Lokmat Sakhi >Inspirational > हर पल यहा जी भर जियो, जो है समा कल हो न हो! हे कॅन्सरनं शिकवलं त्या उमेदीची गोष्ट

हर पल यहा जी भर जियो, जो है समा कल हो न हो! हे कॅन्सरनं शिकवलं त्या उमेदीची गोष्ट

उमेद कॅन्सर पेशंट सपोर्ट ग्रुप : कॅन्सर झाल्यावर व्हाय मी असा प्रश्न कधी पडला नाही पण त्या प्रवासानं खूप शिकवलं, मायेच्या माणसांच्या सोबतीचं बळ लाभलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 05:20 PM2023-09-26T17:20:47+5:302023-09-26T17:23:08+5:30

उमेद कॅन्सर पेशंट सपोर्ट ग्रुप : कॅन्सर झाल्यावर व्हाय मी असा प्रश्न कधी पडला नाही पण त्या प्रवासानं खूप शिकवलं, मायेच्या माणसांच्या सोबतीचं बळ लाभलं!

umed cancer patient support group Nashik initiative - cancer patient share journey of hope with caregiver. | हर पल यहा जी भर जियो, जो है समा कल हो न हो! हे कॅन्सरनं शिकवलं त्या उमेदीची गोष्ट

हर पल यहा जी भर जियो, जो है समा कल हो न हो! हे कॅन्सरनं शिकवलं त्या उमेदीची गोष्ट

Highlightsजवळ बसून बोलणं, वेदना समजून घेणं, आश्वासक स्पर्श करणं हे ही तितकंच महत्वाचं असतं. ते मी पुरेपूर अनुभवलं.

संध्या शिरवाडकर

कॅन्सर हा एक शारीरिक आजार आहे, तसाच तो मनाला पोखरणारा आजार सुद्धा आहे, साक्षात मृत्यूची जाणीव करून देतो. कॅन्सर ज्यांच्यापासून दूर आहे अश्या व्यक्ती तर जाऊ द्या, पण माझ्यासारखे जे या आजारातून आणि उपचार घेऊन बरे झाले आणि एक चांगले आयुष्य जगत आहेत, अश्या व्यक्तीसुद्धा आपल्या अनुभवापासून शक्यतो मनाने दूर जाण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी आठवणींची खपली निघते आणि ते सोसलेले क्षण, शारीरिक वेदना पुनः नव्याने समोर उभ्या ठाकतात.
सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या शारीरिक तक्रारींचे निरसन फॅमिली डॉक्टरांच्या औषधोपचाराने चालू होते. अमोएबिक डीसेन्ट्री चालू होती. सोनोग्राफी झाली होती. किरकोळ मधून मधून पोट दुखायचे. मनात क्वचित कॅन्सरची शंका डोकावायची, पण लक्षण कुठलेच दिसत नव्हते. वजन कमी होत नव्हते, भूक व्यवस्थित लागत होती, थकवा जाणवत नव्हता. नेहेमीचा नियमित व्यायाम सुद्धा सुरू होता.
पण माझे अंतर्मन मात्र स्वस्थ नव्हते. काहीतरी बिनसले असल्याचा बेचैन करणारा इशारा शरीरकडून सतत मिळत होता.

(Image : google)

मग कलोनोस्कोपी करण्याचा निर्णय झाला. आणि त्या तपासणीचा रीपोर्ट घेण्यासाठी डॉक्टरांनी ‘ह्यांना’ एकट्यानाच बोलावले तेव्हा माझ्या मनात धोक्याची घंटा वाजली. मी त्यांना म्हणाले की तुम्ही जे सांगणार आहात ते ऐकायची माझी मनाची पूर्ण तयारी झाली आहे, तेव्हा मला धक्का वगैरे बसणार नाही. मग त्यांनी मला सिगमोईड कॉलोन कॅन्सर झाल्याचे सांगितले. थर्ड बी अशी स्टेज होती. आपला पेपर अवघड होता, आपण नापास झालो आहोत, पण आता ऑक्टोबरची परीक्षा द्यायची, खूप अभ्यास करायचा आणि पास व्हायचे. असेच काहीसे विचार मनात चालू होते.
मला कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे याची थोडीफार कल्पना होतीच, कारण माझी ‘मितवा’ ‘फ्रेंड फिलॉसोफर अँड गाईड’ असलेली माझी मैत्रीण वंदना हिला तीन वेळा कॅन्सर झाला होता. तो सारखा भेटायला येतो म्हणून ती त्याला ‘माझा मित्र’ असे खेळकरपणे म्हणायची. अर्थात याला खूप मोठे धाडस लागते. पण तिचा खडतर प्रवास, मित्राने तिच्याशी केलेली लगट, तिला हक्काने दिलेला त्रास मी जवळून बघितला होता. त्यामुळे मलाही कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागेल, उपचारांमुळे माझ्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल चांगलीच कल्पना होती. जे काही पुढ्यात आले होते ते चांगलेच आव्हानात्मक होते. धिराची, इच्छाशक्तीची खूप परीक्षा बघणारे होते.
मोठे ऑपरेशन, किमो आणि रेडीएशन ह्या सगळ्या अक्राळ विक्राळ उपचारांना सामोरे जायचे होते. व्हाय मी? वगैरे विचार माझ्या मनात कधीच आले नाहीत. किंवा आपण कोणाचे वाईट केले नाही, चिंतिले नाही तरी आपल्याच वाट्याला हे भोग का? असेही कधी वाटले नाही.
आजार आपल्या शरीराला झाला आहे, मनाला नाही आणि आपण आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर हयातून बाहेर पडणार आहोत.
आपल्याला फिरण्याची, प्रवासाची खूप आवड आहे. आजपर्यंत खूप फिरलो, आता थोडा ब्रेक घ्यावा लागेल मग पुनः आपलं आयुष्य नव्याने सुरू करू हा आशावादी विचार लढण्याचे बळ देत होता.
This too shall pass! हे ही दिवस जातील हे स्वतःला बजावत राहिले.
ह्या आजाराला सामोरे जातांना मी सतत हसतमुख होते आणि मोठ्या धिराने तोंड देत होते असं अजिबात नाही. कधी कधी वाटायचं, “ये जीना भी क्या जीना है लल्लू!” मोठ्याने भोकाड पसरून रडू यायचं. पण तितकंच. नंतर हळूहळू, मन शांत व्हायचं.
केमोच्या दरम्यान प्लॅस्टिकची कोबी, प्लॅस्टिकचा तांदूळ असे मेसेजेस व्हॉटस्एपवर फिरत होते. आधीच तोंडाची चव गेली होती, त्यात असे मेसेजेस बघून वाटायचं की आपण प्लॅस्टिकचा भातच खातोय.
या सगळ्या प्रवासात सपोर्ट सिस्टम म्हणजे काय असते हे मी अनुभवले. आणि “धन्य मी कृतार्थ मी” असं म्हणवंसं वाटलं.
कॅन्सरचं निदान झाल्यावर दोन्ही मुलं अक्षरशः धावत आली. मनातली काळजी, चिंता चेहेऱ्यावर दिसू न देता मला, बाबांना आश्वासक धीर दिला. सुनेने स्वयंपाकघराची बाजू भक्कमपणे सांभाळली. ती डाएटीशियन असल्याने माझ्या आहाराची काळजी घेतली. तसेच आल्यागेल्याचे बघितले. एक भक्कम तंबूच होता तो. काळजी घेणं म्हणजे काय असतं? त्याने निम्म आजारपण सुसह्य होतं. पण जवळ बसून बोलणं, वेदना समजून घेणं, आश्वासक स्पर्श करणं हे ही तितकंच महत्वाचं असतं. ते मी पुरेपूर अनुभवलं.

ऑपरेशन होऊन घरी येईपर्यंत मुलं थांबली. नंतर मग दर १५ दिवसांनी ४८ तासांच्या केमोसाठी ते आलटून पालटून येत. सुट्टी असेल तर येत, हवं नको ते विचारीत. मला बरं असेल तर ‘लॉंग ड्राइव’ ला घेऊन जात. जगण्याची नवी उमेद मला मिळत होती.
नवऱ्याने तर अहोरात्र माझी सेवा केली. आठ महीने स्वतःचे काही आयुष्यच ते जगले नाहीत. सगळी धडपड मला बरे कसे वाटेल यासाठी होती. कामाला बायका असल्या तरी पर्सनल टच असतोच, तसा होता. दोघांनी जोडलेली मित्रमंडळी, जवळचे नातेवाईक मधल्या काळात भेटून जात. पथ्याचा घरगुती खाऊ प्रेमाने आणत. ही सगळी वाटचाल एकट्याच्या बळावर केली असं कसं म्हणता येईल?
मानवता क्युरी सेंटरचे(HCG Manavta Cancer Centre) डॉ. नगरकर, डॉ. रॉय, डॉ. पालवे सगळ्यांची मी अत्यंत ऋणी आहे. कॅन्सर असल्याचा धक्का आणि त्याबद्दलची भीती असणाऱ्या प्रत्येक पेशंट साठी त्याची शंका फिटेपर्यंत हवा तेवढा वेळ देणारे, सहृदय- हसतमुख डॉ. नगरकर त्यांच्या पहिल्या भेटीतच देवदूत वाटतात. डॉ. सागर भालेराव दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत. ते नेहेमी म्हणायचे “भरपूर खा हो.” अतिशय गोड आणि लाघवी डॉक्टर होते ते.
असे लोक आपल्या जीवनात, अशा वातावरणात किती ताकद देतात हे अनुभवाशिवाय कळणार नाही. या आणि अश्या अनेक आठवणींनी समृद्ध अशी माझी ही कॅन्सर यात्रा! जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलणारी. हर पल यहा जी भर जियो, जो है समा कल हो न हो, असा संदेश देणारी.

Web Title: umed cancer patient support group Nashik initiative - cancer patient share journey of hope with caregiver.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.