सैन्य आणि मॉडेलिंग क्षेत्राचा दूर दूर पर्यंत संबंध नसतो. असं असूनही युक्रेन आणि रशियाच्या युद्ध सुरू असताना एका सुंदर तरूणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. माजी मिस युक्रेन अनास्तासिया लेना (Anastasiia Lenna)) रशियाविरुद्धच्या युद्धासाठी स्वत: मैदानात उतरली आहे. मिस युक्रेन राहिलेल्या अनास्तासिया लीनाने रशिया-युक्रेन युद्धात देशाचे रक्षण करण्यासाठी युद्धात शस्त्र उचलले आहे. मिस युक्रेन अनास्तासिया लेना नक्की कोण आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.
कोण आहे अनास्तासिया लीना
अनास्तासिया लीनाने 2015 मध्ये मिस युक्रेनचा खिताब जिंकला होता. सध्या देशावर संकटाच्या वेळी हातात बंदूक घेतलेले अनास्तासिया लीनाचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तिची देशाबद्दलची तळमळ स्पष्टपणे दिसून येते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या सामान्य जनतेला युद्धात सामील होण्याचे आवाहन केले आहे, त्यानंतर सर्व नागरिक आपापल्या देशाच्या हितासाठी रणांगणात उतरले आहेत.
अनास्तासिया लीना हिने वयाच्या 24 व्या वर्षी 2015 मध्ये मिस युक्रेनचा किताब पटकावला होता आणि आज पुन्हा एकदा ती आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि डोक्यावर मुकुटाऐवजी हातात बंदूक धरत आहे. अनास्तासिया लीनाने तिच्या इंस्टाग्रामवर सांगितले की कीवचे विटाली क्लिट्स्को यांच्या भाषणानंतर ती देखील सैन्यात सामील झाली.
डेली मेलशी बोलताना तिनं सांगितलं की, ''अनेक लोक देशासाठी लढायला तयार आहेत, ते माझ्याकडे शस्त्र मागतात. अनेक लोकांची लष्करी पार्श्वभूमी आहे, म्हणून आम्ही नागरी संरक्षण तयार केले आहे. आपल्या देशाचा अभिमान असणारा प्रत्येक स्त्री-पुरुष शस्त्र उचलू शकतो.'' अनास्तासियाने रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि आपल्या देशाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला.
जो कोणी आपल्या देशावर हल्ला करण्याच्या उद्देशाने युक्रेनची सीमा ओलांडेल त्याला ठार केले जाईल. या कॅप्शनसह "#standwithukraine; #handsoffukraine" या हॅशटॅगसह हातात बंदूक धरलेले फोटो तिने शेअर केले आहेत. तिने देशाचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे छायाचित्र तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केले आणि त्यांना देशाचे खरे आणि सामर्थ्यवान नेता म्हटले.