प्रगती जाधव-पाटील
कामात झालेली एक चूक जीवावर बेतू शकते हे माहिती असूनही जीवाला किती म्हणून जपायचं म्हणत मिळालेल्या नोकरीच्या संधीचं सोनं केलं पाहिजे, अशी धारणा ठेवून ती लाईन वुमन झाली. वायरमन आणि लाईनमन यांच्या अनुभवाचे बोल आणि प्रशिक्षणात मिळालेलं ज्ञान या जोरावर खांबावर चढण्यापासून सर्व कामं तिने आत्मसात केली. महिला असूनही खांबावर चढता कौतुक आहे तुमचं असे शब्द काम करायला प्रोत्साहन देतात म्हणत ती आपलं काम रोज चोख करते. साताऱ्यातील लाईन वूमन अनिता संजय राजगुरू यांची ही गोष्ट!
त्यांना खांबावर सरसर चढताना पाहून आणि तिथं उत्तम काम करत दुरुस्ती करताना पाहून आपली छाती दडपते. पण त्या मजेत काम करतात.
खरंतर वीज गेल्याशिवाय तिची किंमत कळत नाही पण वीज गेली की तातडीने कामाला लागणारे जनमित्र अर्थात लाईनमन कायम दुर्लक्षित राहिले आहेत. विजेचे काम जीव घेणे ठरू शकते हे माहिती असूनही या क्षेत्रात आता काही महिलांनी आश्वासकपणे प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे पुरुषांसारख्या त्याही खांबावर चढण्यापासून वीजपुरवठा सुरळीत करेपर्यंत सर्वच आघाड्यांवर काम करत असल्याचे पाहायला मिळते. अनिता राजगुरू हे याचे मूर्तीमंत उदाहरण सातारा जिल्ह्यात ठरू पाहत आहे. त्या उत्तम लाइनमन म्हणून काम करतात.
खांबावर चढून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम जोखमीचे असते अनेकांना हे काम करताना प्राणालाही मुकावे लागले आहे. शेकडो लाईनमन आजवर झालेल्या अपघातात जायबंदीही झाले आहेत, या क्षेत्रात काम करताना आवश्यक असलेला अलर्टनेस फार महत्वाचा. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी तो उपयोगी पडला, बाकी मेहनत तर आपल्याला करावीच लागते असं अनिता सांगतात.
माझा जॉब आहे, त्यात काय..
लाईन वुमन म्हणून काम करताना काय आव्हानं येतात असं विचारलं तर अनिता म्हणतात, आयुष्यच जिथं जोखमीचं ठरलं आहे तिथे नोकरीची काय बात करता? हा जाॅब स्वीकारल्यानं नवीन काही शिकता आलं. या कामात अर्थिंग रॉड आमचा सखा वाटतो. काम करताना ताण येतो. पण घरचा उत्तम सपोर्ट आहे. माझे पती संजय राजगुरू यांची साथ मला मोलाची आहे. ते खूप हिंमत देतात. माझी गोष्ट वाचून कुणाला वाटलं की महिला कुठल्याही क्षेत्रात काम कमी नाहीत तर त्याच्या इतका आनंद दुसरा नाही.