मनाली बागुल
'बायकांना कॉमेडी जमत नाही', या जुन्या विचारसरणीलाच छेद देत आपल्या कॉमेडीने महाराष्ट्रातच नाहीतर जगभर मराठी माणसाच्या मनात घर करणारी अभिनेत्री, नम्रता संभेराव. (Namrata Sambherao) लॉली, बिहारी बुधिया, इन्सपेक्टर, आजीबाई किती भूमिका ती समरसून जगते आणि त्यात कॉमेडीचे असे काही रंग भरते की तिच्या कलेचं कौतुक वाटावं. अभिनय, कॉमेडी आणि व्यक्तिगत प्रवास यासंदर्भात तिच्याशी ‘लोकमत सखी’ने गप्पा मारल्या..
शाळेत होते तेव्हाच लागली अभिनयाची गोडी..
नम्रतानं शिवाजी विद्यालय काळाचौकी, येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं. शाळेमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. नृत्य, गायन, एकपात्री अभियन, शुद्धलेखन अशा सगळ्या उपक्रमांमध्ये ती सहभागी व्हायची. नम्रता सांगते, कलेला जिथे खूप जास्त महत्व दिलं जातं, अशा वातावरणात वाढल्यामुळे मला स्वत:ला एक्सप्लोअर करण्याची संधी मिळाली. गर्ल्स स्कूलमध्ये मुली स्पर्धांमध्ये भाग घ्यायच्या त्यांना बक्षिसेही मिळायची. तिथून मला प्रेरणा मिळाली की,आपल्यालाही मोठी उडी मारून बघायला काय हरकत आहे. त्यानंतर मी स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली. नववीत असताना पहिल्यांदा बाजीराव मस्तानी मधल्या मस्तानीचा एकपात्री अभिनय परफॉर्म केला. तिथे मला दुसरं प्राईज मिळालं. तेव्हा जाणवलं खरंच आपणही अभियन क्षेत्रात काहीतरी करू शकतो. वेगवेगळी शिबिरं, स्पर्धा शोधणं सुरू झालं.
आईच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं....
नम्रता सांगते की, ''या सगळ्यात मोठा वाटा माझ्या आईचा आहे. तिचा माझ्या प्रत्येक गोष्टीला खूप पाठींबा होता. तिनं मला कधीच आडकाठी केली नाही. मला नववीपासून जिथेही कामासाठी जायचं असायचं तिथे आई माझ्यासोबत असायची. आज जी काही मी इथे उभी आहे ती केवळ माझ्या आईमुळेच. सुरूवातीला पप्पा थोडे नाराज होते पण माझी कामं पाहिल्यानंतर त्यांनी मला पाठिंबा दिला. पैसे कमवणं हा कधीच माझा उद्देश नव्हता. माझं काम लोकांना आवडायला हवं आणि त्यातून मला आणखी चार कामं मिळावीत असं वाटायचं. मग हळूहळू एकांकीका स्पर्धा आणि नाटकं तर काही व्यावसाईक नाटकांमध्येही काम केलं.
मी कॉमेडी करू शकेन याची कल्पनाही नव्हती...
महाराष्ट्राचा सुपरस्टार हा शो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. ४ फायनलिस्टपैकी मी एक होते. तिथून नाव मिळालं मग कामं मिळायला लागली. खऱ्या अर्थाने करिअरची सुरूवात झाली. त्यावेळी आपल्याला कॉमेडी करता येते याची कल्पनाही नव्हती. मग फू बाई फू, कॉमेडी एक्सप्रेस, कॉमेडीची बुलेट ट्रेन, नसते उद्योग या विनोदी कार्यक्रमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सगळ्यात सचिन मोटे आणि सचिन गोस्वामींचाही खूप मोठा वाटा आहे. गेले १२-१३ वर्ष मी त्यांच्याकडे काम करतेय. त्यांनी माझ्यातील वेगळेपण ओळखून माझ्याकडून काम करून घेतलं आणि प्रयोग करायला लावलं.''
जेव्हा जॉनी लिवरचा थेट फोन आला..
''तुझं काम मला फार आवडलं तू चांगलं काम करतेस, हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या अभिनेत्रींमध्ये तुझं नाव आहे. असं जेव्हा मला जॉनी लिव्हर सरांनी फोन करून सांगितलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. इतकंच नाही तर हास्यजत्रेच्या सेटवर आले होते त्यावेळी त्यांनी मला घड्याळ आणि सोन्याचं पेडंट गिफ्ट केले हे माझ्यासाठी खूप स्वप्नवत आणि अविश्वनीय होतं. आपल्या आयुष्यात असं काही घडेल याचा मी विचारही केला नव्हता.''
ट्रोलिंगकडे कसं पाहते?
अनेकदा बिहारी बुधिया किंवा लॉली साकारताना, तुला लाज वाटते का? मराठी कार्यक्रमात हिंदी पात्र का साकारता? असं म्हणणारेही अनेकजण असतात. विनोद हा विनोदाच्या पद्धतीनंच घ्यायला हवा त्याला फार गांभीर्यानं घेऊ नये. प्रत्येक नाण्याची दोन बाजू असतात. तसंच दोन मतांची लोकं असू शकतात. प्रत्येक कमेंटचा मी आदर करते. मी ट्रोलरर्सना एंटरटेन करण्यापेक्षा माझ्या कामातून एंटरटेन करण्याचा प्रयत्न करते. मी महिलांना हेच सांगेन की, कुठल्याही दडपणाखाली न येता मोकळेपणानं जगा. आपल्या जे काही वाटतं ती मतं इतरांसमोर मांडा. तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात. तुम्ही करताय ते कसं योग्य आहे हे सुद्धा जगाला पटवून देता यायला हवं.
अस्सं सासर सुरेख बाई
सासरी मला कधीच 'तू हे कर किंवा हे करू नकोस' अशी बंधनं घातली नाहीत. माझ्या पतीला या क्षेत्राची आवड होती. त्यामुळे त्यांनी मला कधीच अडवलं नाही. सासूनंही वेळोवेळी पाठिंबा दिला. आम्हाला वाटलं तेव्हा आम्ही चान्स घेतला. फक्त एकदाच त्यांनी मला सांगितलं होतं की, तू आम्हाला बाळ दे, पुढचं सगळं आम्ही पाहू. बाळ झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांच्या आतच तू घराबाहेर पडू शकतेस. बाळाचं अजिबात टेंशन घेऊ नकोस. त्यामुळे माझं करिअर घडण्यामागे माझ्या सर्पोटिव्ह कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. माझी आई आणि सासू या दोन बायकांचे ऋण मी आयुष्यात कधीच फेडू शकत नाही.
अविस्मरणीय अनुभव
महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू झाल्यानंतर दोन एपिसोड शूट झाल्यानंतर तिसऱ्या एपिसोडच्या वेळेस मला कळंल की मी प्रेग्नंट आहे. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. अशावेळी सोनी मराठीच्या टिमनं मला प्रचंड सपोर्ट केला. प्रसादही लिहिताना नमा, तूला हे जमेल का? ही मुव्हमेंट जमेल का? या गोष्टी विचारात घेऊन माझ्या पात्रासाठी लिखाण करत होता. प्रेग्नंसीत मी सहा महिने हास्यजत्रेसाठी काम केलं. रुद्राक्ष जन्माला आल्यानंतर ३ महिन्यांनी पुन्हा मी शुटींग सुरू केलं. हास्यजत्रेतील माझा अभिनय, माझं आईपण या ३ वर्षातले अनुभव आयुष्यभर स्मरणात राहतील असे आहेत.