क्रिकेट म्हणजे भारतीयांसाठी जीव की प्राण. मैदानात क्रिकेट खेळण्यापासून ते टीव्हीसमोर बसून तासनतास मॅचेस पाहण्यापर्यंतचे क्रिकेटवेड आपल्यात असते. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या खेळात आता महिलाही मागे नाहीत. गेल्या काही वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटपटूंनी मैदानावर आपली दमदार कामगिरी दाखवत आपला खेळ सिद्ध केला आहे. सध्या वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धा (women's cricket world cup 2022) सुरु असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांत भारताने आपली कामगिरी उत्तमरितीने केली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवत दणदणीत विजय मिळवला आहे. यामध्ये सांघिक कामगिरीला महत्त्व असले तरी संघातील प्रत्येक खेळाडूचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.
आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने भारतासमोर तगड़ं आव्हान उभं केलं होतं. पण पूजा वस्राकार आणि स्नेह राणा यांच्या अतिशय उत्तम अशा भागिदारीमुळे पकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. सुरुवातीच्या टप्प्यात हरमनप्रीत कौर, कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि रिचा घोष (Richa Ghosh) यांच्या अतिशय कमी धावांमुळे काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पण पूजा वस्राकर (Pooja Vastrakar) आणि स्नेह राणा (Sneh Rana) यांनी आपल्या खेळीने परिस्थिती काहीशी आटोक्यात आणली. पूजा हिने ५९ चेंडूत ८ चौकार मारत ६७ धावा पटकावल्या. आजच्या तिच्या मैदानातील कामगिरीमुळे वूमन ऑफ द मॅचचा (Women Of the match) बहुमान तिने पटकावला. कोण आहे ही पूजा वस्राकर पाहूया.
बालपण
पूजा मूळची मध्य प्रदेशच्या शाहडोल येथील असून तिचा जन्म २५ सप्टेंबर १९९९ मधला आहे. तिचे वडिल बंधनराम वस्राकर BSNL चे निवृत्त कर्मचारी आहेत. अवघ्या १० वर्षांची असताना पूजाच्या आईचे निधन झाले. पूजा घरातील सर्वात लहान असून तिला चार बहिणी आणि २ भाऊ आहेत. तिच्या बॉयकटमुळे मुलांसारखी दिसणारी पूजा खेळाच्या बाबतीतही तितकीच आक्रमक असल्याचे मैदानावर दिसून येते.
खेळाला सुरुवात
लहानपणापासून पूजाला क्रिकेटची आवड असल्याने ती घराबाहेर मित्रमंडळींबरोबर पूजा क्रिकेट खेळायची. त्यावेळी प्रशिक्षक आशुतोष श्रीवास्तव यांनी तिच्यातील क्रिकेटचे कौशल्य हेरले. इतकेच नाही तर श्रीवास्तव यांनी पूजाला क्रिकेटचे रितसर ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. अवघ्या १९ वर्षाची असताना २०१८ मध्ये पूजाला दक्षिण आफ्रिका संघात भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आणि तिथून तिचा क्रिकेटचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. सुरुवातीला फलंदाजी करणारी पूजा कालांतराने गोलंदाजीकडे वळली. वयाच्या १५ व्या वर्षी ती मध्य प्रदेश टिममध्ये होती. इतकेच नाही तर इंडियन ग्रीन वूमन स्क्वाडमध्येही होती.
क्रिकेटमधील कामगिरी
१. २०१८ मध्ये वूमन्स वन डे इंटरनॅशनल क्रिकेट स्पर्धेत सहभाग - साऊथ आफ्रिका
२. २०१८ मध्येच वूमन्स ट्वेन्टी ट्वेन्टी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सहभागी - साऊथ आफ्रिक
३. २०१८ मध्ये आयसीसी वूमन्स वर्ल्ड ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धा - वेस्ट इंडिज
४. २०२० आयसीसी वूमन्स टी ट्वेन्टी वर्ल्ड कप - ऑस्ट्रेलिया
५. २०२२ वूमन्स क्रिकेट वर्ल्ड कप - न्यूझिलंड