ठरणार आणि कतृत्त्व गाजवणार असा विश्वास चंदन सिंह यांनाही होता.

छायाचित्र- गुगल

2014 मधे व्हील चेअरवर असलेल्या अवनीनं जयपूरच्या शूटींग रेंजवर पहिल्यांदा रायफल हातात धरली तेव्हा ती पेलवण्या इतकी ताकदही तिच्यात नव्हती. पण तिच्यात हिंमत होती आणि जिद्द होती. नैराश्याच्या अवस्थेतून बाहेर पडत तिनं ही हिंमत कमावली होती. तिच्यात ही जिंकण्याची, करुन दाखवण्याची जिद्द निर्माण करण्यात अवनीच्या आई बाबांनी तिला पावलोपावली साथ दिली.2012 मधे अवनी 12 वर्षाची होती. अवनीचे बाबा धौलपूर येथे कामास होते. त्यादरम्यान एका रस्ते अपघातात वडील आणि अवनी दोघेही जबर जखमी झाले. वडील काही दिवसात बरे झाले पण अवनी अपघातानंतर तीन महिने दवाखान्यात होती. पण तिच्या पाठीच्या मणक्याला झालेली दुखापत मात्र उपचारांनी बरी होवू शकली नाही. त्यानंतर अवनीला उभं राहाता येणं , स्वत:च्या पायावर चालणं अशक्य झालं. ती व्हीलचेअरला खिळली. या अपघातानंतर ती इतकी अशक्त झाली की तिला छोटीशी वस्तूही हातात धरता येत नव्हती. अवनी जशी शरीरानं खचली त्याच्या दुप्पट ती मनानं खचली. नैराश्यात गेली. स्वत:च्या खोलीच्या बाहेर पडणंही तिला नकोसं होत होतं. ती न बोलती झाली. अभ्यासात कायम अव्वल असणारी अवनी अशी खचलेली बघून आई वडील तळमळू लागले. अवनीला यातून बाहेर काढण्यासाठी उपचार तर सुरुच होते पण त्यापेक्षा आणखी काही केलं पाहिजे ही गरज अवनीच्या वडिलांना वाटली. एखादा खेळ अवनीला नैराश्यातून बाहेर काढू शकेल असं तिच्या वडिलांना वाटलं आणि त्यांनी अवनीला शुटिंग शिकण्याचा आग्रह केला. तिच्या मनाला उमेद यावी यासाठी तिच्या हातात ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या अभिनव बिंद्राच्या जीवनकथेचं पुस्तक ठेवलं. अभिनवनं केलेला संघर्ष अवनीच्या निराश मनाला चेतवून गेला.

सुरुवातीला तर जयपूर इथल्या शुटिंग रेंजवर अवनी सहज म्हणून वडिलांच्या सोबत जायची. हळूहळू तिला नेमबाजीत रुची निर्माण झाली. पण पहिल्यांदा हातात रायफल घेतल्यावर तिला ती साधी पेलवलीही गेली नाही. पण तिनं जिद्द सोडली नाही. रायफल उचलण्याच्या ताकदीपासून नेमबाजीच्या तंत्रापर्यंत प्रत्येक गोष्ट जमण्यासाठी तिने जीव ओतला. प्रॅक्टिस करता करता ती थकून जायची पण पहिल्यांदा हातात रायफल घेतलेल्या अवनीनं आता थांबायचं नाही, सिध्द करायचं स्वत:ला हे ठरवून टाकलं होतं. आज त्याच जिद्दीच्या बळावर अवनी लेखरा हिनं टोकियो पॅरालिम्पिकमधे सुवर्णपदक मिळवलं आणि तिथल्या व्यासपीठावर भारताचं राष्ट्रगीत वाजलं. अवनी पॅरालिम्पिकमधे सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली.

छायाचित्र- गुगल

2015 मध्ये हातात पहिल्यांदा रायफल धरणार्‍या अवनीनं पुढच्या दोन वर्षांपासूनच पदकं मिळवण्यास सुरुवात केली. 2017 जागतिक स्पर्धेत रजत पदक पटकावलं. त्यानंतर तिनं कधीही मागे वळून बघितलं नाही. 2017 ते 2019 या दोन वर्षात जागतिक स्तरावरच्या अनेक स्पर्धेत अवनीनं पदक मिळवलंच.

अवनीचं ध्येय पॅरालिम्पिकमधे सुर्वण मिळवायचं होतं. यासाठीची तिची तयारीही जोरदार सुरु होती. पण 2019 मधे कोरोना आला आणि तिच्या नेमबाजीच्या सरावावर परिणाम झाला. पण अवनीचा सराव अखंड चालू राहावा यासाठी तिच्या वडिलांनी घरातच टारगेट बोर्ड उपलब्ध करुन दिला. अवनी घरातल्या घरात पेलेटस आणि दारुगोळ्याशिवय सराव करत होती. या सरावातून तिचे हाताचे आणि पोटाचे स्नायू मजबूत झाले. पण कोरोनामुळे अवनीच्या फिजिओथेरेपीवर मात्र परिणाम झाला.अपघातानंतर अवनीच्या कमरेखालच्या शरीरातली संवेदनाच गेली होती.त्यासाठी तिला रोज व्यायामाची आणि फिजिओथेरेपीची गरज होती. फिजिओथेरेपिस्ट जयपूरवरुन अवनीच्या घरी यायची. तिचा व्यायाम करुन घेणं, पायांचं स्ट्रेचिंग करुन घेणं हे नियमित व्हायचं. पण कोरोना निर्बंध काळात एवढ्या लांबून फिजिओथेरिपिस्टला अवनीकडे येणं शक्य नव्हतं. पण अवनीला फिजिओथेरेपीची मात्र गरज होती. शेवटी अवनीच्या आई बाबांनी तिच्याकडून व्यायाम करुन घ्यायला सुरुवात केली. या सर्व प्रयत्नांमुळेच अवनी टोकियो पॅरालिम्पिकमधे आत्मविश्वासानं आणि ताकदीनं खेळू शकली.

छायाचित्र- गुगल

पात्रता फेरीत अवनी 7 व्या स्थानावर होती. तेव्हा अवनीचा एकूण स्कोअर 621.7 पॉइण्ट होता. सुरुवातीला पिछाडीवा पडलेल्या अवनीनं खेळात कमबॅक करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत पॉइण्टसपेक्षाही चांगलं खेळणं, पूर्ण लक्ष केंद्रित करुन प्रयत्न करणं एवढंच अवनीसाठी महत्त्वाचं होतं. अवनीचा प्रत्येक राउण्डला स्कोअर 10 पॉइंटसच्या पुढेच होता. तिचे फक्त दोन शॉटस 10 पेक्षा कमी पॉइंटचे होते. सर्व राउण्डमधे उत्तम कामगिरी करणार्‍या अवनीनं 249.06 पॉइण्ट्स मिळवत आणि जागतिक विक्रमाशी बरोबरी करत सुवर्ण पदक मिळवलं.

अवनी म्हणते की, 'आयुष्य म्हणजे हातात चांगले कार्ड असणं नव्हे ते खेळता येणं महत्त्वाचं.' यासाठी अवनीचा जीवतोड मेहनतीवर आणि प्रयत्नातील सातत्यावर विश्वास आहे. जो मंत्र तिने स्वत:च्या यशासाठी वापरला तोच ती इतरांनाही यशस्वी होण्यासाठी सांगते.