-इंदुमती गणेश
ही गोष्ट आहे, सोनालीची. १५ सेकंदाच्या एका दुनियेनं त्यांचं जगणं बदललं त्याची. कोल्हापूरच्या शाहूपुरी कुंभार गल्लीत राहणाऱ्या मेंदी आर्टिस्ट सोनाली दीपक वाघरिया. शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत; पण सोनालीला एक आगळी हौस, ‘ॲक्सेण्ट’वालं इंग्रजी बोलण्याची. सहज म्हणता त्यांनी हौस म्हणून ॲक्सेण्टवालं इंग्रजी बोलत १५ सेकंदांचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकणं सुरू केलं.
आणि म्हणता म्हणता ते इतके लोकप्रिय होऊ लागले की, प्रियांका चोप्राने आणि जॅकलिन फर्नांडिसने ‘यू रॉक’ म्हणत तिच्या इन्स्टा पेजवर सोनालीचे व्हिडिओ शेअर केले.
सोनाली तर खुश झालीच; पण मीडियावाल्यांनीही तिला संपर्क करत फोन सुरू केले. या साऱ्यातच आम्ही सोनालीला भेटायला त्यांच्या घरी गेलो. कोल्हापुरात नुकत्याच आलेल्या महापुराने त्या राहतात त्या भागातली सगळी घरं आपल्या कवेत घेतली होती. चिखल-गाळमधून मार्ग काढतच तिच्या घरी पोहोचलो. खालच्या खोलीत तर अजून गाळ सफाईच सुरू होती. डोक्यावरचा पदर सावरत सोनाली म्हणाल्या, दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलं होतं ना, अजून स्वच्छता चालू आहे. त्यांनी चटई टाकली आणि आमचं बोलणं सुरू झालं.
(छायाचित्रं - आदित्य वेल्हाळ)
सोनाली, मूळच्या गुजरातच्या, पण माहेर मुंबईचं. आई-वडील, बहिणी, भावंडं असं मोठं कुटुंब. शिक्षण सातवीपर्यंत येऊन थांबलं. घर चालवण्यासाठी सोनाली वयाच्या दहाव्या वर्षापासूनच जुहू बीचवर पर्यटकांना स्टॅम्प मेंदी काढायला जायच्या. पुढे अगदी बारीक डिझाइनची हातभर मेंदी काढू लागल्या. तिथं परदेशी पर्यटकांची संख्या जास्त, त्यांची इंग्रजी, वेगाने बोलण्याची पद्धत, उच्चार याचं आकर्षण वाटू लागलं. मेंदी काढताना होणाऱ्या मोडक्या तोडक्या संवादातून हुबेहूब इंग्रजी वाक्यं सोनाली बोलायला शिकल्या. मज्जा म्हणून लहान भावाने व्हिडिओ बनवायला शिकवले.
आणि आता हा प्रवास ३ लाख फॉलोअर्सपर्यंत येऊन पोहोचला आहे. सोनाली अर्थातच आनंदात आहेत.
(छायाचित्रं - आदित्य वेल्हाळ)
सोनाली म्हणते, शिकायचं असेल तर पैसे नाही, इच्छा पायजे!
छोट्याशा घरात आपला सारा संसार मांडून बसलेली सोनाली सांगत असते.
मला इंग्रजीची लई हौस; पण शिक्षण झालं नाही, आमच्याकडं लहानपणीच लग्नं होतं. मी ही आठ वर्षांपूर्वी लग्न होऊन कोल्हापूरला आले. आता मोठा मुलगा सात वर्षांचा तर मुलगी तीन वर्षांची आहे. नवऱ्याचा मसाल्याचा व्यवसाय आहे, त्यांना हातभार लावायचा म्हणून तीन वर्षांपासून अंबाबाई मंदिराच्या परिसरात स्टॉलवर राजस्थानी इमिटेशन ज्वेलरी, तयार ब्लाऊज विकते. दिवसभराच्या कामातनं कंटाळा आला की, रीलवर व्हिडिओ करून इन्स्टाग्रामवर शेअर करते. महिन्यापूर्वी प्रियांका चोप्रा यांनी त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर स्ट्राँग वूमन स्टोरी म्हणून माझा व्हिडिओ ठेवल्याचं कळलं. एकदम भारीच वाटलं. मी त्यांना थँक्यू, म्हणून मेसेज पाठवला. आता पंधरा दिवसांपूर्वी जॅकलिन फर्नांडिस यांचा मला ‘यू आर रॉक’ म्हणून मेसेज आला. माझी झोपच उडाली, खरंच वाटेना. त्यांना मॅडम मी तुमची मोठी फॅन आहे असा रिप्लाय केला. त्यांनी लगेच लव्ह यू ॲन्ड युवर रील्स सो मच, वुई विल मीट ॲन्ड डू सम रिल्स टुगेदर, डू सम हिना अल्सो इन नेक्स्ट वीक. असा मेसेज केला, काय बोलावं सुचेना.’
आता हे सारं झाल्यावर सोनाली खुश झाल्या नसत्या, चर्चा झाली नसती तरच नवल; पण त्या सांगतात, मला फेमस व्हायचं अशी काय इच्छा नव्हती. काम, टेन्शनमधून जरा मोकळं व्हायचं, तेवढीच मज्जा म्हणून व्हिडिओ करते. आमच्यात बायकांना घरादाराला लई सांभाळून आणि नियमात राहायला लागतंय त्यामुळे असले व्हिडिओ कशाला करायचं, आपल्यात हे फॅड चालत नाही असं ऐकावं लागतं. मेंदी काढून घरी यायला रात्री उशीर होतंय. ज्वेलरी, तयार ब्लाऊज आणण्यासाठी दोन दोन दिवसांचा प्रवास करून दिव दमणपर्यंत जाऊन येते; पण नवऱ्यानं कधी आडवं घातलं नाही, तुला आवडतंय तर कर म्हणाले. मी पण व्हिडिओ करताना कधी घुंघट डोक्यावरनं पडू दिला नाही. मला माहीत आहे मी काही वाईट करत नाही, म्हणून बोलणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. खूप लोक मुंबईत या आपण व्हिडिओ बनवू म्हणून ऑफर देतात; पण माझा संसार, सासर इथं आहे. अंबाबाईची कृपा आहे आणि कोल्हापूरचं पण नाव व्हायला पायजे की. म्हणून मी काय मुंबईला जात नसते. मला मोठी मेकअप आर्टिस्ट व्हायचंच; पण त्यासाठी पैसे लागतात. मला वाटतंय, तुम्हाला शिकायचं असंल तर पैशांपेक्षा इच्छा पाहिजे, तुम्ही बघा काही महिन्यांनी परत याल तेव्हा मी मेकअप आर्टिस्ट झालेली असेन, त्यावेळी परत मुलाखत देईन आणि हो हातावर मेंदी काढायची असेल तर कधीही बोलवा...
(लेखिका कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
indu.lokmat@gmail.com