Join us  

Ukraine Russia War : युक्रेनमध्ये अडकलेल्या ८०० भारतीयांना सुखरुप मायदेशी आणणारी भारतीय पायलट, महाश्वेता चक्रवर्ती , भेटा तिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 11:37 AM

Ukraine Russia War : महाश्वेता हिने धीराने आपले काम करत पोलंडमधून ४ वेळा आणि हंगेरी येथून २ वेळा अशी एकूण ६ उड्डाणे तिने २७ फेब्रुवारी ते ७ मार्च या दरम्यान केली आहेत.

ठळक मुद्देपोलंडमधून ४ वेळा आणि हंगेरी येथून २ वेळा अशी एकूण ६ उड्डाणे तिने २७ फेब्रुवारी ते ७ मार्च या दरम्यान केली आहेत.

रशिया आणि युक्रेन (Ukraine Russia War) येथे गेल्या काही दिवसांपासून असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आपल्या सगळ्यांनाच अंदाज आहे. युक्रेनमधील नागरिकांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेता देशातील सामान्य जनतेचे यामध्ये हाकनाक बळी जात आहेत. इतकेच नाही तर युक्रेनमध्ये शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गेलेल्या परदेशी नागरीकांच्याही जीवालाही या परिस्थितीत धोका आहे. यामध्ये भारतीय विद्यार्थी आणि नागरीकांची संख्याही मोठी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेनमधील भारतीय नागरीकांना सुखरुप मायदेशात आणण्यासाठी सर्वच स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. युद्धजन्य परिस्थितीत भारतीयांच्या जीवाला धोका उद्भवू नये त्यासाठी भारतीय सैन्यदल, केंद्रिय यंत्रणा प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत हजारो नागरीकांना सुखरुपपणे मायदेशात आणण्यातही आले आहे. मात्र आता या सगळ्यात आणखी एका महिलेच्या नावाची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे भारतीय पायलट महाश्वेता (Pilot Mahashweta Chakraborty). 

(Image : Google)

महाश्वेता चक्रवर्ती असे या जिद्दी पायलटचे नाव असून तिने ८०० भारतीयांना मायदेशात सुखरुप आणल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ही पायलट अवघ्या २४ वर्षांची असल्याने इतक्या लहान वयात तिच्यात असणाऱ्या धाडसाने तिने भारतीयांचे मन जिंकले आहे. ‘ऑपरेशन गंगा’मध्ये (Operation ganga) आपली निवड झाल्याचा रात्री उशीरा फोन आला आणि युद्धग्रस्त देशात फसलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशात आणायचे असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी महाश्वेता हिने धीराने आपले काम करत पोलंडमधून ४ वेळा आणि हंगेरी येथून २ वेळा अशी एकूण ६ उड्डाणे तिने २७ फेब्रुवारी ते ७ मार्च या दरम्यान केली आहेत. या होन्ही सीमांवरुन ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना सुखरुप आपल्या देशात पोहोचवण्यामध्ये महाश्वेता हिचा महत्त्वाचा वाटा आहे. 

(Image : Google)

महाश्वेता हिचे लहानपणापासून पायलट व्हायचे स्वप्न होते आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे स्वप्न पूर्ण केले. तिची आई तनुजा चक्रवर्ती बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाची महिला मोर्चा अध्यक्ष आहे. ‘ऑपरेशन गंगा’मध्ये सहभागी असलेली पायलट महाश्वेता पहिल्यापासून या ऑपरेशनचा महत्त्वाचा भाग आहे. इतकेच नाही तर जगभरात कोरोनाचे थैमान सुरू असताना परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम मिशन’मध्येही तिचा सहभाग होता. अशाप्रकारे युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्याचे काम हा आपल्यासाठी आयुष्यभरासाठीचा अनुभव होता असे महाश्वेता म्हणाली. ‘ऑपरेशन गंगा’च्या अंतर्गत आतापर्यंत जवळपास १८ हजार भारतीयांना मायदेशात सुखरुप आणण्यात आले आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीयुक्रेन आणि रशियारशियायुद्धवैमानिक