आयपीएल सुरु आहे. ( Women Ipl T 20 2022) आणि पहिल्याच मॅचमध्ये चर्चा झाली ती पूजा वस्त्राकारच्या एक्स फॅक्टरची. अशी जादुई खेळी की म्हणता म्हणता तिनं मॅच ओढून नेली. अर्थात आयपीएल म्हणताच पूजा वस्त्राकार हे नाव काही डोळ्यासमोर आले नसेल पण सगळे पुरुष खेळाडूच डोळ्यासमोर येतात. पण महिलांचे आयपीएलही सोमवारपासून सुरु झाले आहे, आणि पहिल्याच मॅचमध्ये जिनं भन्नाट खेळी केली तिचं नाव पूजा वस्त्राकार. मध्यप्रदेशातल्या एका छोट्या गावात जन्मलेली, बॅडलक जिच्या पुढे चालतं आणि ती त्यावर मात करुन पुन्हा पुन्हा स्वत:ला सिध्द करते ती पूजा वस्त्राकार. प्रेरणादायी वगैरे आहेच तिची गोष्ट पण त्यापलिकडे आहे कष्टांची कहाणी. जिद्दी कहाणी. क्रिकेटला पूजा समजून केलेल्या प्रवासाची.
तर पूजा वस्त्राकार. मध्यप्रदेशातल्या शहडोल जिल्ह्यातली. वडील बीएसएनएलमध्ये होते. वयाच्या पाचव्या वर्षी तिनं बॅट हातात घेतली आणि गल्लीत क्रिकेट खेळायची मुलांसोबत. शाळेतल्या मुख्याध्यापकांनी पाहिलं आणि ते तिला म्हणाले तू चांगलं खेळतेस. मैदानावर प्रॅक्टीसला येत जा. पण मुलींनी क्रिकेट खेळायचं ते ही मुलांसोबत हे पचणारं नव्हतं. पूजा गल्लीत क्रिकेट खेळायची तर आसपडोसचे लोक म्हणत, ‘लडकी हो, हमारे बच्चो पे तुम्हारी वजह से बुरा असर पडता है, तूम पढाई पे ध्यान दो, ये क्रिकेट लडकीयां नहीं खेलती..’
(Image : Google)
पण वडील बंधनराम लेकीला खेळायला प्रोत्साहन देत होते. त्यांना दोन मुलं-चार मुली. दुर्देवानं पूजा दहा वर्षांची असतानाच तिची आई वारली. वडील नोकरी सांभाळत मुलांचं पालनपोषण करत राहिले. मात्र त्यांनी पूजाच्या हातातली बॅट काढून लाटणं हाती घे असं कधी म्हंटलं नाही. पुजा खेळत राहिली आधी मध्यप्रदेश मग थेट भारतीय संघापर्यंत पोहोचली. २०१५ ला पूजाची भारतीय संघात निवड झाली. पण तिचं नशिब, ते तिच्या वाईटावर असल्यासारखं. ती खेळली बरी पण इंज्युरी मागे लागली. गुडघा दुखावला. करिअर संपल्यातच जमा होतं. वर्षभर पूजा बाहेर बसली. तिनं औषधं घेतली, व्यायाम केला. ध्यास एकच की क्रिकेट सोडायचं नाही. तिनं पुन्हा कमबॅक केलं. पुन्हा काही काळानं इंज्युरी. पुन्हा कमबॅक. इंज्युरींनी छळलं तिला.
(Image : Google)
पण ती मागे हटली नाही.
पूजा वस्त्राकार हे नाव क्रिकेटशी जोडलं जावं म्हणून ही मुलगी मेहनत घेतेच आहे. आता महिला आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात आपली चमक दाखवत तिनं हे सिध्द केलं आहे की, तिच्याकडे एक्स फॅक्टर आहे. मोठी करिअर इनिंग करण्याची क्षमता आहे..