गरोदर महिलेचा उपचाराअभावी मृत्यू होणे ही भारतासाख्या देशात काहीशी सामान्य वाटणारी गोष्ट आहे. प्रशासनाला यामुळे फारसा फरक पडतोच असं नाही. बातमीमूल्य असल्याने या प्रकरणाची माध्यमांमध्ये बातमी येते. रुग्णाच्या नातेवाईकांनी आवाज उठवला तर तक्रार नोंदवली जाते आणि फारतर डॉक्टर आणि रुग्णालयावर कारवाई होते. मात्र काही दिवसानंतर सगळेच ही गोष्ट विसरतात आणि हे सगळे हवेत विरुन जाते. अशा प्रकरणात मातेच्या पोटातील जगही न पाहिलेला जीव तर जातोच पण ज्या घरातील मुलगी, सून, बायको, बहिण गेलेली असते त्यांनाच याचे दु:ख काय ते कळते. एकीकडे आपल्याच देशातील महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झालेला असताना निर्ढावलेली यंत्रणा तर दुसरीकडे पोर्तुगालसारख्या छोट्या देशामध्ये भारतीय पर्यटक महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याप्रकरणी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ही एकूणच व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे (Who is Marta Temido Portugal Health Minister).
पोर्तुगालमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय गरोदर महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला. विशेष म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनीही हा राजीनामा स्वीकारला आहे. अशाप्रकारे एखाद्या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू होणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याने मार्टा टेमिडो या इतक्या मोठ्या पदावरून पायउतार झाल्या आहेत. भारतीय महिलेला पोर्तुगालमध्ये प्रसुती कळा जाणवू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रसुती कक्षात बेड उपलब्ध नसल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. मात्र, याच काळात तिला हृदयविकाराचा झटका आला आणि यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाल्यावर नेटकऱ्यांनी पोर्तुगाल सरकारवर जोरदार टिका केली. अखेर टेमिडो यांनी राजीनामा देण्याचे ठरवले. कोण आहेत मार्टा टेमिडो याविषयी जाणून घेऊया...
- मार्टा टेमिडो यांच्याकडे 2018 पासून देशाच्या आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी होती. गेली २.५ वर्षे कोरोना काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावत स्वत:ला सिद्ध केले होते.
- २०१८ ते २०२१ त्या स्वतंत्रपणे निवडणूका लढल्या तर २०२१ मध्ये त्या सोशालिस्ट पार्टीमध्ये गेलेल्या टेमिडो अवघ्या ४८ वर्षांच्या आहेत.
- Coimbra विद्यापीठातून त्यांनी कायद्याचे, आरोग्य विषयातीस अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या विषयात पदव्या घेतल्या आहेत. इतकेच नाही तर टेमिडो यांनी नोव्हा (NOVA) विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय आरोग्य विषयातही पीएच.डी पर्यंत अभ्यास केला आहे.
- राजकारणात येण्याआधी टेमिडो नोव्हा विद्यापीठात उपसंचालक म्हणून काम केले आहे. तसेच अनेक सार्वजनिक हॉस्पीटलमध्ये त्यांनी गैर कार्यकारी अध्यक्षपद भूषविले आहे.