क्रिकेट म्हंटलं की डोळ्यासमोर काय येतं? प्रचंड पैसा. करोडो रुपये कमावणारे खेळाडू. आलिशान लाइफस्टाइल. पण या मुलींची गोष्ट तशी नाही. त्यांच्याकडे आहे फक्त क्रिकेट खेळण्याचं वेड. जगायचं कसं हा प्रश्न आजच त्यांच्यासमोर इतका बिकट आहे की कुणी आपल्याला स्पॉन्सर मिळेल अशी आशाही नाही. व्हानुआतू नावाच्या देशातल्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलींची ही गोष्ट. हा देश कुठंंही आहे हे जगाच्या नकाशावरही अनेकांना दाखवता येणार नाही. पण तिथल्या मुलींनाी आज अशी काही कामगिरी केली आहे की जगभरातल्या माध्यमांना त्यांची दखल घेणं भाग पडलं आहे.
व्हानुआतू नावाचा हा छोटाचा देश. खरंतर द्विपच. ऑस्ट्रेलियापासून १७५० किलोमीटर लांब असलेलं हे टिंगू बेट. तिथल्या मुलींनाही गेल्या दशकभर किंवा खरंतर त्यापूर्वीच काही वर्षे क्रिकेटचा नाद लागला. क्रिकेट पाहणाऱ्या मुलींनाी त्यांच्याशी नकळत ठरवलं की आपण क्रिकेट खेळायचं. २०२३ उजाडता उजाडता मुलींची क्रिकेट टिमही उभी राहिली. पण या मुलींना शिकवणार कोण? ज्या देशात पुुरुषांच्या क्रिकेटटिमकडे काही नव्हतं, तिथं बायकांच्या क्रिकेटच्या वाट्याला काही येण्याची आशाच नाही. भारतीय उपखंडातली ही कथा तिकडेही होतीच.
पण त्या मुली हरल्या नाही. त्यांनी त्यांचा सराव सुरु ठेवला. एकमेकींना शिकवलं. जिद्द होती की आपण येणारा महिला टी २० विश्वचषकापर्यंत पोहचायचं. स्वप्न पाहणं वेगळं पण सत्याची धार वास्तवाला काचते तिथं स्वप्नांची काय गत? ना पैसा, ना प्रशिक्षक. कोण या मुलींना पैसे देणार? मग व्हानुआतू महिला क्रिकेट संघाची एक वेबसाईट करण्यात आली. त्या वेबसाईटवरुन लोकांकडे पैशाची मदत मागण्यात आली. देशातही ते आवाहन करण्यात आलं. लोकवर्गणी गोळा झाली. त्यातून पैसा उभा राहिला. क्रिकेट खेळण्याची साधनं ते अबूधाबीपर्यंतचा प्रवास हा खर्च कमी नव्हता. पण एकीकडे सराव दुसरीकडे लोकवर्गणीसाठीची धडपड असं करत या मुली आबूधाबीपर्यंत पोहचल्या.
आबूधाबीच्या शेख झायेद स्टेडिअममध्ये आयसीसी स्टेडियममध्ये येत्या आयसीसी महिला टी २० वर्ल्डकपसाठीचे पात्रता सामने सुरु आहेत. आणि त्याच सामन्यात व्हानुआतूच्या या क्रिकेटवेड्या मुलींनी झिम्बाब्वे संघाला हरवलं. आयसीसी रँकच नसलेल्या एका संघाने आयसीसीचा नियमित सदस्य देश असलेल्या संघाला हरवणं ही मोठीच गोष्ट. अण्डरडॉग स्टोरी. ज्या मुलींकडून कुणीच कसलीच अपेक्षा ठेवली नव्हती त्या मुलींनी आपल्या संघाची दखल घ्यायला क्रिकेट विश्वाला भाग पाडलं आहे.
गेल्या काहीच आठवड्यापूर्वी या महिला संघाला एक प्रशिक्षक लाभला, त्याचं नाव जोशुआ रासू. तो व्हानुआतुच्या पुरुष संघाचा कप्तान आहे.तो सांगतो, मी आता प्रशिक्षक झालो. मात्र या मुलींची जिद्द अशी की त्यांचं समर्पण आणि कौशल्य आज जगाला त्यांची गोष्ट ठणकावून सांगतं आहे.क्रिकेट असंही असतं.. जगण्याची उमेद देणारं, माणसांना स्वप्न पाहायला शिकवणारं आणि त्या स्वप्नासाठी जीवाचं पाणी करणारं..