रुपाली सतीश बोरसे
मी जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील रहिवासी आहे. वय ४२ वर्षे आहे. मी बालमोहन प्राथमिक विद्यालय, चोपडा येथे शिक्षिका आहे. माझे मिस्टर जिल्हा परिषद शाळा, धुपे येथे शिक्षक आहेत. मला दोन मुली आहेत, तसेच सासू-सासरे असा आमचा सुखी संसार होता. परंतु अचानक घसा दुखायला लागला. मी चोपड्याला डॉक्टरना दाखविले आणि सांगितले की मला गिळायला त्रास होतो आहे. मी काही दिवस त्यांनी दिलेल्या गोळ्या-औषधं घेतली तरी पण त्रास कमी होईना. त्यानंतर मी, माझे मिस्टर आणि मुलगी जळगांवला तपासायला गेलो. डॉक्टरानी सी.टी. स्कॅन करायला सांगितले आणि रीपोर्ट मध्ये कॅन्सरची गाठ निघाली.
जळगांवहून घरी आलो आणि सगळेजण खूप रडलो. विश्वासच बसत नव्हता की मला कॅन्सर झाला आहे. मनात खूप भीती वाटली. माझे मिस्टर खूप विचारात पडले. त्यांना टेंशन आले होते की आता काय करायचे, काही सुचेना. शेवटी नाशिकला जाऊन, तिथे पूर्ण ट्रीटमेंट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
बाहेर कोरोना असल्यामुळे माझी परिस्थिति खूपच कठीण होती. मार्च २०२० आला तेव्हाच माझ्या कॅन्सरच्या आजाराला सुरुवात झाली. कोरोनामुळे कोणीच कोणाकडे लक्ष देत नव्हते. प्रत्येकजण आपापल्या जीवाला जपत होता. रस्त्याने आम्हाला एकही गाडी दिसत नव्हती. आमची गाडी रस्त्यात चेक करायचे आणि विचारायचे कुठे निघाले. नाशिक, ठीक आहे म्हणायचे.
आम्ही नाशिकला पोहोचल्यावर डॉ. राज नगरकर यांना भेटायला मानवता हॉस्पिटल ला गेलो. त्यांना रीपोर्ट दाखविले. त्यांनी लगेच कन्फर्म केले की कॅन्सरची गाठ आहे. अश्या प्रकारे २०२० मध्ये कॅन्सरचे निदान झाले. पुढील ट्रीटमेंट लगेच सुरू झाली. मला अन्ननलिकेचा कॅन्सर होता. एवढा घातक होता की घोटभर पाणी पिणे देखील शक्य होत नव्हते. श्वास घेण्यासाठी आणि खाण्यासाठी घश्याला नळी होती. त्या नळीमधून माझ्या मिस्टरांना दहा-दहा मिनिटात कफ काढावा लागत होता. पोटाचे पण मोठे ऑपरेशन झाले होते आणि पोटाला पण नळी लावली होती, ज्यामधून ज्यूस दिलं जायचं. गोळ्या देखील बारीक कुटून द्याव्या लागायच्या. मिस्टर रात्री बारा वाजेपर्यंत हे सगळं करायचे. मला माझी लाळ पण गिळता येत नव्हती.आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता तो. आम्ही दोन महीने नाशिकला रेस्ट-हाऊस मध्ये राहिलो.
मग मला डॉ. श्रुती काटे यांनी केमो सुरू केली. दर आठवड्याला एक केमो असे करत एकूण १३ केमो मी घेतले. मात्र सुदैवाने केमोचा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. कानाच्या मागे कॅन्सरची मोठी गाठ होती, ती कधी कमी तर कधी जास्त होत होती. यानंतर माझे पेट स्कॅन झाले. त्यानुसार डॉ प्रकाश पंडित यांनी रेडीएशन घ्यायला सांगितले. सुरुवातीला रेडीएशनचा काही परिणाम वाटत नव्हता, पण हळूहळू शरीराने चांगला प्रतिसाद दिला. मी तीस रेडीएशन घेतले. कॅन्सर सुदैवाने शरीरात इतर कुठेच पसरला नव्हता, एकाच ठिकाणी होता.
केमो आणि रेडीएशनने माझ्या शरीरात इतका फरक पडला की मी पाणी प्यायला आणि जेवण करायला लागले. रोजची सगळी रूटीन लागली.
ट्रीटमेंटच्या संदर्भात मला हॉस्पिटलचे खूप चांगले अनुभव आले. केमो सुरू असतांना डॉ. श्रुती काटे मॅडम यायच्या, खूप धीर द्यायच्या व काही त्रास होतो आहे का विचारायच्या. तुम्ही लवकर बऱ्या होणार आहात असं म्हणायच्या. त्यामुळे खूप बरं वाटायचं. डॉ. राज नगरकर म्हणायचे की ताई तुमचं पुनर्जन्म झाला आहे, तुम्ही चांगल्या होणार आहात. रेडीएशनचे रीपोर्ट चांगले आल्यावर डॉ. प्रकाश पंडित, डॉ. विजय पालवे तसेच डॉ. मयूरेश वीरकर ह्यांना खूप आनंद झाला.
डॉ. राज यांना मी सांगितले की आता मी व्यवस्थित पाणी पिते, जेवण करते, विशेष म्हणजे सगळे खाते, मला काहीही त्रास नाही. मी रोज शाळेत जाते व मुलांना अध्यापन करते. मला बोलता सुद्धा येत नव्हते, आता व्यवस्थित बोलते. सर म्हणाले व्हेरी गुड ताई! काटे मॅडम म्हणाल्या,तुम्ही मृत्यूच्या दाढेतून परत आल्या आहात. तुमच्या परिवाराला तुमची खूप गरज होती.
मी आता पहिले जशी होते तशीच झाले आहे आणि खूप आनंदात आहे. सगळ्यांसाठी महत्वाचे म्हणजे आपली स्वतःची इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे. आपण स्वतःच पॉझिटिव्ह राहावे, निगेटिव्ह विचार करू नये.
मला साथ देणारे, मला बरं करण्याचे सगळे श्रेय माझे पती, कुटुंब आणि मानवता कॅन्सर हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स आणि स्टाफ यांना देते. त्यांच्यामुळे मी हे जग आज पाहू शकते आहे.