-माधुरी पेठकर
दहावीचा निकाल लागला आणि धुळ्याच्या वैष्णवी मोरेच्या यशाची खास चर्चा झाली. जन्मत:च मूकबधिर असलेल्या वैष्णवीनं (deaf and differently abled vaishnavi more) ८० टक्के गुण मिळवले. खेळात ब्राझिल पॅरालिम्पिकपर्यंत (Brazil Paralympics 2022) मजल मारलेल्या आणि ज्यूडोत चमक दाखवून आपलं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या वैष्णवीनं अभ्यासातही स्वत:ची धमक दाखवून दिली. धुळे शहरात राहणारी वैष्णवी गल्लीतले खेळ खेळता जागतिक स्तरावर चमकली. तिचा हा गल्लीत सुरु झालेला प्रवास जागतिक स्तरापर्यंत कसा पोहोचला, वैष्णवीनं, तिच्या आई बाबांनी यासाठी काय मेहनत घेतली याबाबत वैष्णवीचे बाबा बालाभाऊ मोरे यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला तेव्हा मोठ्या अभिमानानं आणि कौतुकानं बालाभाऊंनी आपल्या लेकीच्या कामगिरीची आणि कष्टाची ( story of vaishnavi more achievement) गोष्ट सांगितली. वैष्णवी मोरेची गोष्ट तिच्या वडिलांच्याच शब्दात...
Image: Google
वैष्णवी जन्मत:च मूकबधिर आहे हे आम्हाला समजायला वेळ लागला. पण जेव्हा कळलं तेव्हा पायाखालची जमीन सरकली. कसं होणारं पोरीचं? पो चिंता वाटली आणि भीतीही. उपचारासाठी पैसा खर्च केला, पण डाॅक्टर म्हणू लागले लाखो रुपये ओतले तरी आता काहीही उपयोग होणार नाही. मग सर्व काही देवाच्या भरवशावर सोडून टाकलं. आम्हाला ती काय सांगू पाहातेय ते कळायचं नाही आणि तिच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचायच्या नाही. फार अगतिक वाटायचं. पण वैष्णवी या अडचणीतही खूष दिसायची. तिला खेळायला आवडायचं. गल्लीत खेळले जाणारे प्रत्येक खेळ ती खेळायची. आम्ही कधी तिला अडवलं नाही. तिला त्यात आनंद वाटत होता.
Image: Google
वैष्णवी ३-४ वर्षांची असताना गणेशोत्सव, नवरात्री दरम्यान होणाऱ्या स्पर्धामध्ये भाग घेऊ लागली. तेव्हा लिंबू चमचा, संगीत खुर्ची अशा स्पर्धांमध्ये ती जिंकून यायची. मग तिला प्राध्यापक रघुनाथ केले वाकश्रवण या मूकबधिरांच्या शाळेत टाकलं. या शाळेमुळे वैष्णवीशी कसा संवाद साधायचा ते आम्हाला समजलं. पोरीला काय हवं, काय नको ते कळू लागलं. शाळेत होणारे कार्यक्रम आणि स्पर्धात भाग घ्यायची. तिथेही तिला पहिलाच क्रमांक मिळायचा. गोळाफेक, धावणे, उंच उडी सारखे खेळ ती खेळत होती. ती जिल्यापातळीवर मग राज्य पातळीवर खेळू लागली. नंतर ती कुस्ती खेळू लागली. २०२० मध्ये सातारा येथील कुस्ती स्पर्धेत तिनं सुवर्णपदक मिळवलं. उंच उडी, धावणे, गोळा फेक या खेळातही तिने राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले. कुस्ती, उंची उडी, गोळा फेक, ज्यूडो, धावणे अशा सर्व स्पर्धा मिळून तिने आजपर्यंत १३ सुवर्णपदकं मिळवले. कुस्ती खेळता खेळता ज्यूडोही ती खेळू लागली. पुण्याच्या सह्याद्री अकादमी येथील रचना धोपेश्वर मॅडमनं तिच्यातली चमक बघून तिला ज्यूडोचं प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. १५ दिवसांच्या ज्यूडो ट्रेनिंग नंतर ती दहावीची परीक्षा देऊन दिल्लीला गेली. तिथे डेप ऑलिम्पिक निवड चाचणीत ज्यूदो या क्रीडा प्रकारासाठी तिची निवड झाली. २५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर ती ब्राझीलला गेली. तिथे ती ज्यूडोत पाचव्या क्रमांकावर राहिली. तिथून परत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीया बोलावून तिचं कौतुक केलं. तिची पाठ थोपटली.
Image: Google
मी साधा मासे विकणारा. तलावावरुन मासे गोळा करुन मासे विकून घर चालवतो. आज ६३ वर्षांचा आहे. अख्खं आयुष्य मासेमारी आणि मासे विकणं यातच गेलं. घरची परिस्थिती बेताची. पण मी माझ्या तिन्ही मुलींना आणि मुलाला शिकवायचं ठरवलं होतं. वैष्णवीला जे खेळावंसं वाटत होतं ते खेळू दिलं. माझ्या परीनं मी तिला पाहिजे ती मदत केली. पोरगी मूकबधिर आहे. हिला आयुष्यात खूप अडचणी येतील. ही जर खेळात वाढत गेली तर हिचं भलं होईल. कुठेतरी चांगली नोकरी लागून तिचं आयुष्यभराचं कल्याण होईल असा अडाणी विचार करुन मी वैष्णवीला आधार देत होतो. मला वैष्णवीतली जिद्द दिसत होती. तिच्यातल्या जिद्दीनंच हलाखीच्या परिस्थितही तिला खेळण्यासाठी जे जे लागायचं ते देत गेलो. कुस्तीत पुढं जावी म्हणून परिस्थितीनुसार जसा जमेल तसा तिला खुराक दिला. मी खर्च करत गेलो. तेव्हा त्या परिस्थितीत कोणाची मदत नव्हती आणि अजूनही नाही. ब्राझीलला पाठवतानाही परिस्थिती नसतानाही दीड लाख रुपये खर्च केले. आता तिला रचना धोपेश्वर मॅडम प्रशिक्षणासाठी बोलवत आहे. पण सध्या खर्च कसा करणार अशी माझ्यासमोर अडचण आहे. प्रवास खर्च, पुण्याला राहाण्याचा खर्च, तिथे येण्या जाण्याचा खर्च, तिला लागणारा खुराक या सर्वांच्या खर्चाचा विचार करावा लागतोय, काही डोकं चालना झालंय, पण पोरगी आणखी पुढं जायला पाहिजे हे मात्रं खरं !
Image: Google
आमच्या वैष्णवीनं खेळ सांभाळून अभ्यासही केला. तिला अभ्यासाची पण गोडी. कष्ट करायची तिची चिकाटी फार. सकाळी उठली की रनिंगला जायची. रनिंग करुन झाल्यावर जिमला जायची. जिमवरुन आल्यावर थोडा आराम, खाणं पिणं करुन झाल्यानंतर ती अभ्यास करायची. अभ्यास झाला की शाळेत जायची. शाळेतून संध्याकाळी पाचला आली की तालमीत जायची. मग आल्यावर पुन्हा अभ्यास करायची. तिच्यातली चिकाटी, ती घेत असलेली मेहनत बघूनच मी तिला मदत करण्यात कधीही माघार घेतली नाही. वैष्णवीला मोठं होवून मोठी नोकरी करायची आहे. तिच्या डोक्यात एकच बसलं आहे आपली गरीबी दूर झाली पाहिजे. मातीच्या घरातून तिला चांगल्या घरात राहाण्याची इच्छा आहे. साधे मासे विकणाऱ्या बाला मोरेचं घर कुठे हे धुळ्यातला आज कोणीही सांगतो ते वैष्णवीच्या कर्तृत्त्वानं. वैष्णवीच्या कर्तृत्वाचं कौतुक आहे. आज वैष्णवीचे बाबा म्हणून तिच्याबद्दल बोलताना माझी छाती अभिमानानं फुलून येते