आपल्याला कोणी एक कोटी रुपयांच्या पगाराची नोकरी देतो म्हटलं तर आपण खुशीने ती नोकरी स्वीकारु. महिन्याकाठी मिळणारा पगार आणि त्यात ऐशोआरामात जगणे कोणाला नाही आवडणार. पण इतका मोठा पगार धुडकावून एका तरुणीने ऐन २३ व्या वर्षी स्वत:चा व्यवसाय करायचे ठरवले इतकेच नाही तर या व्यवसायात यशस्वी होत आज ती १०० कोटी रुपयांच्या बिझनेसची मालकीण आहे. या महिलेचे नाव आहे विनिता सिंह, ही गोष्ट कालची किंवा आजची नाही, तर ज्या काळात लोक नोकरी सोडून व्यवसायात पाऊल ठेवायला कचरत होते त्या काळातील आहे. २००७ मध्ये विनिता यांनी हे धाडस केले आणि शुगर कॉस्मॅटीक्स हा लिपस्टीकचा ब्रॅंड उभा केला. भारतातील महिलांच्या त्वचेला आणि भारतीय हवामान सूट होतील अशी उत्पादने तयार करणे ही शुगर कॉस्मॅटीक्सची खासियत आहे. आज त्यांचा ब्रँड देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे ऐन तारुण्यात एका मुलीने घेतलेला निर्णय तिचे आयुष्य बदलवणारा ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता कोण आहेत या विनिता, त्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी, करिअरचा ग्राफ यांविषयी....
कोण आहेत विनिता सिंह
विनिता या शुगर कॉस्मेटीक्स या भारतीय बाजारातील प्रसिद्ध कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या कंपनीचे २०१९ मधील उत्पन्न ५७ कोटी होते तर २०२० मध्ये ते १०४ कोटी इतके झाले. विनिता यांच्या ब्रँडचा परदेशातही ग्राहक असून त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी १५ टक्के उत्पन्न हे परदेशातून येत असल्याचे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले होते. विनिता यांना शुगर कॉस्मॅटिक्सकडून मिळणारा वर्षाचा पगार २२ कोटी आहे. २०१५ मध्ये त्यांनी आपला मित्र कौशिक मुखर्जी यांच्यासोबत व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांची उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख आहे.
शैक्षणिक व करिअर पार्श्वभूमी
दिल्लीतील आरके पूरम येथील पब्लिक स्कूल येथून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या विनिता यांनी आयआयटीमधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी २००५ मध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतली. तर आयआयएम अहमदाबाद येथून त्यांनी २००७ मध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर विनिता यांनी दोइत्सु बँकेत आपली समर इंटर्नशिप पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी Quetzal Verify Private Limited मध्ये आपल्या हुशारीच्या जोरावर संचालक पदापर्यंत मजल मारली. पण या पदावर त्यांनी केवळ पाच वर्षे काम केले. २०१२ मध्ये त्यांनी आपले कॉर्पोरेट करिअर सोडून फॅब बॅग ही कंपनी सुरू केली. तर २०१५ मध्ये त्यांनी शुगर कॉस्मेटीक्स कंपनी सुरू केली.
वैयक्तिक पार्श्वभूमी
आता ३७ वर्षांच्या असलेल्या विनिता यांचे त्यांचा मित्र कौशिक मुखर्जी यांच्याशी लग्न झालेले असून तेही विनिता यांच्यासोबत शुगर कॉस्मॅटिक्सचा व्यवसाय सांभाळतात. या दोघांना विक्रांत आणि कौशिक ही दोन मुले आहेत. त्यांच्या पालकांबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही.
शुगर कॉस्मेटीक्सविषयी
२०१५ मध्ये सुरु केलेला शुगर कॉस्मॅटीक्सचा व्यवसाय आज बऱ्याच मोठ्या पातळीवर आहे. वर्षाला त्यांचे उत्पन्न १०० कोटी असून पुढील वर्षी ते २०० कोटींपर्यंत नेण्याचा कंपनीचा मानस आहे. विनिता आणि कौशिक यांनी कंपनीची सुरुवात केल्यावर ऑनलाइन पद्धतीने आपली उत्पादने विकण्यास सुरुवात केली होती. आता कंपनीची विविध शहरांमध्ये ७०० हून अधिक आऊटलेटस आहेत. २०१९ मध्ये कंपनीने दक्षिण भारतात आपले पहिले दुकान सुरू केले होते. आता देशातील ९२ शहरांमध्ये कंपनीची आऊटलेटस आहेत.
शुगर कॉस्मेटीक्सचे उत्पन्न
कंपनीचे ४५ टक्के उत्पन्न ऑनलाइन माध्यमातून तर ४५ टक्के उत्पन्न आऊटलेटसच्या माध्यमातून जमा होते. तर १० टक्के उत्पन्न परदेशातील विक्रीतून मिळते. लिपस्टीक आणि आयलायनर ही शुगर कॉस्मेटीक्सची मुख्य ओळख असून या क्षेत्रात अनेक वर्षे असणाऱ्या नायकासारख्या प्रसिद्ध ब्रँडना शुगर चांगलीच टक्कर देत आहे. वर्षाला कंपनीकडे साधारणपणे ३० हजारहून अधिक ऑर्डर्स येतात असेही सांगण्यात आले आहे.