सायली जोशी-पटवर्धन
‘घर सांभाळते तर काय उपकार करते का, ते कामच आहे तुझं, आणि मुळात घरात असं कामच काय असतं?’ गृहिणी असलेल्या बाईला नवरा-मुलंच नाही तर बाकीचेही असंच काहीबाही सुनावत असतात. तिलाही वाटतं की आपण घरात असतो, पैसे कमवत नाही म्हणजे आपण काहीच करत नाही. पैसे कमवत नाही म्हणजे तिची किंमत सगळ्याच दृष्टीने शून्य असते. ती दिवसभर घरासाठी कितीही राबली तरी तिच्या कामाचा मोबदला काहीच नसतो. तू काय करतेस, घरीच असते असंही त्या अगदी सहज सांगतात. आर्थिक स्वातंत्र्य नसल्यानं त्याही आत्मविश्वास गमावून बसतात. अनेकदा तर त्यांच्या नावावर न घर असतं, ना बँकेत पैसे. आणि मग काही वाईट वेळ आली किंवा नाही आली तरी बायकोचा नवऱ्याच्या मालमत्तेवर आणि पैशावर काही हक्क असतो की नाही? की बायको केवळ चोवीसतासाचं फुकट काम करणारं यंत्र बनून राहणार (Wife entitled for equal share in property Madras High Court)?
या प्रश्नाचं थेट आणि स्पष्टच उत्तर उच्च न्यायालयाने दिलं ती आनंदाचीच गोष्ट आहे. पतीने विकत घेतलेल्या मालमत्तेत पत्नीचा समान अधिकार असतो असा महत्त्वाचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी दिला आहे. पती घराबाहेर नोकरी करत असताना मुलांना सांभाळणे, स्वयंपाक, साफसफाई, इतर नियोजन अशा असंख्य गोष्टी पत्नी घरात करत असते. त्यामुळे पत्नीच्या कामाला पतीच्या कामाहून कमी लेखता येणार नाही असा आदेश न्यायमूर्ती कृष्णन रामसामी यांनी दिला.
न्यायालयाने दिलेला हा निर्णय स्वागतार्ह असल्याची चर्चा समाजमाध्यमातही दिसते आहे. स्वच्छेने वा अनिच्छेने घर सांभाळणाऱ्या महिलेला यातून आर्थिक स्थैर्य मिळेल अशी आशा आहे.या निर्णयाकडे कसे पहायला हवे यासंदर्भात ‘लोकमत सखी’ने मान्यवरांची मतं जाणून घेतली..
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. रमा सरोदे सांगतात..
हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे, न्यायमूर्तींनी या विषयावर केलेला विचार हा अतिशय महत्त्वाचा आहे. घरकामाला पैसे मिळत नसतील तरी त्या महिलेचे योगदानाला मान्यता मिळणं हीच खूप चांगली गोष्ट आहे. एरवी गृहिणीच्या कामाला घरातील मंडळी आणि काही वेळा तिच्या स्वत:च्या मतेही तितकी किंमत दिली जात नाही. मात्र पुरुष घराबाहेत ८ ते १० तास काम करत असताना गृहिणी २४ तास घरासाठी राबत असते. विशेष म्हणजे खूप वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ती काम करत असते असेही न्यायालयाने यामध्ये नमूद केलेले आहे. महिलांना माहेरचं घरही नसतं आणि सासरचंही नसतं त्यामुळे तिच्या नावावर काहीच नसतं. मात्र ती घरासाठी जे काय करते त्याचं योग्य क्रेडीट तिला द्यायलाच हवं हे नक्की. हीच महिला नोकरी करत असती तर तिनेही चांगले पैसे कमावले असते. पण ते सोडून ती आज आपला सगळा वेळ घरासाठी देते. घराबाहेर पडताना तर महिला ओढाताण करुन दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडतातच. त्यावेळी घरात कामाला मदतनीस ठेवायचा असेल तर आपण त्याचे वेगळे पैसे देतो. पण हेच काम जर घरातील महिला करत असेल तर त्याचे मोल शून्य असते. न्यायालयात विविध केसेस हाताळतानाही या निर्णयाचा खूप चांगला फायदा होणार आहे. गृहिणीच्या कामाला त्यामुळे मोल येणार हे नक्की आहे, त्यादृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे.
मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादक गिताली वि.म. सांगतात...
ही अतिशय चांगली गोष्ट आहे, केव्हाच व्हायला हवी होती. गृहिणींना वेतन मिळावं यासाठी आपण अनेक वर्ष झाले मागणी करत आहोत मात्र त्यात बऱ्याच गुंतीगुंती असल्याने तो मुद्दा दुर्लक्षित राहीला आहे. अनेक लोकांना काय वाटतं की, बायका घरी दुपारी काहीच करत नाही. अर्थिकदृष्ट्या उच्च गटातील महिलांना तर काहीच काम नसते कारण त्यांच्याकडे कामासाठी नोकरचाकर असतात. पण त्या मदतनीसांचे नियोजन करणे, त्यांना कामाचे वाटप करणे, त्यांच्याकडून ते योग्य पद्धतीने करवून घेणे ही कामेही या महिलांना करावी लागतात. कंपनीत किंवा कारखान्यात एखाद्या मॅनेजरला जसे काम असते त्याचप्रमाणे ही महिला ही जबाबदारी सांभाळत असते. मग त्या कंपनीत मॅनेजरला जास्त पगार दिला जातो पण घरातील महिलेला मात्र तू काहीच काम करत नाहीस म्हणून हिणवले जाते. त्यामुळे अशाप्रकारे काम करवून घेताना महिलेचा वेळ, शक्ती, डोकं असं सगळं खर्च होत असतं. गृहिणींना घरातील कामाच्या तासांचे बंधन नाही, तिला कोणतीही सुट्टी नसते. त्यामुळे तिला कायम गृहितच धरलं जातं.
महिला घरात करत असलेल्या सगळ्या कामांचे कमर्शिअल रेट काढले तर ती करत असलेल्या सगळ्या कामाचं गणित अनेकदा नवरा कमवत असलेल्या पगारापेक्षा जास्त होतं. त्यामुळे महिला घरात काम करत असेल तर त्याला आता काही प्रमाणात महत्त्व येत असून लोकांना त्याची किंमत कळायला लागली आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत बाईला सॉफ्ट टार्गेट करणे अतिशय सोपे आहे. त्यामुळे महिलांना बदनाम करणे अगदीच ही अतिशय सामान्य बाब आहे. बऱ्याचदा महिलाच महिलांना बदनाम करतात त्यामुळे या सगळ्यावर विचार करण्याची आणि योग्य ती कृती करण्याची वेळ आहे. बाई ही या व्यवस्थेची बळी आणि वाहक दोन्ही असल्याने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचे प्रमाण आजही जास्त आहे. महिलाच्या कामांना मूल्यात्मक महत्त्व देणं हे महत्त्वाचं आहे. आजही महिलांना नवऱ्याची किंवा वडिलांची मालमत्ता किंवा पैसा मिळवण्यासाठी भांडावे लागते, ते सहजासहजी मिळत नाही. त्यादृष्टीने आताचा निर्णय अतिशय चांगला आहे.