वर्ल्ड कपनंतर आता क्रिकेट विश्वात चर्चा सुरू आहे ती महिला प्रीमिअर लिगची अर्थात विमेन आयपीएल. (WIPL) त्यासाठीचा लिलाव नुकताच पार पडला असून त्यामध्ये भारतीयांसोबतच परदेशी खेळाडूंवरही मोठी बोली लागली आहे. वृंदा दिनेश हिचे नाव चांगलेच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे यूपी वॉरियर्स संघाने वृंदाला थोड्याथोडक्या नाही तर तब्बल १.३० कोटी रुपयांना आपल्या टिममध्ये घेतले आहे.वृंदा अजून भारतासाठी खेळलेली नाही, तरुण ज्युनिअर खेळाडू आहे. तरी वृंदासाठी एवढी मोठी बोली का लागली? कोण ही खेळाडू (WIPL Know who is Player Vrinda Dinesh)?
कोण आहे वृंदा दिनेश?
कर्नाटकतर्फे खेळणारी वृंदा उत्तम फलंदाज आहे. वय केवळ २२. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. मात्र वृंदा आतापर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली नाही. कर्नाटकमध्ये ती स्टार परफॉर्मर म्हणून ओळखली जाते. तिची बॅटिंग जोरदार आहे. तिचा स्ट्राईक रेट १५० च्या वर आहे. त्यामुळे तिला आपल्या संघात घेण्यासाठी सर्व संघांमध्ये स्पर्धा होती. त्यामुळे मामहिला प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्याच वर्षी वृंदा सर्वाधिक बोली लावलेली महिला क्रिकेटर म्हणून चर्चेत आली.
वृंदाला आपल्याला किती पैसे मिळाले याची माहिती कळली ती गोष्टही मस्त आहे. ती खेळत होती, १.३ हा आकडा तिच्या कानावर आला. ती म्हणते मला वाटलं फारतर १.३ लाख मिळाले असतील. ते ही माझ्यासाठी फार होते. मग सोबतचे खेळाडू सांगू लागले लाख नाही, कोटी. खेळ संपल्यावर पाहिले तर माझा फोन सतत वाजत होता. मी घरी पालकांना विचारलं तर ते म्हणाले, हो आकडा खरा आहे. आम्ही पाहिले ऑक्शन.
वृंदाची बहीण भरतनाट्यम डान्सर आहे. तिच्या वडिलांना वाटत असे की मुलीनं शिक्षण पूर्ण करावं, पण ते क्रिकेटमुळे झालं नाही. वृंदा म्हणते मी बाबांना वाटतं म्हणून नक्की डिग्री पूर्ण करेन. पण ते समजून घेतात की क्रिकेट अतिशय कष्टाचं काम आहे.वृंदाचं आता एकच स्वप्न आहे ती म्हणते आईबाबांना कधीची हवी असलेली ड्रिम कार आता मी त्यांना घेऊन देणार आहे. तिचे बाबाही म्हणतात, वृंदानं हे तिच्या मेहनतीचं कमावलं आहे. मात्र मी बोलतो तिच्याशी, खेळावरचं लक्ष जास्त महत्त्वाचं आहे.
आतापर्यंतची कामगिरी काय?
हाँगकाँगमधील एसीसी इमर्जिंग टीम्स कपमध्ये ती पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली. भारताने हे विजेतेपद पटकावले आणि वृंदा या संघाचा एक भाग होती. ती सुरुवातीला संघात नव्हती, पण गोलंदाज एस. यशश्रीला दुखापत झाल्यानंतर ती संघात सामील झाली.फायनलमध्ये तिने २९ चेंडूत ३६ धावा करत आपली छाप पाडली. या वर्षाच्या सुरुवातीला वरिष्ठ महिला एकदिवसीय स्पर्धेत कर्नाटकसाठी वृंदाने चमकदार कामगिरी केली होती. जसिया अख्तर आणि प्रिया पुनिया यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारी ती तिसरी खेळाडू होती.