Lokmat Sakhi >Inspirational > आदिवासी शेतमजुराची लेक जेव्हा आयआयटीत पोहोचते! फी भरायला पैसे नव्हते पण तिने जिद्द सोडली नाही..

आदिवासी शेतमजुराची लेक जेव्हा आयआयटीत पोहोचते! फी भरायला पैसे नव्हते पण तिने जिद्द सोडली नाही..

आयआयटी जोधपूर येथे शिकणाऱ्या त्र्यबंकेश्वरजवळच्या गावातल्या फशाबाई लचके या आदिवासी तरुणीच्या संघर्ष आणि निग्रहाची गोष्ट तिच्याच शब्दात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2024 05:21 PM2024-10-03T17:21:19+5:302024-10-03T17:32:24+5:30

आयआयटी जोधपूर येथे शिकणाऱ्या त्र्यबंकेश्वरजवळच्या गावातल्या फशाबाई लचके या आदिवासी तरुणीच्या संघर्ष आणि निग्रहाची गोष्ट तिच्याच शब्दात!

tribal student, poor farmers daughter secures IIt seat, MSC chemistry, says education is my passion. inspirational story of Fashabai lachake | आदिवासी शेतमजुराची लेक जेव्हा आयआयटीत पोहोचते! फी भरायला पैसे नव्हते पण तिने जिद्द सोडली नाही..

आदिवासी शेतमजुराची लेक जेव्हा आयआयटीत पोहोचते! फी भरायला पैसे नव्हते पण तिने जिद्द सोडली नाही..

Highlightsएक लहानशी मुलगी आपल्या जिद्दीच्या जोरावर आयआयटी जोधपूरमध्ये रसायनशास्त्र शिकायलाही गेली. सोपा कसा असेल तिचा प्रवास.

माधुरी पेठकर

‘जोधपूर आयआयटीतलं वातावरण एकदम वेगळं आहे. एकीकडे मी स्काॅलरशिपसाठी झगडते आहे. तर माझ्या काॅलेजमधल्या इतर मुलामुलींना स्काॅलरशिप हा शब्दही माहिती नसावा इतकी त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. इथली मुलं मुली माझ्यापेक्षा खूप हुशार आहेत. त्यांनी इथे येण्यासाठी वेगवेगळे क्लास लावले होते. माझ्या तुलनेत खूप अभ्यास करुन आलेली मुलं इथे आहेत. पण कोणीही माझ्या परिस्थितीवर किंवा माझ्यावर हसत नाही. फशा तुला हे कसं जमत नाही म्हणून नावंही ठेवत नाही. मी ही न लाजता मला जे अडेल ते त्यांना विचारते. गावातल्या शाळेपासून सुरु झालेला संघर्ष आत्ताही माझ्या आयुष्यात सुरु आहे. पण संघर्ष असला तरी ज्यासाठी मी आयआयटीत आले ते मी पूर्ण करेनच असा मला विश्वास वाटतो. कारण अवघड जातंय म्हणून मधेच सोडून देणं हा फशाचा स्वभाव नाही!’

आयआयटीमध्ये एमएसएसी करणारी फशाबाई देवराम लचके सांगत असते आपला आयआयटीपर्यंतचा प्रवास आणि आपण शब्दश: थक्क होऊन या मुलीच्या कमालीच्या जिद्दीचे केवळ कौतुकच करतो. शिक्षणाचा ध्यास घेतलेली ही मुलगी नाशिक जिल्हयातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या र्दुगम भागातली. आईवडील आदिवासी शेतमजूर. ही लेक अभ्यासात हुशार, तिनं शिकावं म्हणून ते ही तिच्या पाठीशी उभे राहिले. आणि एक लहानशी मुलगी आपल्या जिद्दीच्या जोरावर आयआयटी जोधपूरमध्ये रसायनशास्त्र शिकायलाही गेली.
सोपा कसा असेल तिचा प्रवास.
तिच्याशी गप्पा मारल्या तर तीच सांगते..

फशा तुला हे करावंच लागेल!

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबई हे माझं छोटंसं गाव. माझ्या गावात दहावीपर्यंत शिकण्याचीही सोयही नाही. चौथीपर्यंतच शाळा होती, आता गावातल्या शाळेत एक वर्ग वाढला आहे. गावातली मुलं आता पाचवीपर्यंत गावात शिकतात. मीच नाही तर गावातल्या सर्व मुलांना सहावीपासून शिक्षण घेण्यासाठी पुढे एक दीड किलोमीटरवरील आंबोली गावात जावं लागतं. आंबोलीमध्ये सातवीपर्यंतची शाळा. आणि त्याच्यापुढे तीन वर्ग आंबोली आणि आंबई या दोन गावांच्या मध्यभागी काॅम्रेड नाना मालुसरे ही शाळा आहे. आमच्या गावातल्या सर्व मुलांना पाचवीनंतर दहावीपर्यंतचं शिक्षणासाठी घरापासून रोज एक ते दीड किलोमीटर पायी चालत या शाळेत जावं लागतं. दहावीनंतरचं शिक्षण त्र्यंबकला. अशाच प्रकारे मीही शिकले. मी दहावीपर्यंत काॅम्रेड नाना मालुसरे या शाळेत शिकले आणि पुढचं शिक्षण अभिनव काॅलेजमध्ये केलं.

घरची परिस्थिती बेताचीच. आम्ही पाच बहिणी. मी चार नंबरची मुलगी. मोठ्या दोन बहिणींचं लग्न झालं. आम्ही तिघी मात्र शिकत होतो. पण शेतीच्या छोट्याशा तुकड्यावर रोजचा जगण्याचा खर्च आणि आम्हा तिघींच्या शिक्षणाचा खर्च वडिलांना झेपत नव्हता. परिस्थितीमुळे तीन नंबरच्या बहिणीने दहावीनंतर शिक्षण सोडले. पण मला मात्र शिकायचं होतं आणि घरच्यांनाही मला शिकवायचंच होतं. लहानपणापासून मला अभ्यास, शाळा आवडायची. शाळेतले शिक्षकही आई बाबांना भेटून ' मुलगी हुशार आहे तिला शिकू द्या' म्हणायचे. पण शिक्षण घेताना अनेकदा परिस्थिती अशी आली की शिक्षण सुटेल की काय अशी भीती वाटायची. पण माझी शिक्षणाची आवड बघून आई वडिलांनाही माझं शिक्षण पूर्ण व्हावं असं वाटू लागलं. आई वडिलांना माझ्याकडून आशा वाटू लागली. मीही कसंही करुन शिकायचंच या जिद्दीला पेटले.
दहावीत शाळेत पहिली आले. खूप कौतुक झालं माझं. दहावी झाल्यानंतर विज्ञान शाखा निवडली. मला तर त्या शाखेची विशेष काही माहितीही नव्हती. पण माझे चांगले मार्क्स पाहून शिक्षक, गावातली मोठी माणसं 'तू सायन्सच घे!' असं म्हणू लागली. मी सायन्स घेतलं. अकरावीला त्र्यंबकच्या अभिनव काॅलेजमध्ये ॲडमिशन घेतली. मला लवकरच हाॅस्टेलमध्येही प्रवेश मिळाला. याआधी शिकत असताना शेतात काम करत शिकावं लागायचं. आमच्या शेतावर शेतमजूर म्हणून वडिलांनी कोणाला ठेवलं नव्हतं. आई-वडिल आणि आम्ही तिघी बहिणीच शेतात राबायचो.

हाॅस्टेलला गेल्यावर मात्र जेव्हा सुट्यांमध्ये घरी यायचे तेव्हाच शेतावर कामाला जावं लागायचं. शेतात काम करुन अभ्यास करणं माझ्या कधीही जिवावर आलं नाही. उलट या शेतातल्या कामाने मला अभ्यासाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला. कष्ट केले, प्रयत्न केले तर अवघड कामही सोपं होतं हे शेतातल्या कामानेच शिकवले मला. मला जेव्हा जेव्हा अभ्यासात काही अवघड वाटायचं तेव्हा माझ्या मनात यायचं की, 'आपण उन्हातान्हात किती राबलो. ते राबणं तर किती अवघड होतं फशा. मग तुला इथे सावलीत बसून तर हा टाॅपिक समजून घ्यायचा आहे. थोडे कष्ट केले की समजलेच तुला !' माझं मन असं मला सांगायला लागलं की मी अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायचे.

अकरावीला विज्ञान शाखेत गेले तेव्हा तर मला तिथे काहीच उमगत नव्हतं. इंग्रजीही अगदीच जेमतेम होतं. कधी घर सोडून मी कुठे एकटीने राहिले नव्हते. वर्गात गेलं की मला बावरल्यासारखं व्हायचं. सुरुवातीला तर कार्बनचं स्पेलिंग लिहिताना मी 'के'ने सुरुवात केली होती. मी घाबरुन गेले होते. माझी परिस्थिती कोणाला सांगूही शकत नव्हते. 'फशा तुला हे झेपल का?' असा प्रश्न मीच मला विचारायचे.. 'फशा असं कसं करुन चालेल तुला?' असं माझं मन म्हणायचं. हळूहळू माझी भीड चेपली, बावरलेपण कमी झालं. इथपर्यंत आले तर मी पुढेही करु शकते असा विश्वास माझ्यात निर्माण झाला आणि मी त्याच विश्वासाच्या बळावर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

आयआयटीत प्रवेश मिळाला पण..

मी टीवायला होते तेव्हा शिक्षकांनी आयआयटीचे फाॅर्म सुटले तुम्ही भरा असं सांगितलं. मला तर आयआयटी म्हणजे काय ते देखील माहिती नव्हतं. पण आमचे शिक्षक इतके चांगली की त्यांनी आम्हा सर्व मुलींना खूप जीव लावला. आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांनीच माझा आयआयटीचा फाॅर्म भरला. आमच्या काॅलेजमधून तिघीजणींनी आयआयटीचा फाॅर्म भरला होता. त्यात माझा नंबर लागला. लोकं माझं कौतुक करु लागले. पण आयआयटीत नंबर लागला हे ठीक पण तिथे जावून मी शिक्षण पूर्ण करु शकेन की नाही? अशी भीती माझ्या मनात होती. कारण तेवढी आर्थिक ऐपतच नव्हती माझी. पण आता मी जोधपूरच्या आयआयटीत शिकते आहे. इथे जोधपुरला आले तेव्हा इथलं वातावरण आजवर मी अनुभवलेल्या जगापेक्षा अतिशय वेगळं आहे. सगळेजण हिंदी आणि इंग्रजीच बोलतात. पहिले आठ पंधरा दिवसातच मला इथे करमेनासं झालं. कधी एकदाची घरी जाते असं झालं. मी घरी आले. पण काही दिवसातच पुन्हा काॅलेजला आले. कारण माझ्यापुढे काही पर्यायच नव्हता. इथे एका सेमिस्टरची फी ७० हजार रुपये आहे. ती माझ्या त्र्यंबकच्या काॅलेजातल्या शिक्षकांनी भरली. आईवडिलही 'फशा तू इकडची चिंता करु नको, तू फक्त शिक, आम्ही काहीही करुन पैसे उभे करतो असं म्हणत उमेद देत आहे. त्यामुळे इथल्या वातावरणाशी, परिस्थितीशी जुळवून घेत शिकत राहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये.

एमएससी झाल्यावर मला केमिकल इंजिनिअरिंगमध्ये एमटेक करायचं आहे. पण हे सर्व करण्यासाठी माझ्याकडे, माझ्या आईबाबांकडेपैसे नाही. त्यामुळे एमएससी झाल्यावर आधी नोकरी करण्याचं ध्येय आहे. आत्ता केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून मागे फिरणं हे अशक्य आहे. त्यामुळे मीही आत्ता मन लावून अभ्यास करते आहे.


 

Web Title: tribal student, poor farmers daughter secures IIt seat, MSC chemistry, says education is my passion. inspirational story of Fashabai lachake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.