धनंजय रिसोडकर
दंगल सिनेमा मधला तो प्रसिद्ध डायलॉग 'म्हारी छोरिया का छोरोंसे कम है के ?' आठवायलाच हवा असं तिचं कर्तृत्व. नाव माया पण खेळाची जादू आणि मेहनत अशी की तिच्या जिद्दीला सलाम करावा. नाशिकची क्रिकेटपटू माया सोनवणे. तिच्या 'माया'वी फिरकीची जादू अशी की नुकतीच तिची बीसीसीआयच्या महिला टी 20 आयपीएलमध्ये निवड झाली आहे. (Women IPL T20- 2022) नाशिकसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे, नाशिकच्या किमान एका तरी युवा क्रिकेटपटूला भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी नाशिकच्या गोल्फ क्लबवर किमान गत चार दशकांपासून दररोज अनेक क्रिकेटपटू कसून सराव सुरू करतात. स्वप्न पाहतात भारतीय कॅपची, आयपीएलची. मात्र आजवर नाशिककराला ती संधी मिळाली नाही. ज्यांचं बालकपण नाशकात गेलं ते बापू नाडकर्णी आणि काही काळ देवळालीत वास्तव्य केलेल्या सलील अंकोला यांनी नंतरच्या काळात मुंबईत खेळून भारतीय संघात स्थान मिळवले. मात्र त्यांना कधीही मूळ नाशिककर भारतीय संघापर्यंत पोहोचायचा आहे. बघायला गेलं तर रणजीपटू म्हणून तर गत पन्नास वर्षात 25 हून अधिक युवा क्रिकेटपटूंनी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके पुरुषांच्या आयपीएलमध्येही पोहोचले, मात्र चमकू शकले नाहीत. मात्र ते स्वप्न मायाच्या रुपात तरी पूर्ण व्हावं अशी आशा आहे. (Women IPL T20)
(Image : Google)
सोमवारी बीसीसीआयने आयपीएलच्या महिला टी 20 स्पर्धेच्या तीन संघांची घोषणा केली. त्यात मायाने 'व्हेलाॅसिटी' या संघात फिरकीपटू आणि लोअर मिडल ऑर्डरची तडाखेबंद फलंदाज म्हणून माया सोनावणेने स्थान पटकावले आहे. आजवर तिच्या खेळाच्या जोरावर ती बातम्यांमध्ये चमकतच होती मात्र आयपीएलपर्यंत पोहोचणं हे खरोखर कौतुकास्पद आहे. तिचा आजवरचा प्रवास अत्यंत खडतर आणि विपरित परिस्थितीतून झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ज्याची गणना होते, त्या सिन्नर तालुक्यातली माया. तिथं मुलींनी क्रिकेट खेळणे हेच मुळात नवं आणि अशक्य वाटावं असं होतं तिथून मायानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली.मुळची सिन्नरची असलेल्या माया सोनवणे हिला सिन्नरचे क्रिकेट प्रशिक्षक सुनील कानडी यांनी क्रिकेट मैदानाकडे वळवले. सिन्नर सारख्या गावात छोट्या छोट्या मुलींना घेऊन क्रिकेटचे मैदान घडवण्यापासून करण्यापासून क्रिकेट खेळण्यास प्रारंभ झाला. मात्र मुली क्रिकेट खेळतात म्हणून त्यांची यथेच्छ थट्टा टिंगल देखील झाली. मात्र कानडी सर आणि त्यांनी निर्माण केलेली मुलींची क्रिकेट टीम त्यांच्या ध्येयापासून अजिबात ढळली नाही. त्याशिवाय सिन्नरचे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक शिवाजी जाधव हे मायाचे प्रशिक्षक तसेच जिल्हा क्रिकेट संघटनेचे ज्येष्ठ प्रशिक्षक कै. अविनाश आघारकर ह्यांचे बहुमोल मार्गदर्शनही तिला लाभले होते. घरच्या अतिशय साधारण परिस्थितीतूनही मायाने केवळ क्रिकेटच्या वेडामुळे न कंटाळता नाशिक-सिन्नर ये जा करत प्रचंड जिद्दीच्या बळावर आयपीएलपर्यंत मजल मारली आहे.
(Image : Google)
खरंतर वयाच्या केवळ ११ व्या वर्षीच मायाची महाराष्ट्र संघासाठी निवड झाली होती. दुखापतीमुळे दुर्दैवाने मायाचे दोन हंगाम वाया गेले. एक अतिशय भरवशाची अष्टपैलु खेळाडु होण्याचे तिचे स्वप्न आहे. आता पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या यंदाच्या महिला टी-२० चॅलेंज २०२२ या स्पर्धेत दक्षिण अफ्रीका, इंग्लंड, वेस्ट इंडीज , ऑस्ट्रेलिया तसेच भारतातील दिग्गज महिला क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.त्यामुळे या आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूंचा समवेत खेळण्याचा अनोखा अनुभव मायाला मिळणार आहे. मायाची शैलीदेखील अनोखी असून द . आफ्रिकेचा माजी चायनामन फिरकीपटू पॉल ॲडम्स प्रमाणेच असल्याने तिच्या मायावी फिरकीने अनेकांना हातोहात फसवण्यात ती यशस्वी ठरते. उजव्या हाताने सुरेख लेग स्पिन टाकण्या बरोबरच लोअर मिडलला आवश्यक असणारी फटकेबाजी करती संघासाठी दोन्हीकडून योगदान देत असते. गतवर्षी मायाची भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली होती. नॅशनल क्रिकेट अकदमी बंगलोर येथील संभाव्य ३५ खेळाडुंच्या ह्या शिबिरासाठी मायाची निवड झाली होती. त्याशिवाय पुदुचेरी येथे झालेल्या 23 वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली होती. तर २०१४-१५ तसेच २०१७-१८ च्या हंगामात २३ वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक १५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. ह्या सगळ्या कामगिरी च्या जोरावर मायाची मागील हंगामात प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली होती . तर आता तिच्यासाठी आयपीएलमधील प्रवेश हा भारतीय संघातील प्रवेशाचा राजमार्ग ठरावा, जिद्दी माया ते स्वप्नही पूर्ण करेल अशी आशा आहे.