साडी हे भारतीय महिलांचे मुख्य आणि सर्वात पारंपरिक वस्त्र मानले जाते. साडी जरी दिसायला सुंदर दिसत असली तरी ती नेसणं अनेकींना महान कठीण काम वाटत. अनेकींना साडी नेसणं हेच अवघड काम वाटत असेल तर ती घालून मॅरेथॉन धावणं म्हणजे अशक्य असच वाटेल. ब्रिटनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या मॅरेथॉन शर्यतीत चक्क साडी नेसून धावणाऱ्या त्या महिलेची सध्या सर्वत्र मोठी चर्चा सुरु आहे.
मँचेस्टर येथे नुकत्याच पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ओडिशाच्या मधुस्मिता जेना दास (Madhusmita Jena-Das) हिने आपल्या आगळ्यावेगळ्या वेशभूषेने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. मँचेस्टरमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या ४१ वर्षीय मधुस्मिता हिने भारतीय पारंपारिक हातमागावर विणलेली लालसर केशरी रंगातील संबळपूरी साडी परिधान करून ४२.५ किमी अंतराची शर्यत ४ तास ५० मिनिटांत पूर्ण केल्याने सोशल मीडियावर तिचे कौतुक केले जात आहे.
नेमकं घडलं काय ?
‘फ्रेंड्स ऑफ इंडिया इन्टे डॉटयूके’ च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलने मधुस्मिताच्या धावण्याचा व्हिडियो पोस्ट केला आहे. त्या व्हिडियोमध्ये ती साडी नेसूनही अतिशय सहजपणे मॅरेथॉन धावण्याचा आनंद घेत असताना आणि तिच्यासोबतचे अन्य स्पर्धक तिचा उत्साह वाढवताना दिसत आहेत. ४२.५ किमीचे आव्हान पारंपारिक वेशभूषेतही सहजपणे पूर्ण करता येते, हा आत्मविश्वास मधुस्मिताने सगळ्या जगाला दाखवून दिला असल्याचेही या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. भारतीय संस्कृतीचा वारसा असा अभिमानाने तिने अशाप्रकारे प्रदर्शित केल्याने भारतीय कपड्यांकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा तिचा दृष्टिकोन नक्कीच अतिशय अभिमानास्पद आहे असंही ट्विटमधे म्हटलं आहे.
काय सांगता, साडी नेसवून देणं हे आता घसघशीत पैसे मिळवून देणारं करिअर होऊ शकतं!
नेटकऱ्यांनी तिच्यावर लाईक्स आणि शुभेच्छांचा केला वर्षाव...
तिच्या ह्या कामगिरीची दखल अनेक ट्विटरयुजर्सनी घेतली असून भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे असे सुंदर प्रदर्शन केल्याबद्दल तिचे भरभरून कौतुकही केले आहे. ४२.५ किमी अंतराची ही स्पर्धा तशीही एवढ्या कमी अवधीत पूर्ण करणं हेच आव्हान असताना मधुस्मिताने साडी नेसून ती पूर्ण करणं हे अधिक आश्चर्यकारक आणि आव्हानात्मक असल्याचं बऱ्याच नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. काही युजर्सनी मॅरेथॉनसारख्या स्पर्धेमध्ये असे पाऊल उचलणे हेच अभिनंदनीय असल्याचं म्हटलं आहे. काही युजर्सनी तिच्या या धाडसीपणाला सलाम केला आहे. काहींनी हा अभिमानाचा क्षण असल्याचंही लिहिलं आहे. मॅरेथॉनमधील तिच्या फोटोवर एका युजरने असं म्हटलं आहे की, खरंच इतका सुंदर फोटो पाहण्यासारखा आहे. विदेशी किंवा वेस्टर्न कपड्यांना जास्त पसंती देणाऱ्यांनी आपली संस्कृती जगाला कशी दाखवायची, हे मधुस्मिताकडून शिकलं पाहिजे. एका ट्विटर युजरने स्पर्धेतील तिचा फोटो शेअर करत त्याखाली म्हटले आहे की, फोटोमधून तिचा पारंपारिक पेहरावात स्पर्धेत सहभागी होण्यामागचा दृढनिश्चय आणि आत्मविश्वास झळकतो. मँचेस्टर मॅरेथॉन य ब्रिटनमधील सर्वात महत्त्वाच्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धेत वैभवशाली वारसा लाभलेल्या भारताच्या पारंपारिक पेहराव परिधान करून सहभागी होताना तिने कोणतेही दडपण घेतले नाही किंवा त्यामुळे स्वतःचे लक्ष विचलित होऊन दिले नाही, याबद्दलही काही युजर्सनी तिचे विशेष कौतुक केले आहे.
तिने नेसलेल्या संबळपूरी साडी विषयी...
संबळपुरी साडी मूळची ओडिसाची आहे. चार मीटर ते नऊ मीटरपर्यंत मिळणारं हे कापड ओडिसातील महिला विविध प्रकारांनी नेसतात. संबळपुरी साडी पाचवारी पध्दतीने नेसली जाते. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींमुळे या साडीला खरी ओळख मिळाली आणि तेव्हापासून राजकारणातील स्त्रिया व राजकारण्यांच्या परिवारातील स्त्रियांच्या कपाटात या साडीला विशेष स्थान मिळाले. संबळपुरी साडी ही ओडिसातील मुख्यत: सोनेपुर, संबळपुर, बालंगीर या ठिकाणी विणली जाते. हातमागावर विणलेल्या या साडीची खासियत आहे “बांधकला”. यामध्ये धागे रंगाच्या पाण्यात ठेवले जातात. नंतर या रंगीत धाग्यांनी कापड विणले जाते. या विणकामाची खासियत म्हणजे विणल्यानंतर कापड दोन्ही बाजूंनी सारखेच दिसते. संबळपुरी साडीवर अजूनही पारंपारिक नक्षीकाम केले जाते. यामध्ये शंख, चक्र, फुले इत्यादींची नक्षी असते. हे विणकाम अतिशय सुबकतेने केलेले असते. विणकामाचे ठिकाण आणि नक्षीकाम यावरून साडीचे विविध प्रकार पडतात. धागे रंगवून मग विणण्याच्या या पध्दतीमुळे संबळपुरी साडीचा रंग खूप वर्षे टिकून राह्तो. या साडीची किंमत पाचशे ते सहाशे रुपयांपासून सुरू होऊन काही हजार आणि अगदी लाखांपर्यतही जाते. कॉट्न व सिल्क धाग्यांच्या गुणवत्तेनुसार आणि नक्षीकामानुसार साडीची किंमत ठरवली जाते.