आपल्या शिक्षणासाठी आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाण असलेली तरुणी आज आईवडिलांचा अभिमान बनून आपले काम करत आहे. अशावेळी त्या पालकांना कृतकृत्य न वाटले तरच नवल. या भारतीय तरुणीचे नाव आहे शिवानी कालरा. शिवानीने १२ वी मध्ये असतानाच आपल्या पालकांना आपले पायलट होण्याचे स्वप्न बोलून दाखवले. अर्थिक परिस्थिती नसतानाही पालकांनी तिला खंबीर पाठिंबा दिला आणि तिनेही त्यांच्या कष्टाचे चीज करुन दाखवले. रात्रीचा दिवस करुन शिवानीने अभ्यास केला आणि भारतीय वायूदलात पायलट म्हणून रुजू होण्याची आपली इच्छा पूर्ण केली. आपल्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या पालकांचे ऋणही ती शब्दातून व्यक्त करते. आता पायलट शिवानीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे? याचे कारण काय असेल?
तर रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीत स्वत:च्या जीवाचा विचार न करता शिवानीने ऑपरेशन गंगामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. युक्रेनमधील नागरिकांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेता देशातील सामान्य जनतेचे यामध्ये हाकनाक बळी जात आहेत. इतकेच नाही तर युक्रेनमध्ये शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गेलेल्या परदेशी नागरीकांच्याही जीवालाही या परिस्थितीत धोका आहे. यामध्ये भारतीय विद्यार्थी आणि नागरीकांची संख्याही मोठी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेनमधील भारतीय नागरीकांना सुखरुप मायदेशात आणण्यासाठी सर्वच स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये शिवानीने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
२०१६ मध्ये परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर शिवानीने २ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि भारतीय वायूदलात ती सामील झाली. त्यानंतरची २ वर्षे विमानतळ हेच माझे घर होते असे शिवानी सांगते. २०२० मध्ये कोविडच्या परिस्थितीतही शिवानीने भारतीय नागरिकांना सुखरुप आपल्या देशात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शिवानी सांगते, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या भावाच्या लग्नाची तयारी सुरु असताना मला वरिष्ठांचा फोन आला आणि त्यांनी मला ऑपरेशन गंगामध्ये सहभागी होणार का असे विचारले. क्षणाचाही विलंब न लावता हे माझे कर्तव्य आहे असे समजून मी त्यांना होकार दिला. आई-वडिलांनी आपल्याला त्यावेळी सांगितले की तू केवळ त्या भारतीयांना मायदेशी आणत नाहीयेस तर त्यांच्या कुटुंबियांना आणतीयेस, त्यामुळे तुही काळजी घे.
पुढे ती म्हणते नंतर मी लगेचच ठरलेल्या ठिकाणी पोहोचला आणि १० तासांचा प्रवास करुन आमच्या १५ जणांची टीम बुडापेस्ट याठिकाणी पोहोचली. त्याठिकाणी अतिशय घाबरलेल्या स्थितीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आमचा चेहरा पाहून अतिशय आनंद झाला. आम्हीही त्यांना सुखरुप भारतात परतवण्याची हमी दिली. आम्ही काही तासांचा प्रवास करुन सुखरुपपणे भारतात पोहोचलो तेव्हा दिल्ली विमानतळावर सगळ्या विद्यार्थ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते आणि ते आमच्यासाठी टाळ्या वाजवून आमचे कौतुक करत होते. या क्षणी मला अतिशय भरुन आले आणि अभिमान वाटला. या सगळ्या गोंधळात आणि गदारोळात शाब्बास हा आवाज मला सगळ्यात जोरात ऐकू आला आणि तो माझ्या आई-वडिलांचा होता असे शिवानी सागंते. त्यानतंरही तिने लगेचच बुचारेस्ट ते दिल्ली हा प्रवास केला आणि गरजेप्रमाणे आणखीही १०० फेऱ्या मारायला ती तयार असल्याचे तिने सांगितले. तुमचे कर्तव्य तुम्ही बजावायलाच हवे असेही ती जाता जाता सांगते.