स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि ७३ वा प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पद्मश्री शीतल महाजन (राणे) हिने अनोख्या पद्धतीने तिरंग्याला सलामी दिली. नऊवारी साडी आणि मराठमोळा साज करत शीतलने हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे पॅरामोटरच्या साहाय्याने सहा हजार फुटांवरून पॅराजम्पिंग करून तिरंग्याला सलामी दिली. अशाप्रकारे नऊवारीत पॅरामोटारमधून पॅराजम्प करणारी ती पहिलीच भारतीय महिला असून तिने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. शीतल ही बहिणाबाई चौधरी यांची पणती आहे. २००४ मध्ये कोणताही पूर्वानुभव नसताना शीतल महाजनने उणे ३७ तापमानात पॅराशूटच्या साह्याने तीन हजार फूटांवरुन उडी मारली होती. त्यानंतर २००६ मध्ये फ्री फॉल आणि पॅराशूटच्या साह्याने दक्षिण ध्रुवावर उडी मारणारी शीतल जगातील एकमेव महिला ठरली होती. क्रिडा व साहस क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे केंद्र शासनाने शीतलचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला.
आताच्या साहसाबाबत शीतल महाजन म्हणाली, स्कायडायव्हिंग खेळात पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धेत मी सहभागी झाली आहे. आतापर्यंत माझ्या नावावर १८ राष्ट्रीय आणि ६ जागतिक विक्रमांची नोंद आहे. जगातील सात खंडात स्कायडायव्हिंग करणारी मी पहिली भारतीय महिला आहे. याची दखल घेत फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनल यांनी माझा सबिहा गोकसेन सुवर्ण पदक देऊन सन्मान केला आहे. आतापर्यंत साडी घालून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी स्कायडायव्हिंग केले होते. परंतु प्रथमच देशात माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी असलेल्या पुणे शहरात नऊवारी साडी घालून पॅरामोटारमधून पॅराजम्पिंग केल्याने ही माझ्यासाठी अविस्मरणीय कामगिरी ठरली आहे. यावेळी पॅरामोटरचे पायलट असलेल्या रॉन मेनेज यांच्या पॅरामोटारमधून आकाशात पाच हजार फुटांवर गेले. त्या ठिकाणी पॅरामोटारमधून शीतलने आकाशात झेप घेतली. जमिनीच्या दिशेने वेगात येत असतानाच साडेतीन हजार फूट उंचीवर शीतलने पॅराशूट उघडले. पॅरामोटारमधून उडी घेण्याचा शीतलचा पहिलाच अनुभव असल्याचे तिने सांगितले, त्यासाठी दिड महिन्यापासून सराव सुरू होता असेही ती म्हणाली. जंप करणे एकवेळ सोपे आहे पण यशस्वीपणे खाली उतरणे आणि आपल्याबरोबरच पायलट आणि मोटारही यशस्वीरित्या लँड होणे हेही तितकेच महत्त्वाचे असते असेही शीतल म्हणाली.
अशा प्रकारे पॅरामोटारमधून पॅराशूट उडी मारणारी शीतल पहिली भारतीय महिला ठरली. या उपक्रमासाठी ग्लायडिंग सेंटर हडपसर पुणेचे अधिकारी शैलेश चारभे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही शीतलने सांगितले. याआधी शीतलने २०१८ मध्ये थायलंडमध्य नऊवारी साडी नेसत मराठमोळ्या अंदाजात १३ हजार फूट उंचीवरुन स्काय डायव्हिंग केले होते. आपल्या या विक्रमाची नोंद होणार नसली तरी मराठी बाणा दाखवण्यासाठी आपण हे केल्याचे तिने त्यावेळी सांगितले होते.