दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर पॉल ॲडम्सच्या स्टाइलचे जगभर दिवाने आहेत. त्याची बॉलिंग ॲक्शन अशी की पाहणाऱ्याला वाटावं की कसं शक्य आहे हे इतकं लवचिक शरीर. आता त्याच्यासारखीच ॲक्शन पाहून लोक गांगरुन गेलेत. आणि ती ॲक्शन कुणाची तर नाशिकच्या सिन्नर तालूक्यातल्या माया सोनावणेची. महिलांसाठी सुरु असलेल्या आयपीएल टी २० चॅलेंजमधल्या व्हेलोसिटी संघात मायाची निवड झाली. अलिकडेच व्हेलोसिटी विरुद्ध सुपरनोव्हा सामन्यात तिची ॲक्शन पाहून लोक वेडावले. कुणी म्हणाले, माया सोनावणे कोण मला माहित नाही पण तिची ॲक्शन पाहून माझीच मान दुखायला लागली.पॉल ॲडम्ससारखी स्टाइल म्हणून तिचे फोटो व्हायरल झाले. शफाली वर्मा, हरमनप्रित, दीप्ती शर्मासोबत मॅच खेळत असताना नवख्या मायाची चर्चा झाली ही फार मोठी गोष्ट आहे. (women T 20 2022)
(Image : Google)
इएसपीएनक्रिकेटइन्फोनेही तिच्यावर विशेष लेख लिहिला, त्यांना दिलेल्या मुलाखतीत माया सांगते, रशीद खान आणि शेन वॉर्न हे माझे आवडते प्लेअर. मला खूप लोक आजवर सांगत आलेत की महिला क्रिकेटमध्ये अशी ॲक्शन आजवर कुणाची पाहिली नाही. पण मला त्यात वेगळं किंवा एक्स्ट्राऑर्डनरी असं काही वाटत नाही. मला तर माहितीही नव्हतं की पॉल ॲडम्स कोण आहे, कसा दिसतो? महाराष्ट्र सिनिअर संघात निवड होईतो मला त्याच्याविषयी काहीही माहिती नव्हती. मात्र अण्डर १९ साठीच्या संघात निवड झाली तेव्हा माझी सिनिअर खेळाडू स्नेहल प्रधान मला म्हणाली, तुला माहिती आहे का तू कुणासारखी बॉलिंग करतेस? मग तिनं मला पॉल ॲडम्सचे व्हिडिओ-फोटो दाखवले. मलाही गंमतच वाटली.आता पॉल ॲडम्सशी तिच्या स्टाइलची तुलना होत असली तरी मायाची स्वप्न मोठी आहेत. ती म्हणते, ‘कधीतरी मी भारतीय संघात खेळेल, उद्या कुणीतरी माझ्यासारखी बॉलिंगही करेल आणि मग लोक म्हणतील की ही तर मायासारखी बॉलिंग करते.’
स्वप्न अशी मायाच्या साेबतच मोठी होत आहेत.
आजवर तिच्या खेळाच्या जोरावर ती बातम्यांमध्ये चमकतच होती मात्र आयपीएलपर्यंत पोहोचणं हे खरोखर कौतुकास्पद आहे. तिचा आजवरचा प्रवास अत्यंत खडतर आणि विपरित परिस्थितीतून झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ज्याची गणना होते, त्या सिन्नर तालुक्यातली माया. तिथं मुलींनी क्रिकेट खेळणे हेच मुळात नवं आणि अशक्य वाटावं असं होतं तिथून मायानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली.मुळची सिन्नरची असलेल्या माया सोनवणे हिला सिन्नरचे क्रिकेट प्रशिक्षक सुनील कानडी यांनी क्रिकेट मैदानाकडे वळवले. सिन्नर सारख्या गावात छोट्या छोट्या मुलींना घेऊन क्रिकेटचे मैदान घडवण्यापासून करण्यापासून क्रिकेट खेळण्यास प्रारंभ झाला. मात्र मुली क्रिकेट खेळतात म्हणून त्यांची यथेच्छ थट्टा टिंगल देखील झाली. मात्र कानडी सर आणि त्यांनी निर्माण केलेली मुलींची क्रिकेट टीम त्यांच्या ध्येयापासून अजिबात ढळली नाही. त्याशिवाय सिन्नरचे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक शिवाजी जाधव हे मायाचे प्रशिक्षक तसेच जिल्हा क्रिकेट संघटनेचे ज्येष्ठ प्रशिक्षक कै. अविनाश आघारकर ह्यांचे बहुमोल मार्गदर्शनही तिला लाभले होते. घरच्या अतिशय साधारण परिस्थितीतूनही मायाने केवळ क्रिकेटच्या वेडामुळे न कंटाळता नाशिक-सिन्नर ये जा करत प्रचंड जिद्दीच्या बळावर आयपीएलपर्यंत मजल मारली आहे.