मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. आयएएस रुक्मिणी रेयर या सहावीत नापास झाल्या होत्या पण नंतर पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. जर एखादी व्यक्ती शाळेत नापास झाली असेल तर त्याचा अर्थ असा नाही की, ती व्यक्ती आयुष्यातही नापास होईल. हेच रुक्मिणी यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.
रुक्मिणी यांनी सुरुवातीचं शिक्षण गुरुदासपूरमध्ये घेतलं. शिक्षणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठातून सामाजिक शास्त्रात पदवी घेतली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मुंबई येथून सामाजिक शास्त्रांमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केल्यानंतर रुक्मिणी यांनी म्हैसूरच्या आशोधा आणि मुंबईतील अन्नपूर्णा महिला मंडळमध्ये इंटर्नशिप केली.
एनजीओमध्ये असताना त्यांना नागरी सेवांमध्ये रस निर्माण झाला आणि त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. २०११ मध्ये रुक्मिणी यांनी त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश मिळवलं आणि ऑल इंडिया रँक (एआयआर) २ मिळवला.
कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता रुक्मिणी यांनी सेल्फ स्टडीच्या आधारावर आपला प्रवास पूर्ण केला. त्यांनी सहावी ते बारावीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास केला आणि नियमितपणे वर्तमानपत्र आणि मासिकं वाचली. त्यांच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे.